आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळात महामार्गाच्या डागडुजीसाठी सव्वा कोटी; अपघात कमी होणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- चौपदरीकरणापूर्वी राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजण्यासाठी नॅशनल हायवे अँथॉरिटी (नही) ने सव्वा कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. यासंदर्भात मंगळवारी ‘नही’चे प्रकल्प संचालक यू.जे.चामरगोरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले. या निधीतून जळगाव ते चिखली (ता. मुक्ताईनगर) शहरापर्यंत महामार्गाची डागडुजी होऊन अपघातांची संख्या कमी होईल. भाजपचे जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र चौधरी आणि ‘दिव्य मराठी’ने यासाठी वारंवार पाठपुरावा केला होता.

प्रत्यक्ष चौपदरीकरण सुरू होण्यापूर्वीच नशिराबाद (ता.जळगाव) ते चिखली (ता.मुक्ताईनगर) दरम्यान महामार्ग खड्डेमय झाला आहे. केवळ भुसावळ तालुक्यात वर्षभरात खड्डय़ांमुळे अपघात होऊन 20 पेक्षा जास्त बळी गेले. याबाबत जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र चौधरी यांनी ‘नॅशनल हायवे अँथॉरिटी’ कडे तक्रार केली होती.

सोमवारी रात्री मोहंमदपुरा नाल्यावर खड्डय़ामुळे अपघात होऊन ट्रक थेट पुलाखाली पडला. अपघातामध्ये चालकाचा जीव गेला. या मुळे संतप्त चौधरी आणि कार्यकर्त्यांनी महामार्ग विभागाला रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याची दखल घेऊन ‘नही’च्या प्रकल्प संचालकांनी महामार्गाची पाहणी केली.

निधी वर्ग झाल्यावर टेंडर
राष्ट्रीय महामार्गाच्या डागडुजीचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग (महामार्ग)विभागास दिल्यास या कामास दोन महिन्यांचा कालावधी लागेल. यासाठी प्रथम 100 टक्के निधी महामार्गाकडे वर्ग करून टेंडर काढण्यात येईल. याउलट एल अँड टी कंपनीकडे डागडुजीचे काम दिल्यास चौपदरीकरणाच्या कराराप्रमाणे केवळ वर्क ऑर्डर देऊनही डागडुजी करता येईल. प्राधिकरणाच्या दिल्ली कार्यालयातील आदेशानुसार हे काम बांधकाम विभागाला देण्याचे सूचित करण्यात आले आहे.

सातत्याने पाठपुरावा
चौपदरीकरणापूर्वी महामार्गाची दुरुस्ती व्हावी, यासाठी पाठपुरावा केला. ‘दिव्य मराठी’ने वास्तव मांडले. शेवटी महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक यू.जे. चामरगोरे यांना स्पॉट व्हिजिट करणे भाग पडले. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या सहकार्यामुळे महामार्ग दुरुस्तीसाठी सव्वा कोटी मंजूर झाले आहे.
-राजेंद्र चौधरी, सदस्य, जिल्हा परिषद (भाजप)

ही होती प्रमुख अडचण
खड्डय़ांमुळे जर्जर झालेल्या राष्ट्रीय महामार्गावर 1 एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान अपघातांमध्ये 20 बळी गेले. भुसावळ तालुक्यात केवळ 24 किलोमीटरच्या अंतरात जागोजागी डेंजर झोन निर्माण झाले. तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग केल्याचे सांगितले. तर महामार्ग विभागाने एल अँड टी कंपनीकडे बोट दाखवले. आता लोकप्रतिनिधी आणि ‘दिव्य मराठी’च्या पाठपुराव्यानंतर प्राधिकरणालाच दुरुस्ती करावी लागणार आहे.

बांधकाम विभागाला काम
राष्ट्रीय महामार्गाची स्पॉट व्हिजिट केल्यानंतर दिल्ली येथील महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात वरिष्ठांशी संपर्क साधला. एकाच दिवसात सव्वा कोटींचा निधी महामार्गाच्या दुरुस्तीसाठी मंजूर झाला आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्रव्यवहार केला आहे. लवकरच महामार्ग डागडुजीचे काम सुरू होईल.
-यू.जे.चामरगोरे,प्रकल्प संचालक, महामार्ग प्राधिकरण

कामाला सुरुवात होणार
‘नही’ चे प्रकल्प संचालक यू.जे.चामरगोरे यांनी मंगळवारी दुपारी भुसावळ ते चिखलीदरम्यान प्रत्यक्ष पाहणी केली. फुलगावजवळ चौधरींसोबत चर्चा केली. मात्र, चौधरींनी दुरुस्ती सुरू न झाल्यास रास्ता रोकोची भूमिका कायम ठेवली. या मुळे धास्तावलेल्या ‘नही’च्या अधिकार्‍यांनी थेट दिल्ली येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात संपर्क साधला. या वेळी डागडुजीसाठी तातडीने सव्वा कोटी रुपये मंजूर करण्यात आले. बुधवारी प्राधिकरणाने चौपदरीकरणापूर्वी खड्डय़ांची डागडुजी करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग (उत्तर भाग) ला देण्याबाबत पत्र काढले. येत्या पंधरवड्यात डागडुजीला सुरुवात होईल.

भुसावळ तालुक्याला दिलासा
महामार्गाच्या चौपदरीकरणापूर्वी डागडुजीसाठी सव्वा कोटी रुपये मंजूर झाले. या मुळे भुसावळ तालुक्याला दिलासा मिळेल. तालुक्यातील साकेगाव ते जाडगावफाटा दरम्यान महामार्ग अत्यंत खराब झाला असून दुरुस्तीनंतर अपघातांचे प्रमाण कमी होऊन वाहनचालकांना दिलासा मिळेल.

येथे सर्वाधिक त्रास
भुसावळ तालुक्यातून गेलेल्या महामार्गावर प्रामुख्याने साकेगाव पुलापासून भुसावळ शहरातील नवोदय विद्यालय ते साकरी फाटा, फुलगाव ते वरणगाव, हिरा मारोती मंदिरापासून ते जाडगावफाटा दरम्यान महामार्गाची स्थिती शेतरस्त्याप्रमाणे झाली आहे.