आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आमसभेत दादागिरी खपवून घेणार नाही; सरपंच झाले आक्रमक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - पंचायत समितीची आमसभा आयएमए सभागृहात सोमवारी झाली. सभेचे अध्यक्ष आमदार संजय सावकारे व फेकरीचे सरपंच तथा कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणार्‍या अधिकार्‍यांना प्रभाकर सोनवणे यांनी पोटतिडकीने मुद्देसुदपणे प्रश्न मांडून धारेवर धरून ही आमसभा गाजविली.

भुसावळ पंचायत समितीची आमसभा गेल्या दोन वर्षांपासून झालेली नव्हती. आमसभा घेण्यात यावी, अशी मागणी राजकीय पक्षांकडून सातत्याने करण्यात येत होती. त्यामुळे दोन वर्षांची आमसभा एकत्र घेण्याचा मुहूर्त पंचायत समिती प्रशासनाला सोमवारी गवसला. अध्यक्षस्थानी आमदार संजय सावकारे होते. वीज वितरण कंपनीचे वरणगाव उपविभागाचे सहायक अभियंता एस.आय.शेख यांनी त्यांच्या विभागाचा आढावा सादर केला. ते आढावा सादर करीत असतानाच फेकरीचे सरपंच प्रभाकर सोनवणे हे उभे राहिले. तुमच्या विभागात किती कर्मचारी? तुमचे कार्यक्षेत्र कुठपर्यंत? तुमच्या विभागाच किती विजेचे पोल आहेत? याच्याशी जनतेला काही देणे घेणे नाही. तुमच्याकडे किती लोकांनी डिमांटनोट भरली आहे? किती जणांना दिली आहे? ज्यांना दिली नाही त्यांना काय अडचणी आहेत? याची उत्तरे द्या. सरपंचांना त्यांच्या अडचणी मांडू द्या, असा मुद्दा सोनवणे यांनी उपस्थित करताच गोंधळ होण्यास सुरुवात झाली. अनपेक्षित प्रकारामुळे आमसभेचे अध्यक्ष संजय सावकारे हे संतप्त झाले. ‘सभा मला चालवायची आहे की तुम्हाला? विनाकारण सभा उधळण्याचा प्रयत्न करू नका. दादागिरी खपवून घेणार नाही’, अशा शब्दात त्यांनी फेकरीचे सरपंच प्रभाकर सोनवणे यांना खडसावले. त्यानंतर मात्र, ‘कोणत्याही परिस्थितीत मी खाली बसणार नाही. आम्हालाही जनतेने निवडून दिले आहे. आमचा आवाज दाबून अधिकार्‍यांची बाजू घेऊ नका’, अशा परखड शब्दात प्रभाकर सोनवणे यांनी आमदारांना उत्तर दिले. सावकारे व सोनवणे यांच्यात तब्बल आठ मिनिटे ही शाब्दिक चकमक सुरूच होती. पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र पुंडलिक चौधरी हे व्यासपीठावरून खाली उतरले व त्यांनी प्रभाकर सोनवणे यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कुठे तरी ही ‘शाब्दिक युद्धाची धग’ कमी झाली. आमसभेच्या व्यासपीठावर पंचायत समितीच्या सभापती मंगला झोपे, उपसभापती शेख खलील शेख गणी, पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र पुंडलिक चौधरी, अलका पारधी, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र साहेबराव चौधरी, मंदा अवसरमल, गटविकास अधिकारी डॉ.आर.पी.तायडे, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे विधानसभा क्षेत्रप्रमुख नारायण कोळी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

वीज वितरणचे कार्यकारी अभियंता अनुपस्थित

आमसभा तब्बल दोन वर्षांनंतर झाली. मात्र, या महत्त्वपूर्ण सभेला भुसावळ येथील वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता, मुक्ताईनगर वनविभागाचे वनक्षेत्रपाल हे अधिकारी अनुपस्थित होते. त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी उपस्थित सरपंचांसह लोकप्रतिनिधींनी केली.

प्रोसिडींग वाचून दाखवा, खाली बसतो

फेकरीचे सरपंच प्रभाकर सोनवणे यांनी तर गेल्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या आमसभेत जे विषय मांडले त्यातील किती मार्गी लागले? याची उत्तरे अधिकार्‍यांनी देण्याची आग्रही भूमिका मांडली. आमसभेत खरोखरच प्रश्न मार्गी लागले असतील, तर मागच्या आमसभेचे प्रोसिडींग दाखवा, असा प्रश्न उपस्थित करून खळबळ उडवून दिली. त्यानंतर आमदार संजय सावकारे यांनी गटविकास अधिकारी डॉ.आर.पी.तायडे यांना ‘आमसभेचे प्रोसिडींग लिहिले आहे का?’ असा प्रश्न उपस्थित करताच तायडे यांनी क्षणाचाही विलंब न करता ‘प्रोसिडींग तयार आहे’ असे उत्तर दिले. प्रोसिडींग लिहिले आहे तर वाचून दाखवा, असा प्रश्न प्रभाकर सोनवणे यांच्यासह उपस्थित सरपंचांनी केला. पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र चौधरी यांनी तांत्रिक अडचणींमुळे ते लिहिले गेले नाही, असे विधान करताच उपस्थित अवाक् तर झालेच; पण गटविकास अधिकारीही तोंडघशी पडले. ग्रामीण भागातील शाळांचा दर्जा, गुणवत्ता वाढविण्यासाठी इंग्रजीचे सेमी वर्ग सुरू करण्याबाबत विशेष प्रयत्न करण्यात यावे, असे मत पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र पुंडलिक चौधरी यांनी या आमसभेत व्यक्त केले.

आवाज दडपण्याचा प्रयत्न
ग्रामविकासाचे केंद्रबिंदू असलेल्या ग्रामपंचायतीचा कारभार पाहणार्‍या सरपंचांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आमसभेचे आयोजन केले जाते. मात्र, सभेचे अध्यक्षच जर त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करून अधिकार्‍यांची बाजू घेत असतील तर सभा बोलवताच कशाला ? जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळाला पाहिजे, असे वाटत असेल, तर आमसभेत सरपंचांना त्यांची बाजू मांडू दिली पाहिजे. माझ्या गावाचा विषय नसताना तरी मी सभेत उभा राहुन बोलत असेल तर मी कॉँग्रेसचा जबाबदार तालुकाध्यक्ष आहे, हे आमदारांनी विसरू नये. प्रभाकर सोनवणे, सरपंच, फेकरी, ता.भुसावळ

बाजू घेण्याचा प्रश्नच नाही
आमसभा जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठीच आयोजित करण्यात आलेली असते. त्यात प्रत्येकाने आपला प्रश्न मुद्देसुदपणे मांडला पाहिजे. प्रत्येकवेळी उभे राहून मोठय़ाने बोलणे योग्य नाही. अधिकार्‍यांचा आढावा ऐकूण घेतल्यानंतरच गावनिहाय सरपंचांनी प्रश्न उपस्थित करणे अपेक्षित असते. अधिकार्‍यांवर आरोप करताना त्यांच्याविषयी जर लेखी तक्रारी केल्या असतील तर त्याला अर्थ आहे. अधिकार्‍यांनीही जनतेची फसवणूक करण्याचा प्रयत्न करू नये. एखाद्या विभागाच्या अधिकार्‍यांकडून त्रास दिला जात असेल, तर सरपंचांनी लेखी तक्रार करावी. संजय सावकारे, आमदार, भुसावळ

अधिकार्‍यांचा अभ्यासच नाही
भुसावळ तालुक्यातही दुष्काळदृश्य स्थिती यंदा निर्माण झाली आहे. शासनाने दुष्काळग्रस्त गावांसाठी शासकीय योजनांच्या निकषात काही बदल केले आहेत. मात्र, दुर्दैवाने येथील अधिकार्‍यांना शासनाच्या योजनांचीच पुरेशी माहिती नाही. वार्षिक परीक्षेला जायचे अन् पेन घरी विसरायचा, अशातला हा प्रकार आहे. त्यामुळे अधिकार्‍यांच्या बौद्धीक दिवाळखोरीची कीव करावीसी वाटते. किमान वर्षभरात एकदा होणार्‍या आमसभेत तरी सर्व विभागाच्या अधिकार्‍यांनी अभ्यासपूर्ण आढावा सादर करून लोकप्रतिनिधींना योग्य माहिती द्यावी. नवलसिंग राजपूत, सरपंच, शिंदी, ता.भुसावळ

जिल्हा परिषद सदस्यांचे मौन
फेकरी गावठाणमध्ये 200 विजेचे पोल टाकण्याचा प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठविला आहे. दीड ते दोन वर्षांनंतरही तो मंजूर झालेला नाही. तो मंजूर न होण्याच्या अडचणी काय? असा प्रश्न प्रभाकर सोनवणे यांनी उपस्थित केला असता, जिल्हा परिषदेकडून तशा आशयाचा ठराव मिळाला की, काम मार्गी लागेल, अशी उत्तरे वीज कंपनीच्या अधिकार्‍यांनी दिली. जिल्हा परिषदेकडील पाठपुराव्यासाठी हा विषय रखडला असेल, तर स्थानिक जिल्हा परिषद सदस्यांनी त्यासाठी लक्ष घातले पाहिजे, असा मुद्दा उपस्थित झाला. मात्र, व्यासपीठावर उपस्थित फुलगाव येथील जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र साहेबराव चौधरी यांनी कानावर हात ठेवण्यातच धन्यता मानली.

राजकीय कोपरखळ्या
शिंदीचे सरपंच नवलसिंग राजपूत यांनी भीषण पाणीटंचाईचा प्रश्न उपस्थित केला. पाण्याच्या दुर्भिक्षामुळे गुराढोरांचे हाल होत आहेत. वन्यप्राणीही गावाकडे धाव घेत आहेत. गावातील विजेचे ट्रान्सफार्मर दोन आठवड्यांपासून जळाला आहे. वीज कंपनीने तो दुरुस्त करावा, असा प्रश्न मांडला. भुसावळ आगारातून बसेस वेळेवर सोडल्या जात नाहीत. अनेक ठिकाणी बसेसची मागणी करूनही त्या मिळत नाहीत, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. या वेळी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे यांनी आमदार संजय सावकारे यांच्याकडे इशारा करून पाणीपुरवठा व परिवहन खाते तुमच्याच पक्षाकडे आहे, अशी कोपरखळी मारून सभेत हास्याचे फवारे उडविले. आमदारांनीही सरकार आपल्या दोन्ही पक्षांचेच आहे, अशी आठवण सोनवणेंना करून दिली.