आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या अंतर्गत कलहातून हिरामण गवळींचा राजीनामा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव झाल्याच्या कारणावरून महानगराध्यक्ष हिरामण गवळी यांनी राजीनामा दिला आहे. जिल्हाध्यक्ष सुनील नेरकर यांच्याकडे त्यांनी राजीनामा पाठवला आहे. मनपाच्या निवडणुकीत हिरामण गवळीही पराभूत झाले होते. निवडणुकीनंतर भाजपअंतर्गत वाद उफाळून आला. त्याचा परिपाक म्हणून गवळींना राजीनामा द्यावा लागल्याचे सांगण्यात येत आहे. पक्षातील पदाधिकार्‍यांनी विरोधात प्रचार केल्याचा आरोप गवळी यांनी केला आहे.

महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारांना पक्षातर्फे तिकीट देण्यावरून अनेकांची नाराजी पत्करावी लागली आहे. त्यातून पक्षात बंडखोरी झाल्याचेही चित्र या निवडणुकीत पाहावयास मिळाले आहे. त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षातही निवडणुकीत तिकीट देण्यावरून उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यातून काहींनी अपक्ष निवडणूक लढवली. या वेळी महानगराध्यक्ष हिरामण गवळी यांनी प्रभाग क्रमांक चारमधून निवडणूक लढविली. त्यात ते पराभूत झाले. तर भारतीय जनता पक्षाचे तीन उमेदवार निवडून आले आहेत. या वेळी निवडणुकीत हिरामण गवळी यांच्या विरोधात पक्षातील प्रमुख पदाधिकार्‍यांनी उघडपणे प्रचार केला आहे. त्यामुळे पक्षातील अंतर्गत राजकारण पुन्हा समोर आले आहे. तरी अपयशास अध्यक्ष या नात्याने जबाबदार असून गुरुवारी त्यांनी महानगराध्यक्ष पदाचा राजीनामा जिल्हाध्यक्षांकडे पाठवला आहे.

पंधरा जागा, तीन विजयी
महापालिकेत गतवेळी भाजपच्या तीन जागा होत्या. यंदा भारतीय जनता पक्षाने निवडणुकीत पंधरा जागा लढवल्या. मात्र, गतवेळी संख्याबळ होते तितकेच आताही राहिले. जागा वाढतील, असा अंदाज होता. मात्र, तीन जागांवर भाजपला समाधान मानावे लागले. यामुळे अंतर्गत वादही उफाळून आले. त्यातच पदाधिकार्‍यांनी विरोधात काम केल्याचा आरोप महानगराध्यक्षांनी केल्यामुळे या वादाला खतपाणी मिळत आहे.

आरोपांची होणार चौकशी
माजी नगरसेवक हिरामण गवळी यांनी महानगरप्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. तो अद्याप मंजूर केलेला नाही. राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडे पाठवण्यात आला आहे. गवळी यांनी केलेल्या आरोपांची पक्षाच्या घटनेनुसार चौकशी होईल. त्यानंतर निर्णय घेण्यात येईल. सुनील नेरकर, जिल्हाध्यक्ष भाजप