आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhusawal Panchayat Samiti, Jilha Parishad Election

भुसावळ तालुक्यात जातीची समीकरणे महत्त्वाची

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ: तालुक्यात जिल्हा परिषदेचे चार गट व पंचायत समितीचे आठ गण आहेत. यातील साकेगाव-कंडारी गट अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे. कुर्‍हे पानाचे-वराडसीम व वरणगाव-पिंप्रीसेकम गट सर्वसाधारण तर तळवेल-हतूनर गट ओबीसी प्रवार्गासाठी आरक्षित आहे. तालुक्यात प्रभाव असला तरी पालिका निवडणुकीत सामाजिक समीकरणे न साधल्याने भाजपचा दारुण पराभव झाला. त्यामुळे आताच्या निवडणुकीत प्रभाव टिकवून ठेवण्यासाठी लेवा पाटीदार, मराठा पाटील आणि मागासवर्गीय समाजाला सोबत घेवून भाजपने रणनीती आखली आहे.
साकेगाव-कंडारी गट आरक्षित असल्याने अनुसूचित जाती संवर्गातील महिलेला संधी मिळणार आहे. उर्वरित तीन गटामध्ये तळवेल-हतनूर आणि वरणगाव-पिंप्रीसेकम गटात लेवा पाटीदार समाजाचा प्रभाव आहे. मात्र, कुर्‍हे पानाचे-वराडसीम गटात मराठा समाजाचे प्रभुत्व आहे. गटातील सरासरी 29 हजार 270 पैकी 12 हजार मतदार मराठा समाजाचे आहेत. त्यामुळे विजय मिळवण्यासाठी भाजपसह सर्वच पक्षांनी मराठा समाजातील सक्षम उमेदवाराचा शोध सुरू केला आहे. सेनेकडे विश्वनाथ पाटील आहेत. तर कुर्‍हे पानाचे येथील ग्रामपंचायत सदस्य सुभाष पाटील यांनीही भाजपकडून प्रयत्न चालविले आहेत. प्राप्त माहितीनुसार गेल्यावेळी पराभव झालेले सुनील नेहेते इच्छुक आहेत.
भाजपने तळवेल-हतनूर गटातून पंचायत समिती सदस्य अरुण इंगळे तर वरणगाव-पिंप्रीसेकम गटातून सुधाकर जावळे, कुर्‍हे-वराडसीममधून सुनील नेहेते यांची नावे निश्चित केल्याचे वृत्त आहे. सेना कुर्‍हे (पानाचे)मधून किरण चोपडे व साकेगाव-कंडारीतून निर्मला निकम यांना संधी देणे शक्य आहे. त्या तुलनेत राष्ट्रवादी आपले पत्ते उशिराने उघडणार आहे. त्यामुळे एकमेकांच्या हालचालींवर नजर ठेवून राजकीय पक्षांच्या हालचाली सुरू असल्याचे तालुक्यातील चित्र आहे.