आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाड्यांच्या बोगस क्रमांकप्रकरणी व्यवस्थापकाची चौकशी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पगारिया ऑटोमधून विक्री झालेल्या सुमारे ३० दुचाकींना तेथील तत्कालीन कर्मचाऱ्याने बोगस क्रमांक दिले. नेरी येथील ग्राहक जयकिसन कुमावत यांनी तक्रार केल्यानंतर याबाबत १७ रोजी ‘दिव्य मराठी’ने वृत्त प्रकाशित केले होते.
याची थेट पोलिस अधीक्षकांनी दखल घेत चौकशी अधिकाऱ्याची नियुक्ती केली होती. त्यानुसार बुधवारी शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांनी पगारिया ऑटोचे व्यवस्थापक विवेक जोशी यांची चौकशी केली. यात त्यांनी या प्रकरणाला तत्कालीन कर्मचारी जितू पाटीलच जबाबदार असल्याचे सांगितले.
जोशी यांनी चौकशी दरम्यान सांगितले की, पगारिया ऑटोमध्ये वाहनांच्या नोंदणीकरण, क्रमांक, आरसी बुक देणे ही सर्व कामे २००९ ते २०१३ पर्यंत जितू पाटील करीत होता. यासाठी त्याची स्वतंत्र नेमणूक करण्यात आली होती. त्यामुळे त्याने काय घोळ केले आहेत हे आम्हाला कळालेच नाही. जितूने नोकरी सोडल्यानंतर पाचोरा येथे राहण्यासाठी गेला होता. सध्या तो कुठे राहतो, काय काम करतो? यासंदर्भात मला माहिती नाही, असे त्यांनी सांगितले.

जितू पाटीलचा शोध घेण्याचे आवाहन
बोगस क्रमांकप्रकरणी जबाबदार असलेल्या जितू पाटील यांची चौकशी केल्यानंतर या प्रकरणातील सत्य बाहेर येणार आहे. त्यामुळे पोलिसांना आता अगोदर त्याचा शोध घेणे गरजेचे आहे. त्यानंतर या प्रकरणाचा छडा लागू शकतो पण जितू कुठे राहतो? काय काम करतो ? याची माहिती नसल्याने त्याचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आवाहन आहे.

कुमावत यांची आज चौकशी
पोलिस निरीक्षक सरोदे यांनी बुधवारी तक्रारदार जयकिसन कुमावत यांनाही चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, ते बाहेरगावी असल्याने येऊ शकले नाही. गुरुवारी त्यांची चौकशी केली जाणार आहे.