आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चांगले प्रयत्न: भुसावळचे जलशुद्धीकरण केंद्राचे नूतनीकरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- पालिकेच्या कालबाह्य जलशुद्धीकरण केंद्रातील सातत्याचे बिघाड थांबवण्यासाठी त्याच्या नूतनीकरणाचे प्रयत्न सुरू आहेत, यासाठी पाटबंधारे विभागाच्या सेवानिवृत्त तज्ज्ञ अभियंत्यांची मदत घेण्यात येईल. मुख्याधिकारी अनिल जगताप आणि पाणीपुरवठा अभियंता अनिल बी. चौधरी यासाठी प्रयत्नशील आहेत.

जीवन प्राधिकरण विभागाने 1958 मध्ये शहरात जलशुद्धीकरण केंद्र उभारले होते. सन 1988 मध्ये या केंद्राला 30 वष्रे पूर्ण झाली. हे केंद्र कालबाह्य होऊन आता तब्बल 25 वर्षे लोटली आहेत. तत्पूर्वी, सन 1992 मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष देवीप्रसाद शर्मा यांनी ही योजना पालिकेच्या ताब्यात घेतली होती. आधीच कालबाह्य झालेली यंत्रणा पालिकेने ताब्यात घेतल्याने उपकरणांची स्थिती जास्त खालावली.

सध्या पंप नादुरुस्त होण्यापासून ते क्लोरिफाक्युरेटर गाळाने भरण्यापर्यंतचे प्रकार वाढले आहेत. परिणामी पाणीपुरवठा विस्कळीत होतो. उन्हाळ्यात तर तापीचे मुबलक पाणी असताना नागरिकांना भटकंती करावी लागते. अशुद्ध पाणीपुरवठय़ाची समस्याही नित्याची झाली आहे. यावर उपाय म्हणून पालिकेने जीवन प्राधिकरण विभागाकडे 180 कोटी रुपये खर्चाचा नवीन जलशुद्धीकरण केंद्राचा प्रस्ताव पाठवला होता. याबाबत फारसा प्रतिसाद न मिळाल्याने आता कालबाह्य जलशुद्धीकरण केंद्राच्या नूतनीकरणासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.


दरडोई पाणीपुरवठय़ात वाढ
> 17 हजार भुसावळ शहरातील नळ कनेक्शन
> 2 कोटी 20 लाख लिटर पाण्याची दररोज गरज
> 2 कोटी 50 लाख लिटर पाण्याची तापीतून उचल
> 100 लिटर दरडोई पाणीपुरवठा
> 4 कोटी 50 लाख नूतनीकरणासाठी अंदाजित खर्च
> 130 लिटर पाणी दरडोई मिळेल

चेंबरमुळे वाढल्या अडचणी
जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रियेनंतर गाळमिर्शीत 30 टक्के पाणी नदीपात्रात सोडले जाते. यासाठी दीड किलोमीटर अंतराचे चेंबर तयार करण्यात आले आहे. या चेंबरमध्ये गाळ वाढल्याने ते चोकअप होऊन पाणीपुरवठा यंत्रणा ठप्प होते.

मुबलक, शुद्ध पाणी
शहराला पाणीपुरवठा करणार्‍या नगरपालिकेच्या कालबाह्य जलशुद्धीकरण केंद्राच्या नूतनीकरणाचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी तज्ज्ञ सल्लागारांना भेटलो होतो. त्यांच्या प्रत्यक्ष पाहणीनंतर समोर येणार्‍या मुद्दय़ांवर काम करू.त्या अनुषंगाने प्रयत्न सुरू आहेत. जलशुद्धीकरण केंद्राच्या नूतनीकरणानंतर शहरवासीयांना मुबलक व शुद्ध पाणीपुरवठा होईल.
-अनिल जगताप, मुख्याधिकारी, भुसावळ

असा होईल फायदा
जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता 60 हजार नागरिकांना पाणीपुरवठय़ाची होती. यानंतर 1983 मध्ये पालिकेने त्याचा विस्तार करून क्षमता 1 लाख 40 हजार लोकसंख्येऐवढी केली. तसेच शहराचा सातत्याने विस्तार होऊन आता लोकसंख्या 1 लाख 90 हजारापर्यंत पोहोचली असली तरी कालबाह्य जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता जैसे थे आहे. मात्र, नूतनीकरणानंतर शहरवासीयांना दरडोई 130 लिटर शुद्ध पाणीपुरवठा येईल, असा पालिका प्रशासनाचा दावा आहे.

पंधरवड्यात पाहणी
जलशुद्धीकरण केंद्राच्या नूतनीकरणासाठी नाशिक येथील पाटबंधारे विभागातील निवृत्त अधीक्षक अभियंता शिरीष कर्डीले यांची मदत होणार आहे. यासाठी मुख्याधिकारी अनिल जगताप आणि पाणीपुरवठा अभियंता ए.बी.चौधरी यांनी नुकतीच कर्डीले यांची भेट घेतली. पंधरवड्यात कर्डीले हे जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करणार आहेत.