आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभुसावळ - वर्षभर 10 हजार युनिटचा वापर करून दीड लाख रुपयांचे वीजबिल थकवलेल्या ‘पोलो फॅमिली फॅशन मॉल’ने अखेर बिल भरले आहे. यामुळे वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरी मॉल चालकावर मेहेरबानी दाखवणार्या अधिकार्यांवर कारवाई गरजेची आहे. दरम्यान, याबाबत ‘दिव्य मराठी’ने 12 डिसेंबरच्या अंकात सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते.
प्रांताधिकारी कार्यालयासमोर पालिकेच्या जागेवर जानेवारी 2012 मध्ये पोलो फॅमिली फॅशन मेळा सुरू करण्यात आला होता. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या ठिकाणी प्रचंड रोषणाई केली होती. वीज वितरण कंपनीकडून यासाठी एक महिन्याच्या करारावर वीजजोडणी घेण्यात आली. या वेळी वीज वितरण कंपनीचे शहरात दोन वेगवेगळे उपविभाग होते. शहर उपविभाग-2 या कार्यालयातून 16 जानेवारी 2012 रोजी मॉलला तात्पुरते वीज क नेक्शन देण्यात आले. ‘पोलो’चे व्यवस्थापक शेख इस्लाम अब्दुल सलीम यांनी 8 हजार रुपये डिमांडनोट भरली होती. यानंतर महिना उलटला मात्र वीज वितरण कंपनीने पोलो शॉपिंगच्या मालकास वीजबिल दिले नाही. यानंतर तब्बल वर्षभर वीजपुरवठा सुरूच राहिला. फक्त एक महिन्याचा करार असताना बिल वसुलीकडे वीज वितरण कंपनीच्या अधिकार्यांनी मुद्दाम कानाडोळा केला. यामुळे मॉल चालकाने विजेचा पाहिजे तसा वापर केला.
मात्र, वीज वितरण कंपनीच्या पायलट प्रोजेक्टनंतर दोन उपविभागांचे विलीनीकरण झाले. तेव्हाच मॉल चालकावर कंपनीच्या काही अधिकार्यांची कशी मेहेरबानी आहे, हे बिंग फुटले. यानंतर वीज वितरण कंपनीने डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात या मेळ्याचे कनेक्शन कापून वर्षभर वीज वापरापोटी 1 लाख 60 हजार रुपयांचे बिल मॉल चालकास दिले. यापूर्वी 40 हजार रुपयांचे बिल देण्यात आले होते. त्यापैकी 28 हजार रुपये भरल्याचे मेळा मालकाने अधिकार्यांना सांगताच, ते सुद्धा अवाक् झाले.
दरम्यान, 1 लाख 60 हजार रुपयांचे वीजबिल पाहून मेळा चालकाने रात्रीतून सामान गुंडाळून पोबारा केला. वीज वितरण कंपनीच्या अधिकार्यांनी याबाबत मेळ्याचे व्यवस्थापक अझरुद्दीन रियाझोद्दीन (रा.पंजाब नॅशनल बँकेजवळ, मोरानीपूर, जि.झाशी यांना बोलवून लेखी जबाब घेतला होता.
मात्र, यानंतरसुद्धा प्रतिसाद न मिळाल्याने वीजबिल बुडण्याची शक्यता वाढली होती. तर दुसरीकडे झालेले नुकसान तत्कालीन अभियंत्याच्या खिशातून वसूल करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या. या वस्तुस्थितीबाबत ‘दिव्य मराठी’ने परखड वृत्त प्रकाशित केले. वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ पातळीवर हा विषय गांभीर्याने घेतल्याने ‘पोलो फॅमिली फॅशन मॉल’च्या मालकावर दबाव वाढला. परिणामी त्याने सोमवारी एक लाख रुपयांचे वीजबिल भरले.
त्या अधिकार्याची चौकशी
नियमावलीस बगल देवून तात्पुरते कनेक्शन देणे, मुदतीत वीजबिल वसूल न करणे, याप्रकरणी आता संबंधित तत्कालीन अभियंत्याची चौकशी होणार आहे. विलीनीकरण झाले नसते तर हे प्रकरण संपल्यात जमा होते. शहरात वीजगळतीमुळे भारनियमन वाढले आहे. दुसरीकडे मात्र वीज वितरण कंपनीचे काही कर्मचारी संगनमत करून वीजचोरीस पाठिंबा देत असल्याचे पोलो फॅशन मॉलच्या प्रकाराने उघड झाले होते. यापूर्वीच्या प्रकरणांची चौकशी केल्यास प्रकार उघडकीस येतील.
मुदतीनंतर भरले बिल
वीज वितरण कंपनीने फॅशन मेळ्याच्या चालकास तंबी देवून बिल दिले होते. बिल भरण्यासाठी महिन्याची मुदत होती. मात्र, त्याने मुदतीत बिल भरले नाही. याप्रक रणी आपण स्वत: प्रयत्न केले. मात्र, प्रकरण न्यायप्रविष्ठ होण्याचे समजताच मेळ्याच्या मालकाने एक लाख रुपयांचे वीजबिल भरले आहे. दोन दिवसांच्या सुटीवर असल्याने कंपनीने किती रुपयांचे बिल दिले हे मात्र माहीत नाही. डी.एस.धिवरे, उपकार्यकारी अभियंता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.