आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळ: जप्तीची नामुष्की टळली; थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करण्याचा इशारा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- पालिकेकडे थकलेला शिक्षण आणि रोजगार हमी योजनेचा कर तातडीने न भरल्यास नगराध्यक्ष उमेश नेमाडे, प्रभारी मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांची शासकीय वाहने, कचरा संकलनासाठी असलेल्या घंटागाड्या जप्त करू, असा इशारा तहसीलदार वैशाली हिंगे यांनी नोटीसद्वारे दिला होता. जप्तीची ही नामुष्की ओढवण्यापूर्वीच पालिकेने रोहयो आणि शिक्षण करापोटी 38 लाख रुपयांचा धनादेश दिला.

भुसावळ तालुक्यातील महसूल विभागाची शासकीय करवसुली अत्यंत कमी आहे. यानुषंगाने मध्यंतरी प्रांताधिकारी राहुल मुंडके यांनी विभागातील सर्व तहसीलदारांची बैठक घेतली होती. वसुलीचे प्रमाण वाढवण्याच्या सूचना या वेळी करण्यात आल्या होत्या. यानुषंगाने भुसावळच्या तहसीलदार हिंगे यांनी, भारत संचार निगम लिमिटेड, दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प 60 लाख, नगरपालिकेकडे शासकीय कराची मागणी केली होती. पालिकेकडे 1 कोटी 46 लाख रुपये कर थकला आहे. कर मागणी करूनही पालिकेने दुर्लक्ष केल्याने तहसीलदारांनी थेट नगराध्यक्ष, मुख्याधिकार्‍यांची शासकीय वाहने, घंटागाड्या जप्त करण्याची नोटीस बजावली होती. बँक खाती सील झाल्याच्या नामुष्कीतून नुकतीच सुटका झालेल्या पालिकेसाठी हा प्रकार ‘धिंडवडे’ काढणारा ठरला असता. त्यामुळे वाहन जप्तीच्या कारवाईपूर्वीच शिक्षण आणि रोहयो कराचा 38 लाख रुपयांचा धनादेश तहसीलदार हिंगे यांना देण्यात आला. दरम्यान, प्रभारी मुख्याधिकारी पदी रूजू झाल्यानंतर बी.टी.बाविस्कर यांनी पालिकेवर ओढवलेली दुसरी नामुष्की दूर केली. यापूर्वी, बँक खाती सील झाल्याने वॉटरवर्कचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी नोटीस दिली होती. परभार घेतल्यानंतर दुसर्‍याच दिवशी 25 लाख रुपयांचा धनादेश देवून बाविस्कर यांनी कोसळू पाहणारे जलसंकट दूर केले होते. आता पुन्हा जप्तीची कारवाई टाळण्यासाठी त्यांनी शिक्षण-रोहयो कराचे 38 लाख रुपये जमा केले.

करवसुलीवर मदार
2012-2013 या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात पालिकेची वसुली फारसी समाधानकारक नाही. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या पालिकेला ही अत्यल्प वसुली परवडणारी नाही. यामुळे पालिकेने आता थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

नगरसेवकांना पत्र
थकबाकी, मालमत्ता, पाणीपट्टी वसुलीसाठी नगरसेवकांची मदत घेवू. यासाठी नगरसेवकांना विनंतीपत्र देणार आहोत. आपापल्या वॉर्डात पालिकेच्या वसुली पथकासोबत फिरून त्यांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा आहे. -बी.टी.बाविस्कर, प्रभारी मुख्याधिकारी, भुसावळ

पालिका करणार ‘बॅनरबाजी’चा सव्र्हे
भुसावळात मनमानी करून कोणत्याही ठिकाणी बॅनर्स, पोस्टर्स लावण्याचे प्रकार आता बंद होणार आहेत. पालिकेने विनापरवानगी बॅनरबाजी करणार्‍यांवर थेट गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. तत्पूर्वी, शहरात जागोजागी लागलेल्या फलकांचे सर्वेक्षण होणार आहे. बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रभाकर रायते यांनी पालिकेचे अभियंता ए.बी.चौधरी, सुभाष ठाकूर, व्ही.डी.लोहार, शहर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र मानकर, वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक विलास काळे यांची स्वतंत्र बैठक घेतली. प्रामुख्याने शहरात जागोजागी अनधिकृतपणे बॅनर्स लावणार्‍यांवर कारवाई करावी, असा मुद्दा समोर आला. कारवाईपूर्वी नियमित बॅनर्स झळकणार्‍या ठिकाणांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय झाला. शहरातील सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण थांबवण्यासाठी पालिका हे सर्वेक्षण करणार आहे. पोलिसांच्या बैठकीनंतर प्रभारी मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांनी कर्मचार्‍यांची स्वतंत्र बैठक घेतली. शहर, पालिका क्षेत्रात लावलेल्या बॅनर्स, होर्डिंग्जचा सव्र्हे करणे, सद्य:स्थितीत लागलेल्या बॅनर्सची परवानगी घेतली आहे का? कोणत्या रस्त्यावर किती बॅनर्स आहेत? वाहतुकीला अडथळे येतात का? याबाबत अहवाल तयार करण्याची सूचना बाविस्कर यांनी केली. पालिकेची परवानगी न घेता लावलेले फलक जप्त करून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा निर्णय झाल्याचे बी.टी.बाविस्कर यांनी सांगितले.