आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळ: मैत्रिणीचे नाव घेतो, या कारणावरून मारहाण; तरुणाचा जागीच मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ-  मैत्रिणीचे नाव घेतो, या कारणावरून केलेल्या मारहाणीत सोमनाथनगरातील भूषण मुरलीधर कोळी (वय ३२) या तरुणाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना मंगळवारी रात्री ११ वाजता घडली. याप्रकरणी पोलिसांनी प्रशांत उर्फ प्रकाश छोटूलाल गुप्ता याला ताब्यात घेतले. तत्पूर्वी, गुप्ता त्याच्या मित्रांनी मारहाणीत बेशुद्ध पडलेल्या भूषणला घेवून दोन खासगी दवाखाने गाठले. मात्र, उपयोग झाला नाही. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेतील आरोपी प्रशांत गुप्ता हा दोन वर्षापासून एका खासगी हॉटेलात कामाला होता. त्याच्या मैत्रिणीची बदनामी केल्याच्या जाब विचारण्यासाठी प्रशांत, त्याचा मित्र कोमल भोळे याला घेवून मंगळवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास आनंदनगरातील वृषभ वायकोळे याच्याकडे गेला. येथून तिघांनी श्रद्धानगरमध्ये अश्विन लोखंडे या मित्राचा रहिवास असलेला परिसर गाठला. यादरम्यान प्रशांतने सोबतच्या दोघांना भूषण कोळी हा मैत्रिणीला त्रास देतो. त्याला समज द्यायची आहे, असे सांगितले. यानंतर प्रशांतने सोमनाथनगरातील पिठाच्या गिरणीजवळ अश्विन लोखंडे याला बोलावून घेत भूषणला कॉल करून बोलावण्यास सांगितले. कॉल केल्यानंतर अश्विन जेवणाचे कारण सांगून घरी निघून गेला. यानंतर १०.४५ वाजेच्या सुमारास भूषण पिठाच्या गिरणीजवळ आला. येथे प्रशांतने त्याला कोमल, वृषभपासून बाजूला नेत कानशिलात लगावल्या. तसेच पाठीवर खुब्याने मारहाण केली. यामुळे जमीनीवर पडलेल्या भूषणच्या डोक्याला पत्रीशेडला लावलेला लोखंडी पाइप लागला. दरम्यान, मारहाणीत भूषण बेशुद्ध पडल्याचे पाहून तिघांनी त्याच्या चेहऱ्यावर पाणी मारले. मात्र, प्रतिसाद मिळाल्याने तिघांनी एकाच दुचाकीवरून भूषणला आनंदनगरातील डॉ.योगेश पाटील यांच्याकडे नेले. त्यांच्या सल्ल्यानुसार तिघे भूषणला घेवून डॉ.मानवतकर यांच्या दवाखान्यात आले. येथे तपासणीअंती भूषणचा मृत्यू झाल्याचे समोर आले. 

एएसपीकडे धाव 
भूषणच्या मृत्यूप्रकरणी अन्य संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी मृत भूषणचा माेठा भाऊ किशाेर काेळी समाज बांधवांनी सहायक पाेलिस अधीक्षक नीलाेत्पल यांची भेट घेतली. मात्र, पोलिस नियमानुसार कारवाई करत आहेत. कोणावरही अन्याय होणार नाही, असे सांगून नीलोत्पल यांनी सर्वांची समजूत काढली.

मैत्रिणीची चौकशी 
याप्रकरणी वृषभ सुरेश वायकाेळे याच्या फिर्यादीवरून प्रशांत गुप्ताविरुद्ध भूषण कोळी याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी ज्या युवतीवरून वाद झाला, तिच्यासह आरोपी प्रशांतचे दोन्ही मित्र काेमल भाेळे अश्विन लाेखंडे यांचीही चाैकशी केली. दरम्यान, तपासात या प्रकरणात अजून काही तथ्य समोर येऊ शकते. 
बातम्या आणखी आहेत...