आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल रिचार्जच्या क्षुल्लक कारणावरुन शहरात दगडफेक; मार्केट बंद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- शहरातील मुख्य बाजारपेठ भागात सिंधी व्यापारी आणि वाल्मीकनगरातील युवकांच्या दोन गटात मोबाइल रिचार्जच्या किरकोळ कारणावरून तुंबळ हाणामारी झाली. त्यानंतर झालेली दगडफेक व चाकू हल्ल्यात नऊ व्यापारी किरकोळ तर एक व्यापारी गंभीर जखमी झाला आहे. जखमींना उपचारार्थ जळगावात खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती शहरात पसरताच मुख्य बाजारपेठेतील सर्व दुकाने व्यापार्‍यांनी क्षणार्धात बंद केली.

बाबा तुलसीदास मार्केटमधील हरिओम मोबाइल शॉपीत रविवारी सकाळी 10 वाजता वाल्मीकनगर भागातील एक युवक मोबाइल रिचार्ज करण्यासाठी आला. त्याने 20 रुपयांचे मोबाइल रिचार्ज करण्यासाठी 500 रुपयांची नोट दुकानाचे मालक संजू दुधानी यांना दिली. मात्र, सुटे नसल्याचे दुधानी यांनी त्याला सांगितले. त्यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. तेथील काही सिंधी व्यापार्‍यांनी त्या युवकाला धक्काबुक्की केली होती. त्याचा रोष व्यक्त करण्यासाठी रविवारी दुपारी तीन ते सव्वातीन वाजेच्या दरम्यान वाल्मीकनगर भागातून 250 ते 300 जणांचा जमाव बाबा तुलसीदास व्यापार संकुलावर चाल करून आला. त्यातील बहुतांश जणांच्या हातात फायटर, हॉकीस्टीक, तलवार, चाकू, चॉपर, लोखंडी रॉडसह धारदार शस्त्रे होती. त्यांचा वापर करून या जमावाने हरेमाधव मोबाइल शॉपी, कृष्णा मोबाइल, सेल फॉर यु माोबाइल शॉपी आणि हरिओम मोबाइल शॉपीमधील काचेच्या कपाटांची मोडतोड केली. सपना मोबाइल या दुकानाचे काउंटर तोडून चार मोबाइलही लंपास झाले आहेत. अंड्याच्या दुकानाचीही नासधुस करून रस्त्यावरील मोटारसायकली फेकून दिल्या.

धुमश्चक्रीत 10 व्यावसायिक जखमी
बाबा तुलसीदास मार्केटमध्ये झालेल्या या धुमश्चक्रीत चहा विक्रेता किशोर कमनानी, बंटी नागदेव, इशांत रत्नानी, विक्की आहुजा, संजय दुधानी, मुन्ना कमनानी, आनंदराव वाधवानी, राजू कटेरा, हरेश बढेजा, रवी बढेजा यांच्यासह अन्य चार असे 10 जण जखमी झाले आहेत. नृसिंह मंदिराजवळ दोन्ही गट समोरासमोर भिडल्याने तुफान दगडफेक झाली. त्यानंतर बाजरपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रभाकर रायते हे सर्वप्रथम घटनास्थळावर पोहोचले. वारंवार सूचना करूनही जमाव पांगत नसल्याचे लक्षात येताच पोलिसांनी सौम्य लाठीमार सुरू केला. उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पानसरे यांनीही येथे स्वत: भेट देऊन जमावाला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांच्यासह आमदार संजय सावकारे यांनी मोडतोड झालेल्या दुकानांची पाहणी करून दोन्ही गटांना शांततेचे आवाहन केले.

नगरसेवक प्रकाश बतरा यांनी सिंधी व्यापार्‍यांची भूमिका पोलिसांसमोर स्पष्ट केली. चहा विक्रेता किशोर कमनानी याला जमावाने दोन्ही हातांवर लाठय़ांनी मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.

सिंधी व्यापार्‍यांनी रस्त्यावर मांडला ठिय्या
सिंधी व्यापारी बांधवांनी घटनास्थळी भेट देण्यासाठी आलेले आमदार संजय सावकारे यांना घेराव घालून व्यापार्‍यांना त्रास देणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली. जवाहर डेअरीसमोरच सिंधी समाजाच्या युवकांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले. आमदार सावकारे यांनी मध्यस्थी केल्यानंतर हे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. मारहाणीत किशोर कमनानी यांच्या पोटावर चाकूने वार करण्यात आले आहेत. तर मुन्ना मनवाणी यांच्या हाताची नस कापली गेल्याने त्यांना उपचारासाठी जळगावच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. किरकोळ जखमींवर शहरात उपचार झाले.

शांततेला गालबोट लावू नका : सावकारे
शहरात झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ पोलिस ठाण्यात रविवारी संध्याकाळी 6.30 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले. आमदार संजय सावकारे, पोलिस उपअधीक्षक विवेक पानसरे, निरीक्षक प्रभाकर रायते, अजय नागराणी, आशिकखान शेरखान, नईम पठाण, शफी पहेलवान, राकेश बग्गन, माजी नगरसेवक संतोष बारसे यांच्यासह सिंधी बांधवांनी बैठकीत सहभाग घेतला. शहराच्या शांततेला गालबोट लागू देवू नका, असे आवाहन आमदार संजय सावकारे यांनी या बैठकीत केले आहे.

शहरात आता पूर्वीसारखे दोन समाजात वाद होत नाही. त्यामुळे भुसावळची जिल्हाभरात चांगली प्रतिमा आहे. किरकोळ कारणावरून वाद होणे ही दुर्दैवी बाब आहे. दोन्ही समाजातील मंडळींनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी चांगले सहकार्य केले आहे. या पुढेही शहरात शांततेचे वातावरण कायम टिकवून ठेवण्यासाठी समन्वयाची भावना वृद्धींगत करणे गरजेचे असल्याचे आमदार सावकारे यांनी सांगितले.

व्यापार्‍यांनो, दुकाने सुरू ठेवा : मोहनानी
शहरात रविवारी मुख्य बाजारपेठेत किरकोळ कारणावरून झालेली दगडफेक आणि हल्ल्याची घटना दुर्दैवी आहे. मात्र, याचा निषेध म्हणून शहरातील बाजारपेठ बंद राहणार नाही. कोणत्याही स्थितीत शहरवासीयांना सेवा मिळण्यासाठी सोमवारी सकाळी पूर्वीप्रमाणेच दुकाने सुरू राहतील. व्यापार्‍यांनी धाडसीपणाने दुकाने सुरू ठेवावी, असे आवाहन भुसावळ शहर व्यापारी असोसिएशनचे सचिव विजय मोहनानी यांनी केले आहे.

बाजारपेठेत व्यापार्‍यांना किरकोळ कारणावरून वेठीस धरण्याचे प्रकार वाढले असल्याने ते निंदणीय आहेत. किरकोळ कारणांवरून रविवारी 300 जणांचा जमाव व्यापार्‍यांवर चालून आल्याने काही व्यापार्‍यांचे नुकसान झाले आहे. घटनेच्या निषेधार्थ पूर्ण बाजारपेठ बंद न ठेवता ज्या दुकानांची मोडतोड झाली आहे, ती पाच ते सात दुकाने बंद ठेवण्यात येतील. व्यापार्‍यांवर होणार्‍या हल्ल्यांबाबत विचारविनिमय करण्यासाठी सोमवारी सायंकाळी व्यापारी बांधवांची बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल, असेही भुसावळ शहर व्यापारी असोसिएशनचे सचिव विजय मोहनानी यांनी ‘दिव्य मराठी’शी दूरध्वनीवरून बोलताना सांगितले.