आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुलाबरावांच्या मिरवणुकीत गर्दीचा उच्चांक, मुख्य रस्त्यावरून दोन तास मिरवणूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - राज्यमंत्रीपदी वर्णी लागलेल्या शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील यांचे शहरात शनिवारी जंगी स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी हजारो कार्यकर्ते आणि चाहत्यांनी रेल्वेस्थानकावर दुपारी ‘भाऊगर्दी’ केली होती. जिल्ह्यात आजपर्यंत झालेल्या मंत्र्यांच्या स्वागताच्या गर्दीचा हा उच्चांक गुलाबरावांच्या स्वागतावेळी मोडला गेला.

गीतांजली एक्स्प्रेसने शनिवारी दुपारी १२.३० वाजता मंत्री गुलाबराव पाटील यांचे जळगाव रेल्वेस्थानकावर आगमन झाले. त्यानंतर रेल्वेस्थानकापासून नेहरू चौक, टॉवर चौक, चित्रा चौक, शिवतीर्थ मैदान आणि पद्मालय विश्रामगृहापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. तेथे दिवसभर त्यांनी कार्यकर्त्यांकडून होणारे अभिनंदन स्वीकारले. गुलाबराव पाटील यांची मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर जिल्हाभरातील शिवसैनिक, जळगाव ग्रामीण मतदारसंघातील कार्यकर्ते आणि शिवसेनेचे पदाधिकारी रेल्वेस्थानकावर स्वागतासाठी उपस्थित होते. आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, महापौर नितीन लढ्ढा यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते रेल्वेस्थानकावर उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर गुलाबरावांची शहरात मिरवणूक काढण्यात आली. रेल्वेस्थानक ते नेहरू चौकापर्यंतचा रस्ता, रेल्वेस्थानक परिसरात सर्वत्र कार्यकर्त्यांची गर्दी होती. स्वागत आणि मिरवणुकीत हजारो लोक सहभागी झाले होते. रेल्वे स्थानकावरील भाऊगर्दीमुळे खुद्द मंत्री गुलाबरावांना स्थानकाबाहेर पडणे अवघड झाले हाेते. पदाधिकारी आणि पोलिसांनी हाताच्या कड्याचे संरक्षण देऊन मंत्र्यांना स्थानकावरील गर्दीतून बाहेर काढले. सकाळी ११ वाजेपासून रेल्वेस्थानकावर कार्यकर्ते तळ ठोकून होते. शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, चंद्रकांत पाटील, माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे, शिवसेनेचे पदाधिकारी विश्वनाथ पाटील, रावसाहेब पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी, राजेंद्र चव्हाण, पाळधीचे सरपंच अलिम देशमुख, महानगरप्रमुख गणेश सोनवणे, कुलभूषण पाटील, बाजार समितीचे माजी सभापती भरत बोरसे, बाजार समितीचे संचालक लक्ष्मण पाटील, शरद तायडे, राजू शिरसाठ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. मिरवणुकीत कार्यकर्त्यांसह महिला पदाधिकाऱ्यांनीही नृत्य करत जल्लोष केला.

विश्रामगृहावर भेटी-गाठी
मिरवणुकीदरम्यान मंत्री गुलाबराव पाटील हे आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या निवासस्थानी गेले. तेथे सोनवणे कुटुंबीयांतर्फे त्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी पद्मालय विश्रामगृह गाठले. तेथे महिलांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले. तेथे त्यांनी कार्यकर्त्यांकडून अभिनंदन सत्कार स्वीकारले तसेच कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

खाविआचा सक्रिय सहभाग
मंत्री गुलाबरावांच्या स्वागत मिरवणुकीत खान्देश विकास आघाडीचे पदाधिकारी पूर्णपणे सहभागी झाले होते. महापौर नितीन लढ्ढा, स्थायी समिती सभापती नितीन बरडे, माजी उपमहापौर सुनील महाजन, राजकुमार अडवाणी यांच्यासह खान्देश विकास आघाडीचे पदाधिकारी, नगरसेवक मिरवणुकीत सहभागी होते. माजी आमदार सुरेश जैन यांच्या गैरहजेरीत शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यामुळे खाविआला आधार मिळाल्याची भावना खाविआ पदाधिकाऱ्यांमध्ये दिसून अाली.

हजारोंची उपस्थिती
यापूर्वी मंत्रिपदी वर्णी लागलेले माजी मंत्री एकनाथ खडसे, सुुरेश जैन, गुलाबराव देवकर, संजय सावकारे तसेच जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचेही स्वागत झाले. मात्र, मंत्रिपद मिळाल्यानंतर जळगाव रेल्वेस्थानकावर या सर्व मंत्र्यांच्या स्वागतासाठी मोजकेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. परंतु, गुलाबराव पाटलांच्या स्वागताला हजारो जण उपस्थित असल्याने रेल्वे विभाग परिसरातील व्यावसायिकांकडूनही मंत्र्यांच्या स्वागताची गर्दी वातावरणाची तुलना करण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...