आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसस्थानकावर चोरट्यांचा उपद्रव; महिला मदत केंद्र बेवारस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- सुरक्षेसाठी सार्वजनिक ठिकाणी महिलांना मदत करणारी पोलिस यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, शहरातील बसस्थानकावर महिलांच्या मदतीसाठी उभारण्यात आलेल्या पोलिसांच्या महिला मदत केंद्रालाच मदतीची गरज असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बसस्थानकावरील महिला प्रवाशांच्या सुरक्षेबाबतची पोलिस प्रशासनाची कार्यतत्परताही चव्हाट्यावर आली आहे. बसस्थानकावर चोरट्यांचा उपद्रवही वाढला आहे.

देशात सध्या महिला सुरक्षेचा मुद्दा गाजत आहे. दिल्लीतील अत्याचाराच्या घटनेने सर्वत्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनातर्फे अत्याचाराच्या घटनांवर प्रतिबंध घालण्यासाठी सुरक्षेच्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. मात्र, भुसावळ शहर व परिसरातील महिलांची सुरक्षा आजही वार्‍यावरच असल्याची वस्तुस्थिती यानिमित्ताने उघड झाली आहे.

रेल्वेचे जंक्शन स्थानक असलेल्या या शहरात रेल्वेस्थानकासह येथील बसस्थानकावरही प्रवाशांचा सतत राबता असतो. यामध्ये नोकरीनिमित्त तसेच बाहेरगावी जाणार्‍या महिला प्रवाशांची संख्यादेखील लक्षणीय असते. अनेक वेळा प्रवाशी महिलांना प्रवासात अडचणी निर्माण होतात. यासाठी त्यांना तत्काळ मदत मिळावी. तसेच रात्री-अपरात्री येणार्‍या महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बसस्थानकावर महिला मदत केंद्र उभारण्याचे आदेश देण्यात आले. आदेशानुसार बसस्थानकावर पोलिस प्रशासनातर्फे महिला मदत केंद्र उभारण्यात आले. मात्र, हे महिला मदत केंद्र नेहमी बंदावस्थेत असते. तसेच बसस्थानकावरही महिला पोलिसांचीदेखील अनुपस्थिती असते. त्यामुळे महिला प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली आहे. यासंदर्भात पोलिस प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे.

बसस्थानकावर महिला पोलिस नाहीत
भुसावळ बसस्थानकावर महिला मदत केंद्र उभारण्यात आले आहे. मात्र, केंद्रावर अथवा बसस्थानक परिसरात एकही महिला पोलिस नसल्याने अडचणीच्यावेळी महिलांनी कुणाकडे मदत मागावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे डीवायएसपींनी लक्ष द्यावे, असा सूर आहे.

मदत केंद्राला पडला विळखा
बसस्थानकावरील महिला मदत केंद्रावर 24 तास महिला पोलिसांची उपस्थिती आवश्यक आहे. मात्र, हे केंद्र सतत बंदच राहत असल्याने केंद्राला लाकडी पेट्या व मोटारसायकलींचा गराडा असतो.

दोन पोलिस
बसस्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी केवळ दोन पुरुष पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. आवश्यकता असल्यास जादा पोलिसांची मागणी पोलिस मुख्यालयात केली जाते.
- ताराचंद पाटील, आगारप्रमुख, भुसावळ