आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खांदेपालट: चर्चेचे गुर्‍हाळ रंगले तब्बल पाच तास!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली रस्सीखेच, सकाळपासून सुमारे पाच तासांची चर्चा, त्यात नऊ जणांच्या स्पर्धेत नेत्यांच्या मध्यस्थीनंतर भाजप जिल्हाध्यक्षपदी उदय वाघ यांची निवड करण्यात आली. नियोजनापेक्षा दोन तास उशिराने सुरू झालेल्या बैठकीतही एकमताने निवडीसाठी अर्धा तास चर्चेचे गुर्‍हाळ चालल्याने रविवारची निवड प्रक्रिया प्रतिष्ठेची झाली होती. यात अध्यक्षांना शुभेच्छा देताना नेत्यांनी आगामी काळातील आव्हानांची यादीच वाचून दाखवली.

भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्ष निवडीसाठी रविवारी बाबा हरदासराम मंगल कार्यालयात दुपारी 1 वाजता जिल्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आतापर्यंत कधीही मतदान न झालेल्या भाजपत आज सकाळपासून सक्रिय सदस्य दाखल व्हायला सुरुवात झाली होती. दुपारी 3.15 वाजेच्या सुमारास प्रत्यक्ष बैठकीला सुरुवात झाली. या वेळी व्यासपीठावर विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, प्रदेश सरचिटणीस आमदार गिरीश महाजन, निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी रहाटकर, माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, खासदार हरीभाऊ जावळे, खासदार ए.टी.पाटील, प्रदेश चिटणीस सुनील बढे, प्रदेश सहसंघटनमंत्री डॉ. राजेंद्र फडके, माजी आमदार साहेबराव घोडे, वाडिलाल राठोड, नवनिर्वाचित अध्यक्ष उदय वाघ आदी उपस्थित होते.

दुपारी 3 वाजेपर्यंत केवळ चर्चाच
शिस्तीचा पक्ष म्हणून ओळख असलेल्या भाजप जिल्हाध्यक्ष निवडीसाठी दुपारी 1 वाजता बैठक होणार होती. परंतु सकाळपासून इच्छुकांसह नेत्यांची उपस्थिती विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या बंगल्यावर होती. त्यामुळे निवड नेमकी कुठे? असा प्रश्न निर्माण झाला होता. खडसेंसह कोअर कमिटीच्या सदस्यांनी त्याच ठिकाणी इच्छुकांची मते जाणून घेतली. सुरुवातीला आघाडीवर असलेल्या सुनील बढे व अशोक कांडेलकर यांच्या नावाबाबत कार्यकर्त्यांमध्ये अंदाज व्यक्त होत होते. परंतु याच दरम्यान अमळनेरचे अनिल भाईदास पाटील व उदय वाघ यांनाही संधी मिळू शकते या चच्रेने जोर धरला. सकाळपासून सुरू असलेले चर्चेचे गुर्‍हाड दुपारी 3 वाजेपर्यंत सुरूच होते. त्याचवेळी सर्वच प्रमुख नेत्यांचे आगमन सभागृहात झाले. परंतु सगळ्याच इच्छुकांच्या चेहर्‍यावर तणाव स्पष्टपणे दिसत होता.

अर्धा तास ठरला उत्कंठेचा
बैठकीला सुरुवात झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी रहाटकर यांनी कार्यक्रम जाहीर केला. सुरुवातीला इच्छुक असलेले सुनील बढे, अशोक कांडेलकर, उदय वाघ, अनिल भाईदास पाटील, उद्धव माळी, पोपट भोळे, कैलास भोळे, अजय भोळे यांचा नावाचा उल्लेख केला. पक्षाच्या कार्यपद्धतीनुसार कोअर कमिटीने एक नाव सुचवावे अशी सूचना निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी रहाटकरांनी केल्यापासूनचा अर्धा तास सभागृहातील सगळ्यांसाठीच उत्कंठेचा ठरला. खडसेंच्या बंगल्यावर सकाळपासून चर्चा सुरू असतानाही तब्बल अर्धा तास अध्यक्ष निवडीवर निर्णय होत नव्हता. इच्छुकांच्या चेहर्‍यावरील अस्वस्थता स्पष्टपणे दिसत होती. अखेर नेत्यांनी प्रमुख दावेदारांशी चर्चा करून उदय वाघ यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर रहाटकर यांनी उदय वाघ यांची एकमताने बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

आमदार महाजनांची भूमिका निर्णायक
सकाळपासून सुरू असलेल्या चर्चेत प्रदेश सरचिटणीस गिरीश महाजन यांची भुमिका महत्त्वाची ठरताना दिसली. खडसेंच्या बंगल्यावरून बैठकस्थळी पोहोचल्यानंतरही त्यांच्यासोबत पक्षर्शेष्ठी निवडीबाबतच चर्चा करत होते. याचदरम्यान उदय वाघ त्यांना जाऊन भेटले असता महाजनांनी ‘जरा थांबा हो, राजकारण असते’ असे म्हणत सबुरीचा सल्ला दिला. त्यानंतर एका नावावर निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हादेखील आमदार महाजन यांच्यासोबत काही मिनिटे उदय वाघ यांची चर्चा चालली. त्यामुळे अध्यक्षपदाच्या शर्यतीत कांडेलकर व बढे केव्हाच मागे पडलेले दिसले. त्यानंतर ही स्पर्धा अनिल पाटील व उदय वाघ यांच्यात दिसली. अखेर एकनाथ खडसे व गिरीश महाजन यांच्यासोबत डॉ. फडके यांनी अनिल पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेण्यात आला. त्यात वाघांच्या उमेदवारी अर्जावर थेट अनिल पाटील हेच सूचक झाले. नेत्यांनी अनिल पाटलांचे मन वळवण्यात यश मिळवले. मात्र, यासर्व घडामोडीत आमदार महाजन यांची भूमिका निर्णायक ठरल्याची कुजबुज कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती.

कांडेलकरांचे चौकार आणि षटकार
मावळते अध्यक्ष अशोक कांडेलकर यांनी पदाची सूत्रे वाघ यांच्याकडे सोपवताना आपल्या भाषणात अध्यक्षपद हे काटेरी मुकुट असून येणार्‍या कालखंडात त्यांच्यासमोर अनेक आव्हाने असल्याची जाणीव करून दिली. विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीसोबत महानगरपालिकेची निवडणूकसुद्धा जिंकायचे असल्याचे सांगत अनेक चौकार-षटकार लगावले.

उदय वाघांचीही फटकेबाजी
कांडेलकरांनी केलेल्या चौकार-षटकारांनंतर अध्यक्ष वाघ यांनीही जबाबदारीची जाणीव असल्याचे लक्षात आणून देत भाजप हे एक कुटुंब आहे. या कुटुंब व्यवस्थेचा भाग म्हणून अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्याकडे असली तरी येणार्‍या काळात सगळ्यांनाच काम करायचे असल्याचे सांगितले. गत काळात पक्षाची स्थिती भक्कम असल्याचे सांगत आजची परिस्थिती बदलण्याचे आवाहन असल्याचे त्यांनी मान्य केले. सन 2014 हेच मिशन डोळ्यासमोर ठेवत जबाबदारी पार पाडू असे सांगत कार्यकर्तेच हा बदल घडवू शकतात, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मित्र पक्ष शिवसेनेसह काँग्रेस व राष्ट्रवादीत अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेवर प्रकाशझोत टाकत भाजप हा एकमताने निवड करणारा पक्ष असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये असलेली कुरघोडी दूर करत जुन्या कार्यकर्त्यांना प्रवाहात आणणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. पैशांची मस्ती दाखवणार्‍या व लाल दिवे मिरवणार्‍यांना भीक घालण्याची गरज नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.