आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदमुक्त ‘टीसी’ पुन्हा कामावर; एडीआरएम बारापात्रेंविरुद्ध कर्मचार्‍यांची घोषणाबाजी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- रेल्वे तिकीट निरीक्षकांचे आंदोलन, पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर डीआरएम महेशकुमार गुप्ता यांनी शुक्रवारी पदमुक्त तिकीट निरीक्षक कृष्णकुमार लोधी यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे आदेश काढले. सकाळपासून डीआरएम कार्यालयात आंदोलन करणार्‍या कर्मचार्‍यांनी या निर्णयाचे टाळ्या वाजवून स्वागत केले.

मध्य रेल्वेच्या भरारी पथकाच्या कारवाईनंतर तिकीट निरीक्षक लोधी यांना पदमुक्त करण्यात आले होते. मुंबई येथील ‘कॅट’मधून पदमुक्तीला स्थगिती मिळाली असताना सुद्धा रेल्वे प्रशासनाने निर्णय कायम ठेवला होता. या नैराश्यातून लोधी यांच्या पंचवीस वर्षीय मुलीने 3 जुलै रौजी आत्महत्या केली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या 150 रेल्वे तिकीट निरीक्षकांनी शुक्रवारी सकाळी 11 वाजेपासून डीआरएम कार्यालय आणि एडीआरएम यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने केली.

या आंदोलनाची माहिती मिळताच, पालकमंत्री संजय सावकारे यांनी डीआरएम कार्यालय गाठले. डीआरएम महेशकुमार गुप्ता यांच्याशी चर्चा केली. नगरसेवक युवराज लोणारी, राजेंद्र आवटे, उदयसिंग काके, निर्मल कोठारी, पालकमंत्र्यांचे बंधू प्रमोद सावकारे यांनी सहभाग घेतला. चर्चेअंती डीआरएम गुप्ता यांनी लोधी यांना तत्काळ कामावर घेण्याचे आदेश दिले. वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक एन.जी.बोरीकर, रेल्वे सुरक्षा बलाचे उपायुक्त स्वामी, निरीक्षक अजय यादव, शहर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र मानकर आदी उपस्थित होते.

चेहर्‍यावर दु:खाची छटा
रेल्वे भरारी पथकाच्या कारवाईनंतर कृष्णकुमार लोधी यांना रेल्वे प्रशासनाने 20 जून रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. याविरुद्ध त्यांनी मुंबई येथे कॅटमध्ये अपील दाखल केले होते. कॅटने रेल्वे प्रशासनाच्या आदेशाला 28 जून 2013 स्थगिती दिली. मात्र, प्रशासनाने लोधी यांना 29 जून रोजी कामावरून पदमुक्त केले. या नैराश्यातून लोधी यांची मुलगी शिल्पा (वय 25) हिने 3 जुलैला राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारच्या आंदोलनानंतर लोधी यांना न्याय मिळाला. मात्र, मुलगी गेल्याचे दु:ख त्यांच्या चेहर्‍यावर जाणवत होते.

काके, तुम्ही शांत बसा
पालकमंत्री संजय सावकारे तिकीट निरीक्षकांसमोर उभे होते. त्या वेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक उदयसिंग काके यांनी भाषण सुरू केले. पाच रुपयांसाठी तिकीट निरीक्षकांवर कारवाई होते. दुसरीकडे मंत्री आणि पुढार्‍यांकडे लाखो रुपये जातात, असे त्यांनी वक्तव्य केले. या वेळी पालकमंत्र्यांनी त्यांना मध्येच थांबवत शांत बसण्याचा सल्ला दिला.

प्रदीप बारापात्रेंवर नाराजी
आंदोलनादरम्यान रेल्वे तिकीट निरीक्षकांनी एडीआरएम बारापात्रे यांच्या कार्यशैलीविषयी नाराजी व्यक्त केली. तर पालकमंत्र्यांनी बारापात्रेंवर कारवाईसाठी रेल्वे महाव्यवस्थापकांची भेट घेऊ असे सांगितले.

10 मिनिटे गुफ्तगू
कर्मचार्‍यांचे आंदोलन आणि लोधी यांना कामावर घेण्याचे आदेश दिल्यानंतर डीआरएम महेशकुमार गुप्ता, पालकमंत्री संजय सावकारे आणि कृष्णकुमार लोधी यांच्यामध्ये 10 मिनिटे गुफ्तगू झाले. या चच्रेचा तपशील मात्र गुप्त ठेवण्यात आला.

पालकमंत्र्यांचे समाधान
लोधीप्रकरणी पालकमंत्री सावकारे भेटण्यास आले होते. चर्चेअंती त्यांचे समाधान झाले. त्यांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्यांवर सकारात्मक चर्चा झाली. -महेशकुमार गुप्ता, डीआरएम, भुसावळ