आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भुसावळ रेल्वे स्थानकावर ‘सीसीटीव्ही’ येणार; मुंबईला पाठवला प्रस्ताव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील सर्व स्थानकांवरील सुरक्षेचा आढावा आरपीएफ आयुक्त चंद्रमोहन मिश्र यांनी घेतला आहे. मोठय़ा स्थानकांवर नव्याने अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव त्यांनी मुंबईच्या कार्यालयाकडे पाठवला आहे. मंजुरीनंतर भुसावळ स्थानकावर 120 नवे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत.

मध्य रेल्वेचा भुसावळ विभाग अतिशय महत्वपूर्ण आहे. बडनेरापासून इगतपुरी आणि भुसावळ ते खंडवा, असे या विभागाचे कार्यक्षेत्र आहे. सर्व स्थानकांवर रेल्वे सुरक्षा बलाकडून सुरक्षा पुरवली जाते. तर मोठय़ा स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. मात्र, हे कॅमेरे गेल्या 10 वर्षांपासून लावलेले आहेत. भुसावळ रेल्वे स्थानकावर लावलेल्या कॅमेर्‍यांचे नियंत्रण फलाट क्रमांक एकवरील रेल्वे सुरक्षा बलाच्या कार्यालयातून होते. भुसावळ रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासह आरक्षण खिडकी, सर्वसाधारण तिकीट खिडकी, पादचारी पूल, मुसाफिर खान, लगेज स्कॅनर, प्लॅटफार्म, रेल्वेस्थानकाची उत्तर दिशा अशा 28 वेगवेगळ्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. दिवसभरातील फुटेजचे रेकॉर्डिंग केली जाते.

विभागातील सीसीटीव्हींची स्थिती
रेल्वेस्थानक कॅमेरे संख्या मॉनेटर
नाशिक रोड 22 4
मनमाड 24 4
जळगाव 14 3
भुसावळ 27 7
खंडवा 14 3
पाच स्थानकांवर एकूण 101 कॅमेरे, 21 मॉनेटर

कार्यालय हलवणार
भुसावळ जंक्शन स्थानकावरील रेल्वे सुरक्षा बलाचे कार्यालय सध्या फलाट क्रमांक एकवर आहे. हे कार्यालय अपूर्ण पडत असल्याने ते आता फलाट क्रमांक चारवर हलवण्यात येणार आहे.

42 इंची एलसीडी मॉनेटर
रेल्वेस्थानकावर नव्याने अत्याधुनिक 120 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा प्रस्ताव रेल्वे सुरक्षा बलाने दोन महिन्यांपूर्वी तयार केला होता. हा प्रस्ताव मुंबई कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. प्रस्तावाच्या मंजुरीनंतर भुसावळ स्थानकावर अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे आणि 42 इंच एलसीडी मॉनेटर बसवण्यात येणार आहे. पूर्वी बसवलेले मॉनेटर हे 17 इंची आहेत. 42 इंची एलसीडी मॉनेटरमुळे रेकॉर्ड केलेले फुटेज स्पष्ट दिसण्यास मदत होणार आहे.

241 जणांवर दंडात्मक कारवाई
आरपीएफच्या कारवाईत महिलांच्या डब्यातील पुरुष प्रवासी, अनधिकृत खाद्य पदार्थ विक्रेते, रूळ ओलांडणारे नागरिक, अपंग बांधवांच्या डब्यातून प्रवास करणारे अशा एकूण 241 जणांवर कारवाई झाली. आणखी आठवडाभर कारवाईची मोहीम सुरू ठेवली जाईल, असे आरपीएफ आयुक्त चंद्रमोहन मिश्र यांनी सांगितले.

महत्त्वाचे पाऊल
स्थानकांवरील सुरक्षेच्या दृष्टिने रेल्वे सुरक्षा बलाने सर्वच स्थानकांवर अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याला प्राधान्य दिले आहे. नव्या यंत्रणेमुळे महिनाभरातील चित्रीकरण साठवता येणे शक्य होणार आहे.
-चंद्रमोहन मिश्र, आयुक्त, रेल्वे सुरक्षा बल, मध्य रेल्वे भुसावळ