आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंपचोरीप्रकरणी झाडाझडती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - पालिकेच्या जलशुद्धिकरण केंद्रातून सुमारे 30 लाख रुपये किमतीचे उच्चशक्तीचे तीन पंप गायब झाले आहेत. या प्रकरणी जिल्हाधिकार्‍यांनी चार सदस्यीय समितीचे गठण केले आहे. समिती सदस्यांनी शनिवारी पालिकेच्या जलशुद्धिकरण केंद्रात पावणेदोन तास झाडाझडती घेत वीजपंप ठेवलेल्या जागेची पाहणी केली.

वीजपंप गायब झाल्याप्रकरणी भुसावळ म्युनिसिपल पेंशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष एस.एल.पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांपासून थेट नगरविकास विभागापर्यंत तक्रारी केल्या. आठ दिवसांपूर्वी नाशिक विभागीय आयुक्त रवींद्र जाधव यांच्यासमोर हा विषय उपस्थित केला. यानंतर जाधव यांनी जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर आणि जिल्हा पोलिस अधीक्षक एस.जयकुमार यांना कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. तत्पूर्वी, पालिकेने वीजपंप चोरीप्रकरणी गठित केलेल्या दोन सदस्यीय समितीने पंप चोरीस गेलेले नाही, असा अहवाल दिला होता. मात्र, हा अहवाल राजकीय दडपणातून तयार झाल्याची कुजबूज झाल्याने जिल्हाधिकार्‍यांनी जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता आर.एच.जैन, जीवन प्राधिकरणच्या यांत्रिकी विभागाचे उपअभियंता एल.व्ही.लोहार, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्रा.ए.एस.झोपे आणि जिल्हा प्रकल्प अधिकारी बी.टी.बाविस्कर या चार सदस्यीय समितीचे गठण केले. या समितीने शनिवारी जलशुद्धिकरण केंद्रात जाऊन चौकशी केली. बंद कक्षात चौकशीदरम्यान शहर पोलिस ठाण्याचे सहा कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते. निरीक्षक दिलीप पगारे यांनी भेट देऊन पाहणी केली.

जिल्हाधिकार्‍यांना अहवाल
पहिल्या टप्प्यात चौकशीचे काम पूर्ण केले. व्हिडिओ शूटिंग करून अहवाल जिल्हाधिकार्‍यांना सादर केला आहे. पुढील टप्प्यात प्रत्यक्ष पाहणी व चौकशी होईल. बी.टी.बाविस्कर, प्रकल्प अधिकारी तथा समिती सदस्य
आवश्यक कागदपत्रे दिली
चौकशी समितीला आवश्यक कागदपत्रे दिली. जीवन प्राधिकरण विभागाकडून पाणीपुरवठा योजना ताब्यात घेतली तेव्हाचे दस्तऐवज देण्यात आले. समितीच्या निर्देशाप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता होईल. अनिल जगताप, मुख्याधिकारी, भुसावळ

घेतली झाडाझडती
समितीच्या चारही सदस्यांनी जलशुद्धिकरण केंद्रात शनिवारी सकाळी 11 वाजून 40 मिनिटांनी प्रवेश केला. 11 वाजून 45 मिनिटांपासून दुपारी 1 वाजून 30 मिनिटांपर्यंत मुख्याधिकारी अनिल जगताप, पाणीपुरवठा अभियंता ए.बी.चौधरी यांच्याकडून माहिती घेत डेडस्टॉक रजिस्टर, देखभाल रजिस्टर आणि साहित्य खरेदी पुस्तिकेची मागणी केली. पालिका प्रशासनाकडून हे रजिस्टर नसल्याचे सांगण्यात आले. पुढे तीन टप्प्यात ही चौकशी होणार आहे.

नगरपालिकेच्या जलशुद्धिकरण केंद्राला भेट देऊन माहिती घेताना प्रकल्प अधिकारी तथा चौकशी समितीचे सदस्य बी.टी.बाविस्कर आदी.