आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापक्षी गणना अभियान; साडेतीन हजार पक्ष्यांची संख्या घटली!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेच्या महापक्षी गणना अभियानात गेल्या दोन वर्षांत पक्ष्यांची संख्या कमी झाल्याची माहिती समोर आली आहे. साकेगाव शिवारातील तापीनदीपात्र ते कंडारी रेल्वे ब्रिज या दहा किलोमीटरच्या परिक्षेत्रात 30 प्रजातींचे साडेतीन हजार पक्षी कमी झाल्याची नोंद वन्यजीव संरक्षण संस्थेने केली आहे.

जुगादेवी परिसर, साकेगाव शिवारातील तापीनदीपात्रात होणारे ब्लास्टिंग आणि प्रदूषणामुळे स्थानिक आणि स्थलांतरित पक्षांच्या संख्येत घट झाल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेतर्फे दरवर्षी राज्यभरात महापक्षी गणना अभियान राबविण्यात येते. भुसावळात वन्यजीव संरक्षण संस्थेला ही जबाबदारी देण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून होत असलेल्या पक्षीगणनेत साकेगाव शिवार, जुगादेवी जंगल ते थेट कंडारी रेल्वे ब्रिज या दहा किलोमीटरच्या क्षेत्रात साडेनऊ हजार पक्षांची नोंद करण्यात येते. तर 160 पेक्षा अधिक प्रजाती आढळून आल्या होत्या. साकेगाव शिवारातील नदीपात्रात प्रचंड प्रमाणात उत्खनन करण्यात येते. मासेमारीसह खनिज संपदा मिळविण्यासाठी दिवसभर ब्लास्टिंग केले जाते. तापीनदीपात्रात दीपनगर औष्णिक वीज केंद्राची राख, आयुध निर्माणीचे रसायनयुक्त पाणी तसेच कंडारी आणि भुसावळ शहरातील सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता सोडण्यात येते. अशा विविध कारणांमुळे पक्ष्यांच्या प्रमाणात घट झाली. यंदाच्या पक्षीगणनेत नीलकंठ, हुदहुद्या, राखाडी धनेश, तांबट, गोरली, डोंबारी, मुरारी, चंडोल, रानचंडोल, द्वारपांगळी, धिवर, खंड्या, श्वेतपरीट, शाबल परीट, वृक्षतीरचीमणी, पिवळा धोबी, राखीबगळा, पानकावळे, पाणडुब्बी, चित्रबलाक, मुग्धबलाक, उघडचोचा, काळ्या मानेचा करकोचा, मोरशराटी, ब्राह्मणीबदक, तलवारबदक, धनवर, थापाड्या आदी पक्षी आढळून आले. प्रदूषणाने मात्र स्थलांतरीत पक्ष्यांची संख्या कमी होऊन ती हतनूर जलाशयाकडे वळल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. वन्यजीव संरक्षण संस्थेतर्फे झालेल्या महापक्षी गणनेत काही दुर्मिळ पक्षांची नोंददेखील करण्यात आली. पक्षीमित्र गणेश सोनार यांनी ग्रेनेक्ड बंटीग (राखीमानेचा भारीट) तर राहुल सोनवणे यांनी सिर्कियर मालकोआ , ब्राउन र्शाईक या पक्षांची दुर्मिळ नोंद केली. जिल्ह्यात हे पक्षी प्रथमच आढळून आले आहेत.