आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकमंत्र्यांनी लक्ष घातल्यामुळेच भुसावळचा 'तो' जीवघेणा खड्डा बुजवला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- जवाहर नवोदय विद्यालयासमोर राष्ट्रीय महामार्गावरील जीवघेणा खड्डा अखेर बुजवण्यात आला. स्वत: पालकमंत्र्यांना या खाचखळग्यातून प्रवासाचा अनुभव आल्याने त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्ता दुरुस्तीचे आदेश दिले होते. केवळ ‘दिव्य मराठी’ने हा विषय परखडपणे मांडल्याचे मान्य करत अपघात होवू नये म्हणून दुरुस्ती गरजेची होती, अशा प्रतिक्रिया शहरवासीयांमधून व्यक्त होत आहेत.

जळगावकडून येताना, जवाहर नवोदय विद्यालयासमोरील रस्त्याच्या तोंडावर भलामोठा खड्डा पडला होता. किमान 15 ते 20 फूट लांबीचा आणि दीड फुटांपेक्षा जास्त खोलीचा हा खड्डा वाहनचालकांसाठी कर्दनकाळ ठरल्याबाबत ‘दिव्य मराठी’ने वारंवार वृत्त प्रसिद्ध केले. रस्त्याला पूर्णपणे व्यापून टाकलेल्या या खड्डय़ामुळे अवजड वाहने वळवताना होणारी कसरत, अपघाताचा वाढलेला धोका प्रशासनासमोर मांडला होता. शहरात प्रवेश करताना या रस्त्यावरील पालिकेचे पथदिवे बंद आहेत. परिणामी खड्डय़ाचा अंदाज न आल्याने चालकांची फसगत होवून अपघाताला सामोरे जावे लागले. आधीच खड्डय़ांमुळे जर्जर झालेल्या रस्त्यांवरून ये-जा करणार्‍या भुसावळकरांच्या वेदना या महाकाय खड्डय़ामुळे वाढल्या होत्या. पालिकेसह स्थानिक लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने खड्डा बुजवणे दूर साधी रस्त्याची डागडुजीसुद्धा रखडली होती.

जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव देवकर खासगी कामानिमित्त भुसावळात आले होते. राष्ट्रीय महामार्गाला लागूनच असलेला भलामोठा खड्डा पाहून त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना खड्डा बुजवण्याचे आदेश दिले. यानुषंगाने मंगळवारी सकाळी 10 वाजेपासून दुरुस्तीचे काम सुरू झाले. दरम्यान, रस्ता दुरुस्तीसारख्या एखाद्या किरकोळ कामामध्ये स्वत: पालकमंत्र्यांनी लक्ष घालून भुसावळकरांना दिलासा दिला. तसेच शहरातील इतर रखडलेल्या कामांसाठी त्यांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

दोन थरांचे काम
350 स्वेअरमीटर आकाराचा हा खड्डा तब्बल दीड फूट खोल होता. हा खड्डा बुजवून रस्त्याच्या लेव्हलपर्यंत आणण्यासाठी सुमारे 40 ब्रास खडी लागली. 50 एमएमचा बीएम आणि 25 एमएमचा एसडीबीसीचा थर टाकण्यात आला. मंगळवारी सकाळी जेसीबीसह 35 मजुरांना कामाला सुरुवात केली. ठेकेदार अश्विन अग्रवाल उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आदेशानुसार काम केले. सुमारे 15 लाख खर्च होईल, असे ते म्हणाले.

‘दिव्य मराठी’चे आभार
सुरक्षित वाहतुकीसाठी चांगले रस्ते असावेत. नवोदय विद्यालयासमोरील खड्डा जीवघेणा होता. ‘दिव्य मराठी’ने हा विषय लक्षात आणून दिल्याबद्दल आभार. सामाजिक प्रश्नांचा पाठपुरावा स्तुत्य आहे.
-गुलाबराव देवकर, पालकमंत्री, जळगाव