आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभुसावळ- मुख्य बाजारपेठेत रविवारी (दि. 20) निर्माण झालेला तणाव आपसी वादातून झालेला होता. सामंजस्याने ही समस्या सोडवता आली असती. मात्र, प्रकरण थेट दगडफेकीपर्यंत गेल्याने बाजारपेठ बंद झाली. केवळ व्यापारीच नव्हे, लहान-मोठे व्यवसाय करून चरितार्थ चालवणारे हॉकर्स बांधव या वादात विनाकारण होरपळले गेले. बाजारपेठेत कामधंदा करणार्या शेकडो कामगारांचा रोजगार बुडाला. किरकोळ कारणांवरून वारंवार होणार्या या घटना शहराला मोठय़ा उद्रेकाकडे घेवून जाणार्या आहेत. केवळ राजकीय फायद्याचा विचार आणि गुन्हेगारी प्रवृत्तीवर कोणताही दबाब नसलेली पोलिस यंत्रणा, हे दोन घटक याला अप्रत्यक्षपणे कारणीभूत आहेत.
सरकारी नोकरदारांची संख्या जास्त असल्याने सुमारे दोन लाख लोकसंख्येच्या भुसावळात व्यापार-उदीम बर्यापैकी बहरला आहे. सिंधी, मुस्लिम, लेवा-पाटीदार, जैन समाजातील अनेकांनी लहान-मोठे व्यवसाय थाटले आहेत. या समाजाव्यतिरिक्त कोणतीही व्यापारी पार्श्वभूमी नसलेल्यांनी लहान उद्योग सुरू करून मेहनतीने यश मिळवून स्वत:च्या रोजगारासह हजारो बेरोजगार हातांना काम दिले आहे. मात्र, व्यापार्यांना या-ना त्या कारणाने ‘टार्गेट’ करण्याच्या घटनासुद्धा वारंवार समोर येत आहेत. भुसावळच्या निकोप प्रगतीसाठी हे प्रकार बंद होणे गरजेचे असताना अपवाद वगळता बहुतांश पुढार्यांकडून मात्र राजकीय फायदा-नुकसानीच्या पलीकडे विचार होत नाही.
गुन्हेगारीचा वाढलेला आलेख आणि बहुभाषिक समुदायाची वस्ती असल्याने शहर आधीच संवेदनशील आहे, त्यामुळे बाजारपेठेत होणार्या वादांतूनसुद्धा संपूर्ण शहराची शांतता भंग होते. वास्तविक किरकोळ कारणांवरून झालेले वाद विसरुन प्रेमभावाला चालना देणे शक्य आहे. मात्र, जमावाच्या बळावर व्यापारीच नव्हे, तर संपूर्ण शहराला वेठीस धरण्याची ‘दादागिरी’ केवळ निष्क्रिय पोलिस यंत्रणा आणि राजकीय पोळ्या शेकणार्यांमुळे वाढल्याची व्यापारी-विक्रेत्यांची भावना आहे. व्यापारी पेठेतील समस्या सोडवणे ही पालिकेची जबाबदारी आहे. तर काही विशिष्ट हेतूने बाजारपेठेत वारंवार उपद्रव निर्माण करणार्यांचा बंदोबस्त करणे पोलिसांचे कर्तव्य आहे. दुर्दैवाने पालिका असो की पोलिस यादृष्टीने कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाही. नवरात्रीच्या कालावधीत दुकानांच्या कुलपांमध्ये एमसील भरणार्यांचा छडा अजूनही लागलेला नाही. ‘सत्ता आणि मतपेटी’चे राजकारण या सर्व घडामोडींमागे असल्याचे सुद्धा लपून राहिलेले नाही. कारण, बाजारपेठेत ज्या कारणांमुळे वारंवार तणाव होतो, ती अतिक्रमणाची समस्या सोडवण्यासाठी पालिकेने ‘बहाणेबाज प्रयत्नां’शिवाय ठोस कृती केली नाही. हॉकर्स झोनसाठी थेट जिल्हाधिकार्यांनी आदेश देवूनसुद्धा होणारे दुर्लक्ष केवळ ‘मतपेटी’ला बाधा पोहचू नये, या निष्कर्षाकडे घेवून जाणारे आहे.
हॉकर्स झोनची अंमलबजावणी केली तर हॉकर्स आणि अंमलबजावणी न केल्यास व्यापार्यांचा मोठा वर्ग दुरावण्याची शक्यता, ही दोन गृहितके या मागे आहेत. मात्र, सत्ताधारी म्हणून शहराच्या प्रगतीसाठी काही कटू निर्णय घेतल्यास एखाद्या वर्गापेक्षा त्याचा फायदा दोन लाख लोकसंख्येला होईल, असा व्यापक विचार अपेक्षित आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे होणारे वाद किरकोळ असले तरी जिल्हाभरात बदनामी मात्र भुसावळची होते,याचा विचार होणे अपेक्षित आहे.
बंदोबस्त मिळणार
रविवारी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ शहर व्यापारी असोसिएशन आणि जिल्हा पोलिस अधीक्षक एस. जयकुमार यांच्यामध्ये चर्चा झाली. दोषींवर कारवाई होईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. भविष्यात पुन्हा असे प्रकार होणार नाहीत, यादृष्टीने व्यापारी संकुलात गरजेच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त मिळणार आहे. अशोककुमार नागरानी, अध्यक्ष, भुसावळ शहर व्यापारी असोसिएशन
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.