आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळ: दहावी सभा अखेर बरखास्त; जिल्हाधिकार्‍यांनी पाहिली ध्वनिचित्रफीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- पालिकेच्या 19 जूनला झालेल्या दहाव्या सर्वसाधारण सभेचे कामकाज नियमबाह्य पद्धतीने झाल्याची तक्रार विरोधी नगरसेवकांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती. बाचाबाची आणि सर्व विषयांना अनुमोदनाविनाच स्वीकृत सदस्य जगन सोनवणे यांनी दिलेली मंजुरी, या प्रसंगाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग पाहून जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी ही सभा रद्द करण्याचे आदेश दिले.

पालिकेची दहावी सर्वसाधारण सभा अर्थसंकल्प, पाणी आणि शहरातील विविध समस्यांमुळे गाजली होती. सभा सुरू झाल्यानंतर गोंधळामुळे नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी पाच मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले होते. तहकूब कालावधी संपून प्रोटोकॉलनुसार कामकाज सुरू होण्यापूर्वीच स्वीकृत नगरसेवक जगन सोनवणे यांनी दहाव्या सभेच्या विषयपत्रिकेतील सर्व 35 विषयांना मंजुरी दिल्याचे जाहीर केले. मात्र, 35 विषयांना केवळ एकाच सदस्याची मंजुरी, सभागृहातील दुसर्‍या कोणत्याही सदस्यांचे अनुमोदन नसणे आणि तहकूब सभेचे कामकाज प्रोटोकॉलप्रमाणे सुरू न होणे या कारणांवरून भाजप आणि खाविआने जिल्हाधिकार्‍यांकडे सभा रद्द करण्याची मागणी केली होती.
19 जूनला झालेल्या सर्वसाधारण सभेतील क्षण.

बहुमताचा दुरूपयोग नकोच
>जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशाचा आदर करून पुढील सर्वसाधारण सभेची आखणी करू. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विरोधकांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे.
-उमेश नेमाडे, नगराध्यक्ष, भुसावळ

स्वीकृत सदस्य जगन सोनवणे यांनी सभा तहकूब काळातच सर्व विषयांना मंजुरी दिली. एकाही विषयावर चर्चा झाली नाही. यामुळे जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली होती. आदेशाचे स्वागत करतो.
-किरण कोलते,गटनेते, खाविआ

>सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस बहुमताचा गैरफायदा घेत आहे. सभेत विकासात्मक विषयांवर चर्चा होणे अपेक्षित असते. मात्र, सर्व विषयांना दोन मिनिटांत मंजुरी मिळते, हा प्रकार दुर्दैवी आहे.
-अजय भोळे, गटनेते, भाजप

>जिल्हा प्रशासनाकडून 19 जूनची बैठक रद्द झाल्याचे आदेश प्राप्त झालेत. नगराध्यक्ष उमेश नेमाडेंच्या परवानगीनंतर आता पुन्हा त्याच विषयांचा समावेश करून सभा बोलावण्यात येईल.
-अनिल जगताप,मुख्याधिकारी, भुसावळ

नगराध्यक्षांना घ्यावा लागेल पुढाकार
तब्बल दोन महिने 17 दिवसांच्या ब्रेकनंतर 19 जूनला झालेली दहावी सभा जिल्हाधिकार्‍यांनी रद्द केली. आता जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार पीठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्षांना त्याच विषयांना घेऊन सभा बोलवावी लागेल. किंवा जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने पुढील सभेचे काम चालेल.

पालकमंत्र्यांचा सल्ला
पालकमंत्री संजय सावकारे यांनी पालिकेला दिलेल्या सदिच्छा भेटीत, सुदृढ लोकशाही आणि शहर हितासाठी सर्वसाधारण सभेत विरोधकांची बाजू ऐकून घेण्याचा सल्ला दिला होता. यामुळे किमान येणार्‍या सभेत तरी सत्ताधार्‍यांकडून सुधारणा होईल, अशी अपेक्षा विरोधी नगरसेवकांनी व्यक्त केली.

सभेनंतरच्या हालचाली गतिमान
एकाच सदस्याने मंजुरी देऊन अनुमोदनाविनाच विषय मंजूर होणे, सभेत विषयनिहाय चर्चा न होणे, सभा तहकूब काळातच काम संपविणे,या मुद्दय़ांवर भाजप आणि खाविआच्या नगरसेवकांनी 19 जूनला जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली होती.त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांनी सभा रद्द करण्याचे आदेश काढले.

इतिहासात प्रथमच नामुष्की
पालिकेची स्थापना 1882 मध्ये झाली. सभेतील ठराव निलंबित झाल्याचे अनेक प्रकार घडले. मात्र, थेट सभाच बरखास्त करण्याची नामुष्की 19 जूनच्या सभेनिमित्त ओढवली. कधीकाळी दोन दिवसांपेक्षा जास्त सभेचे कामकाज चालण्याचा इतिहास असलेल्या पालिकेची सभा आता अवघे 10 मिनिटेसुद्धा चालेनासी झाली आहे.

अशी झाली होती सर्वधारण सभा
दोन महिने 17 दिवसांच्या कालावधीनंतर झालेली दहावी सर्वसाधरण सभा अर्थसंकल्प, पाणीप्रo्न आणि नगरसेविका नंदा निकम यांच्या संतापाने लक्षवेधी ठरली. यापूर्वीच्या अनेक सभांप्रमाणे एकमेव नगरसेवक सोनवणे यांनी सर्व विषयांना मंजुरी देत असल्याचे जाहीर केले. याच मुद्दय़ावर विरोधकांनी बोट ठेवले होते. सभेनंतरही शाब्दिक चकमक झाली होती.

एकाच सदस्याने सर्व विषयांना दिलेली मंजुरी सत्ताधार्‍यांना भोवली
> रॉ पंपिंग स्टेशनवर नव्याने पंपसेट उभारणी. कचरा, रेतीगाळाच्या डेपोपर्यंत वाहतुकीसाठी खासगी मक्तेदाराची नेमणूक
> रेल्वे लाइनच्या उत्तर, दक्षिण व बलबलकाशी नाल्याच्या पूर्वेकडील उद्धरण-वितरण वाहिन्यांची दुरुस्ती, गळती थांबवणे
> रेल्वे लाइनच्या दक्षिणेकडील व बलबलकाशीच्या पश्चिमेकडील पाणीपुरवठा यंत्रणेतील जलवाहिन्यांची दुरुस्ती खर्चअंदाजास मंजुरी
> क्लोरिफॉक्युरेटरमधील गाळ काढण्याचा खर्च, सेपरेशन वॉलचे बांधकाम, लिक्विड क्लोरिन गॅस वापराचे सयंत्र बसवणे
> पथदिवे दुरुस्तीसाठी मक्ता पद्धतीने मानधन तत्त्वावर इलेक्ट्रिशिअन 10 आणि 10 मजुरांची नेमणूक
> 11 महिने करारावर 25 चालक, पाणीपुरवठा केंद्रात मानधन तत्त्वावर दोन अभियंता, सहा इलेक्ट्रिशिअन, आठ मजुरांची नेमणूक