आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्यासाठी व्यासपीठावर पादत्राण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - नगरपालिकेची दहावी सर्वसाधारण सभा बुधवारी चांगलीच गाजली. सभा सुरू होण्यापूर्वीच सत्ताधारी गटाच्या नगरसेविका यांनी गडकरीनगरातील जलकुंभातून पाणीपुरवठा अजून का सुरू केला नाही? असा जाब प्रभारी मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांना विचारला. एवढय़ावरच न थांबता त्यांनी थेट पायातील चप्पल उगारून थेट व्यासपीठावर ठेवली. यानंतर सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांच्या प्रचंड गोंधळातच 35 विषयांना मंजुरी देत सभा गुंडाळण्यात आली. तत्पूर्वी, गोंधळामुळे पीठासीन अधिकारी तथा अध्यक्ष उमेश नेमाडे यांना पाच मिनिटांसाठी कामकाज तहकूब ठेवावे लागले.

सभेच्या सुरुवातीस आमदार संजय सावकारे यांच्या अभिनंदनाचा ठराव नेमाडे यांनी मांडला. विषय पत्रिकेचे वाचन करण्यापूर्वीच नगरसेविका नंदा निकम यांनी थेट व्यासपीठाकडे धाव घेतली. थेट चप्पल उगारून विषय पत्रिकेच्या वाचनाचे काम थांबविले. पीठासीन अधिकार्‍यांच्या टेबलवरच चप्पल ठेवल्याने विरोधी गटातील नगरसेवकांनी सभागृहाची प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी चप्पल खाली ठेवण्याची मागणी केली. गडकरीनगरातील जलकुंभातून अजूनही पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने प्रभारी मुख्याधिकार्‍यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. पाणीप्रश्न ी विरोधी आणि सत्ताधारी नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सभेचे कामकाज पुन्हा सुरू होताच स्वीकृत नगरसेवक जगन सोनवणे यांनी 35 विषय बहुमताने मंजूर असल्याचे सांगून सभा गुंडाळली. विरोधी गटाने यावर आक्षेप घेतला.

अशी गाजली सर्वसाधारण सभा
* संपूर्ण शहरातच पाण्याची बोंबाबोंब असल्याचे प्रमोद नेमाडेंचा आरोप
* नगराध्यक्षांच्या दालनात संतोष चौधरी आणि हेमराज भोळेंत जुंपली
* दहाव्या सभेसाठी सभागृहात बाजारपेठ पोलिसांचा तगडा बंदोबस्त
* बजेटची मंजुरी दाखवा अन्यथा सभा थांबवा, दिनेश राठींची मागणी
* तहकूब काळातच सोनवणेंनी विषय मंजूर केल्याचा किरण कोलतेंचा आरोप
* सत्ताधारी असूनही विरोधकांसारख्या वागणुकीचा राजेंद्र आवटेंचा आरोप
* सत्ताधारी गटाचे युवराज लोणारींनी केली सभेत अर्थसंकल्पाची मागणी
* नगराध्यक्ष लग्नसमारंभांसाठी सुटी घेत असल्याचा वसंत पाटलांचा आरोप
* विरोधी गटाच्या महिला आक्रमक नगरसेविकांनीही व्यक्त केली नाराजी
* विषय मंजुरीनंतर उसळली गर्दी, गोंधळाने सभागृह दणाणले

प्रचंड गोंधळात झडल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
पालिकेने 100 कोटींचा अर्थसंकल्प जिल्हाधिकार्‍यांकडून मंजूर केला आहे. या प्रती सर्वच नगरसेवकांना देऊ. बहुमतामुळे सत्ताधारी गटाने सर्व विषय मंजूर केले. त्यास अनुमोदनही देण्यात आले आहे. बी.टी.बाविस्कर, मुख्याधिकारी, भुसावळ पालिका

अर्थसंकल्पात तरतूद न करता बैठक झाली. एकच नगरसेवक 35 विषयांना मंजुरी आणि अनुमोदन देऊ शकत नाही. या बैठकीतही हाच प्रकार झाल्याने ही सभा रद्द करून नव्याने सभा घेण्यात यावी. नियमानुसार ही सभा ग्राह्य होत नाही. प्रा.दिनेश राठी, नगरसेवक

पाणीप्रश्न सोडविण्यासाठी रॉ वॉटर हाऊसमधील पंप बदलवण्यात येणार आहेत. यासाठी सभेत ठरावही करण्यात आला. भविष्यात शहरवासीयांना मुबलक पाणी मिळेल. यासाठी पालिका प्रशासनाचे नियोजन आहे. उमेश नेमाडे, नगराध्यक्ष

मुख्याधिकार्‍यांनी टाकीतील गाळ काढला. मात्र, जलकुंभ सुरू केला नाही. लोक आम्हाला जाब विचारतात. पाणीप्रश्न सुटण्यासाठी गडकरीनगरातील जलकुंभ पूर्ववत होणे आवश्यक आहे. अन्यथा आंदोलन करण्यात येईल. नंदा निकम,नगरसेविका