आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhusawal Sent Allowances School Student Ansh Pillay Long Drive

इच्छाशक्तीपुढे आकाश ठेंगणे; अपंग अंश पिल्लेचा लाँग ड्राइव्ह!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- अपंगत्वाचा बाऊ न करता, आहे त्या परिस्थितीवर मात करून यश मिळवणारे तसे दुर्मीळच. मात्र, भुसावळातील सेंट अलॉयसेस हायस्कूलचा इयत्ता सातवीचा विद्यार्थी अंश देवेंद्र पिल्लेची यादृष्टीने वाटचाल सुरू आहे. दोन्ही पायाला अपंगत्व असूनही अंशने जलतरणामध्ये गगनभरारी घेतली आहे. ठाण्यातील स्पर्धा गाजवल्यानंतर तो बंगरुळुमध्ये होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. भुसावळमधील तो एकमेव सागरी जलतरणपटू आहे.

शहरातील औषधांचे होलसेलर देवेंद्र पिल्ले यांचा मुलगा अंश याच्या दोन्ही पायांना जन्मत:च अपंगत्व आले. मुलाचे भविष्य कसे असेल? याबद्दल पालकांना चिंता होतीच. मात्र, मुळातच संघर्षमय स्वभाव असलेल्या देवेंद्र पिल्ले यांनी अंशवर मुंबई आणि जबलपूर येथे वेगवेगळ्या शस्त्रक्रिया केल्या. शस्त्रक्रियेनंतर अंशचा एक पाय चालण्यायोग्य झाला. दुसर्‍या पायाला 40 टक्के अपंगत्व कायम होते. यावर उपाय म्हणून पिल्ले यांनी अंशला पोहणे शिकवले. कधी बियाणी मिलिटरी स्कूलमधील जलतरण तलाव, तर कधी तापीनदीमध्ये सूर मारणार्‍या अंशने तिसरीपासून जलतरण स्पर्धांमध्ये सहभाग घेणे सुरू केले. आता तर जलतरण हीच अंशची ओळख झाली आहे.

आता अंश सेंट अलॉयसेसचा सातवीचा विद्यार्थी आहे. गेल्या आठवड्यात (2 ऑक्टोबर) अंधेरीमध्ये अपंगांसाठी 8 वी पॅराऑलिम्पिक राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा झाली. महाराष्ट्रातील 250 स्पर्धकांच्या तुलनेत अंशची कामगिरी चमकदार ठरली.

सवरेत्कृष्टचा बहुमान
अंधेरीतील स्पर्धेत अंशची कामगिरी सर्वात चमकदार ठरली. ‘सवरेत्कृष्ट जलतरणपटू’ चा मान मिळण्यासह सबज्युनिअर गटामध्ये एस-5 प्रकारात (50 मीटर) फ्री-स्टाइल, बॅकस्ट्रोक आणि बटरफ्लाय प्रकारात सुद्धा पहिला क्रमांक पटकावला. शिवाय बेस्ट स्ट्रोक प्रकारात अंश दुसरा आला. त्याच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.

अपंगत्वामुळे न्यूनगंडाची भावना रुजण्यापूर्वीच पालकांनी मुलांना प्रोत्साहन द्यावे. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यापासून थांबवू नये. विशेषत: पालकांनी मुलांसाठी अधिक वेळ द्यावा.
-देवेंद्र पिल्ले, अंशचे वडील, भुसावळ