आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रचारातून खडसे अलिप्त; जळगाव भाजपमध्ये अस्वस्थता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्यामुळे पक्षावर नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यंदा मुक्ताईनगरचा अपवाद वगळता जळगावच्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारापासून अलिप्तच असल्याचे दिसतात. अाजवर जळगाव जिल्ह्यातील भाजपची धुरा समर्थपणे पेलणारे खडसे यंदापासून चार हात दूरच असल्याने  पक्षाच्या उमेदवारांची  अस्वस्थता वाढली अाहे.   

जळगाव जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने ६७ पैकी जवळपास २२ जागांवर इतर पक्षांतून अायात केलेल्या उमेदवारांना उमेदवारी दिली अाहे. जलसंपदामंत्री  गिरीश महाजन यांनी ‘अायारामां’ना संधी दिल्याने भाजपमधील काही निष्ठावंतांचे तिकीट मात्र कापले गेले. हे नाराज निष्ठावंत खडसेंच्या भेटीगाठीसाठी प्रयत्नशील अाहेत. त्यामुळे या निवडणुकीत भाजपला यश मिळवून देण्याबराेबरच पक्षांतर्गत बंडाेबांना थाेपवण्याचे अाव्हान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासमाेर असेल.  

जळगाव जिल्ह्यात खडसे- महाजन गटबाजीचा एेन निवडणुकीत भाजपवर विपरीत परिणाम हाेऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी अतिशय चाणाक्षपणे जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर साेपवली. असे असले तरी निवडणुकीची सर्व यंत्रणा गिरीश महाजनांच्या नेतृत्वाखालीच राबवली जाते. महाजनांनी निवडून येण्याची क्षमता असलेल्यांनाच उमेदवारी हा निकष ठेवल्यामुळे जुन्या निष्ठावंतांना डावलून  इतर पक्षांतून अालेल्या २२ अायारामांना भाजपने उमेदवारी दिली अाहे. उमेदवारी वाटपापासून ते प्रचारापर्यंत खडसे मात्र अलिप्तच राहिले. त्यामुळे खडसे समर्थकांवर काहीसा अन्याय झाल्याची भावना अाहे.  

गुलाबरावांची प्रतिष्ठा पणाला  
खडसेंच्या घराणेशाहीवर जाहीर टीका करणारे शिवसेनेचे नेते व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रताप पाटील या वेळी निवडणुकीच्या अाखाड्यात अाहेत. मंत्रिपद अाणि शिवसेना उपनेते अशी दाेन्ही प्रतिष्ठेची पदे असल्याने मुलाला विजयी करून त्याचे राजकीय लाँचिंग करण्यासाठी मंत्री गुलाबरावांनी प्रतिष्ठा पणाला लावली अाहे. जिल्ह्यात शिवसेनेचा चेहरा म्हणूनदेखील त्यांच्यावरच जबाबदारी अाहे.  
 
गिरीश महाजनांपुढे दुहेरी अाव्हान  
विधान परिषद निवडणुकीत खडसेंचे समर्थक गुरुमुख जगवानी यांचा पत्ता कापून गिरीश महाजनांनी चंदुलाल पटेलांना उमेदवारी देऊन निवडूनही अाणले.  तेव्हापासूनच खडसे जिल्ह्याच्या राजकारणापासून काहीसे अलिप्त दिसतात. जिल्हा परिषद निवडणुकीत ते मुक्ताईनगर या स्वत:च्या मतदारसंघाशिवाय इतर ठिकाणी सक्रिय नाहीत. महाजनांचा मतदारसंघ असलेल्या जामनेरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्रित येऊन भाजपला कडवे अाव्हान दिले अाहे. या तालुक्यात खडसे समर्थक अाणि शिवसेनेची त्यांना मदत मिळू शकते. त्यामुळे महाजनांपुढे स्वपक्षीय व विराेधकांचे असे दुहेरी अाव्हान असेल. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...