आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन, जळगावचे दंगा नियंत्रण पथक दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - पालिकेचे नामनिर्देशित सदस्य जगन सोनवणे यांचे सदस्यत्व अपात्र ठरवल्याचे खापर पीआरपीच्या पदाधिकार्‍यांनी पालकमंत्र्यांवर फोडले. मंगळवारी दुपारी 3.30 वाजता पदाधिकार्‍यांनी पालिकेसमोर घोषणाबाजी करत पालकमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळय़ाचे दहन केले. या प्रकरानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दक्षतेचा उपाय म्हणून सायंकाळी पोलिसांनी शहरातून रुटमार्च काढला. याप्रकरणी जगन सोनवणे यांच्यासह दहा जणांविरुद्ध बाजारपेठ ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पालिकेसमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पीआरपीचे पदाधिकारी राकेश बग्गन, छोटू निकम, राजू डोंगरदिवे यांच्यासह जमलेल्या इतर कार्यकर्त्यांनी पालकमंत्री संजय सावकारे यांचा पुतळा जाळला. या वेळी जमलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीही केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पोलिस येण्यापूर्वीच घोषणाबाजी करणार्‍यांनी घटनास्थळावरुन काढता पाय घेतला. नेहमी वर्दळ असलेल्या पालिका चौकात या प्रकारामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली. वरणगावकडून बसस्थानकाकडे येणारी वाहने वाहतूक कोंडीमुळे चौफुलीवरच थांबली होती. पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते, उपनिरीक्षक नीता कायटे यांच्यासह डीबी पथकातील पोलिसांनी पुतळा विझवून वाहतूक सुरळीत केली.

पुतळा जाळणार्‍यांचा शोध

पालकमंत्र्यांचा पुतळा जाळणार्‍यांचा बाजारपेठ पोलिस शोध घेत आहेत. खबरदारी म्हणून जळगाव येथील दंगा नियंत्रण पथकाला शहरात पाचारण करण्यात आले. पोलिस उपअधीक्षक विवेक पानसरे यांनी प्रकरणाची माहिती घेतली. याप्रकरणी हवालदार गोपाळ चौधरी यांच्या फिर्यादीवरुन जगन सोनवणे, राजू डोंगरदिवे, छोटू उर्फ दीपक निकम, राकेश बग्गन, अरुण नरवाडे, राजेश मोरे, सुधीर जोहरे, दीपक सोनवणे, सम्राट बनसोडे, हरिश सुरवाडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते तपास करत आहेत.

शहरात जमावबंदी आदेश लागू

मोबाइल स्वीचऑफ
दरम्यान, यासंदर्भात पालकमंत्री संजय सावकारे यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क साधला असता मोबाइल स्वीचऑफ होता. स्वियं सहायक बागवे यांच्याकडे विचारणा केली असता, साहेब हाऊसमध्ये आहेत. यामुळे संपर्क होऊ शकत नाही, असे उत्तर मिळाले.

गय करणार नाही
जिल्ह्यात 25 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत जिल्हाधिकार्‍यांनी जमावबंदी आदेश लागू केला आहे. या आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा अधिक जण एकाचवेळी गर्दी करु शकत नाहीत. पुतळा जाळणार्‍यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना झाले आहे. शहराच्या शांततेला बाधा पोहोचवणार्‍यांची गय केली जाणार नाही. विवेक पानसरे, पोलिस उपअधीक्षक, भुसावळ

पीआरपीने नोंदवला निषेध
सोनवणे यांचे सदस्यत्त्व अपात्र ठरवल्याचा पीआरपीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे निषेध नोंदवला. याप्रकरणी पक्षातर्फे जिल्ह्यात रास्ता रोको, जेलभरो, रेलतोडो, जिल्हा बंद, अशी आंदोलने करण्याचा इशारा पीआरपीने दिला आहे. 15 ऑगस्टला दुपारी 2 वाजता जळगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चा काढणार असल्याचे निवेदन प्रसिद्धीस दिले.