चाळीसगाव - काँग्रेस सरकारच्या १० वर्षांच्या काळात मौनी पंतप्रधान भारताने पाहिला, तर भाजप सरकारने जनतेशी वारंवार संवाद साधणारा पंतप्रधान दिला. पंतप्रधानांनी बुलेटप्रूफ बॉक्सविना १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर तोंडी स्वरूपातील भाषण दिले. स्वच्छता अभियान, जनधन योजना राबविली. याशिवाय अनेक बदल भाजप सरकार आल्यानंतर पाहायला मिळाले. त्यामुळे
सोनिया गांधी अथवा शरद पवारांना मोदी सरकारच्या अवघ्या १०० दिवसांच्या कामांचा हिशेब मागण्याचा अधिकार काय? असा प्रश्न भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष
अमित शहा यांनी महर्षी वाल्मीकी जयंती कार्यक्रमात उपस्थित केला.
महाराष्ट्र राज्य आदिवासी कोळी महासंघातर्फे मंगळवार, दि. ८ रोजी दुपारी तीनला महर्षी वाल्मीकी जयंती कार्यक्रम झाला. धनगर, बंजारा, कोळी अशा असंख्य मागास समाजाला भाजपने सन्मानाची वागणूक दिली असून ओबीसी वर्गातील नेत्यास देशाचा पंतप्रधान करून पक्षाने इतिहास घडविला असल्याचे शहा यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी खान्देशाशिवाय मराठवाड्यातील कोळी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्षस्थानी राज्य कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील होते. त्यांनी या वेळी भाजपत प्रवेश केला.
महर्षी वाल्मीकी यांच्या प्रतिमेचे शहा यांच्या हस्ते पूजन झाले.
आपल्या २० मिनिटांच्या भाषणात शहा यांनी मोदींचे गुणगान केले. दिल्लीत काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना पाक सैनिकांकडून सीमेवर गोळीबार सुरू होता. त्याचा अखेरही पाक सैनिकच करीत असत. मोदी सरकार आल्यावर पाक सैनिकांकडून गोळीबार होत असला तरी त्याला चोख प्रत्युत्तर भारतीय सैनिक करू लागले आहे. त्यामुळे मोदी आता गप्प कसे? हा आरोप चुकीचा आहे. तसेच अमेरिकेत आजवर भारताच्या कोणत्याच पंतप्रधानाचा इतका सन्मान झाला नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा हा विजय असल्याचे शहा यांनी सांगितले.
फक्त गोंजारले, आश्वासन नाही
गुजरातमध्ये कोळी समाजाचे स्वतंत्र अस्तित्व असून तेथील भाजप सरकारने कोळी बांधवांना मदतीचा हात दिलाय. हीच मैत्री महाराष्ट्रात कायम ठेवायची असून त्यासाठी राज्यात भाजप सरकारला निवडून आणण्यासाठी मदत करा. त्यामुळे या समाजासाठी काही तरी करता येईल, असे आवाहन शहा यांनी केले.