आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांनी बाइक चोरांच्या टोळीचा केला पर्दाफाश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - शहरासह जिल्ह्यातून मोटारसायकल चोरणार्‍या टोळीचा एमआयडीसी पोलिसांनी गुरुवारी पर्दाफाश केला. टोळीतील तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 10 मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. मात्र, तब्बल 40 मोटारसायकली चोरल्याची कबुली चोरट्यांनी दिली आहे. तिघांच्या अटकेने या टोळीचा बँकेचे एटीएम फोडण्याचा कटही उधळला गेला आहे.

काही दिवसांपासून एमआयडीसी परिसरासह शहरातील विविध भागांतून मोटारसायकल चोरीच्या घटना घडत होत्या. या घटना रोखण्यासाठी विविध पथके स्थापन करण्यात आली होती. मात्र, काहीही उपयोग झाला नाही. दरम्यान याच काळात एमआयडीसी पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी अशरफ शेख यांना या चोरट्यांविषयी विश्वसनीय माहिती मिळाली. त्यांनी ती सहायक पोलिस निरीक्षक नितीन नेहूल यांना दिली. नेहूल यांनी सूचना देऊन या टोळीतील सदस्यांवर पाळत ठेवण्यास सांगितले. मिळालेल्या माहितीची खात्री पटल्यानंतर या टोळीचा म्होरक्या इजहार अहमद सलाउद्दीन याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याच्या अन्य दोन साथीदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. सुरुवातीला 40 मोटारसायकली चोरल्याचे इजहारने सांगितले. मोटारसायकल कोठून चोरल्या याची इत्थंभूत माहितीही त्याने दिली आहे. त्यानुसार 10 मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. सहायक पोलिस निरीक्षक नेहूल, अशरफ शेख, रवी वंजारी, अकबर खान, गोपाल ठाकूर, रघुनाथ पवार यांचा या पथकात समावेश होता.


अल्पवयीन मुलांचा चोरीसाठी वापर
इजहारने चोरीसाठी एक अनोखी पद्धत अवलंबली होती. चोरीच्या कामात तो अल्पवयीन मुलांचा वापर करायचा. त्यासाठी त्याने दोन मुले नेमलेली होती. ही मुले बसस्थानक, रेल्वेस्थानक, बिग बझार, गोलाणी मार्केट या भागातून इजहार डिमांड करेल त्या मोटारसायकली चोरायचे.


म्होरक्या इजहारवर अपहरणाचाही गुन्हा
टोळीचा म्होरक्या इजहार अट्टल चोरटा आहे. जामनेरमध्ये एकाला मारहाण केल्याप्रकरणी व ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. औरंगाबाद येथे त्याने एका डॉक्टरच्या मुलाचे अपहरण केल्याचा गुन्हाही त्याच्यावर आहे.


एटीएम फोडण्याचा होता कट
अधिकाधिक पैसा कमावण्याची हाव लागलेला व त्यासाठी चटावलेला इजहार लवकरच जळगाव शहरातील एक एटीएम फोडणार होता. त्यासाठी त्याने प्लॅनदेखील तयार करून ठेवला होता. त्या एटीएमची त्याने पाहणीही केली होती. मात्र, तत्पूर्वीच त्याचा डाव फसला व तो जाळ्यात अडकला.

जामनेरमध्ये नंबरप्लेट बदल
चोरीच्या मोटारसायकली जामनेरला पाठविल्या जायच्या. तेथे नंबरप्लेट बदलवल्यानंतर त्या औरंगाबादला रवाना केल्या जात होत्या. या कामात त्याला आणखी दोन जण मदत करायचे.