आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफलातून कारभार: तहसील कार्यालयात बनवेगिरीचा ‘सेतू’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रातून नायब तहसीलदारांच्या बनावट स्वाक्षरींचे दाखले वितरित होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अर्थात, येथे दलालांचा सुळसुळाट असल्याच्या विषयावर आता या प्रकारामुळे शिक्कामोर्तब झाले आहे.

दहावी-बारावीच्या परीक्षांचा निकाल लागल्याने नवीन शैक्षणिक वर्षात जातप्रमाणपत्र, नॉन क्रिमीलिअर, डोमेसाइल, राष्ट्रीयत्व, उत्पन्नाचे दाखले मिळवण्यासाठी विद्यार्थी-पालकांची धडपड सुरू आहे. मात्र, तहसील कार्यालयातील सेतू सुविधा कक्षातून निर्धारित वेळेत दाखले मिळत नसल्याची ओरड आहे. याचा गैरफायदा घेऊन येथे दाखले मिळवून देण्यासाठी दलाल सक्रिय झाले आहेत. एवढेच नव्हे तर दाखल्यांवर नायब तहसीलदारांच्या बनावट सह्या करून परस्पर दाखल्यांचे वितरण होत असल्याचेही समोर आले आहे. दलालांच्या मुसक्या आवळण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे गरजेचे असल्याचा सूर आता उमटत आहे. काही दलाल अर्जदारांना सेतू सुविधा कक्षाच्या बाहेर गाठून एका दाखल्यासाठी 100 ते 1 हजार रुपये उकळतात. गेल्या दोन दिवसात नायब तहसीलदार व्ही.पी.चौधरी यांनी बनावट स्वाक्षरी असलेले सहा दाखले जमा केले आहेत. या प्रकारामुळे दलालांच्या वावरावर शिक्कामोर्तब झाले आहे.

संशयास्पद दाखले जमा करणे सुरू
सेतू सुविधा कक्षातून वितरित होणार्‍या दाखल्यांवर बनावट स्वाक्षर्‍या केल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. संशयास्पद दाखले जमा करण्यात येत आहेत. भविष्यात या प्रकाराबाबत थेट पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे प्रयत्न आहेत. सेतू सुविधा कक्षात आगामी काळात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी पाठपुरावा करू.
-व्ही.पी.चौधरी, नायब तहसीलदार, भुसावळ

काळजी घेण्याचा आमचा प्रयत्न
सेतू सुविधा कक्षातून दाखले वितरित करताना पुरेपूर काळजी घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. कक्षाच्या बाहेरील आवारात जर कोणी काही गैरप्रकार करीत असेल तर त्याची जबाबदारी आमची नाही. दाखल्यांच्या नोंदीचे रजिष्टर मंगळवारी संध्याकाळी नायब तहसीलदारांकडे जमा केले आहे.
-नीलेश कोलते, व्यवस्थापक, सेतू सुविधा कक्ष, भुसावळ

अर्जांच्या संख्येत वाढ
दहावी-बारावीच्या परीक्षांचा निकाल लागल्याने आता शैक्षणिक कामासाठी लागणारे दाखले तत्काळ मिळावे, यासाठी विद्यार्थी व पालकांचे प्रयत्न सुरू आहेत. परिणामी सेतू सुविधा कक्षात येणार्‍या अर्जांच्या संख्येत नेहमीपेक्षा दुपटीने वाढ झाली आहे. सोमवारी उत्पन्नाचे 223, डोमेसाइल 53, राष्ट्रीयत्वाचे 35, नॉनक्रिमीलेयरचे 125 अर्ज दाखल झाले.

नायब तहसीलदार दक्ष
भुसावळचे निवासी नायब तहसीलदार बी.एस.वानखेडे यांची बोदवड येथे बदली झाली आहे. त्यांच्याकडील पदभार आता व्ही.पी.चौधरी यांच्याकडे देण्यात आला आहे. सेतू सुविधा कक्षाच्या आवारात उभ्या असलेल्या काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी बाहेर बनावट स्वाक्षर्‍यांचे दाखले वितरीत केले जात असल्याची माहिती त्यांना दिली. त्यानंतर त्यांनी खातरजमा करण्यासाठी सोमवारी काही दाखले जमा केले. त्यात त्यांना या दाखल्यांवर निवासी नायब तहसीलदार म्हणून बनावट स्वाक्षर्‍या केल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे.