आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळ पालिका मुख्याधिकार्‍यांचे वाहन जप्त होणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- पालिकेकडे शिक्षण व रोजगार हमी योजना कराची 1 कोटी 46 लाख रुपयांची थकबाकी आहे. त्याची वसुली करण्यासाठी महसूल प्रशासनाने पालिकेला नोटीस बजावली आहे. महसूलची थकबाकी भरली नाही तर जप्तीची कारवाई करण्याचा इशारा तहसीलदार वैशाली हिंगे यांनी दिला आहे.

महसूल विभागाने करवसुलीची मोहीम तीव्र केली आहे. मंडळाधिकारी व तलाठय़ांच्या बैठका घेऊन दर सोमवारी तहसीलदारांकडून आढावा घेतला जात आहे. बीएसएनएल, दीपनगर वीजनिर्मिती प्रकल्प यांच्याकडील करवसुलीसाठी गेल्या पंधरवड्यात महसूल प्रशासनाने जप्तीच्या कारवाईचे पाऊल उचलले होते. मात्र, थकबाकीच्या रकमेचे धनादेश ऐनवेळी देण्यात आल्याने त्यांच्यावरील जप्तीची कारवाई टळली होती. त्यानंतर आता महसूल प्रशासनाने पालिकेकडील करवसुलीसाठी लक्ष केंद्रीत केले आहे.

शिक्षण कर व रोजगार हमी योजना कराची 1 कोटी 46 लाख रुपयांची रक्कम वसुलीसाठी पालिकेला महसूल प्रशासनाने शुक्रवारी नोटीस बजावली आहे. पालिकेने 33 लाख रुपये बुधवारी (दि.6) भरण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात बुधवारी ही रक्कम पालिकेने भरलेली नाही. त्यामुळे आता नगराध्यक्ष व मुख्याधिकार्‍यांची वाहने जप्त करण्याची कारवाई करण्याचे प्रयत्न महसूल प्रशासनाने सुरू केले आहेत.