आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात भाजपने उपसले निलंबनास्त्र; चौघांविरुद्ध सहा वर्षे निलंबनाचा प्रस्ताव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- अपेक्षित यश हाती न आल्याने पराभव जिव्हारी लागलेल्या भारतीय जनता पक्षाने आता पक्षाविरुद्ध गद्दारी करणार्‍यांना घरचा रस्ता दाखविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून महानगर सरचिटणीससह चौघांवर सहा वर्षांसाठी निलंबनाची कारवाई करण्याचा प्रस्ताव प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.

नवनिर्वाचित नगरसेवक व पराभूत उमेदवारांसोबत रविवारी पार पडलेल्या पहिल्याच कार्यक्रमात विरोधीपक्ष नेते एकनाथ खडसे यांनी आक्रमक भूमिका घेत पक्षविरोधी कारवाया करणार्‍यांची गय केली जाणार नसल्याची गर्जना केली होती. पक्षांतर्गत धुसफुसमुळेच पालिका निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागल्याची भावना झाली आहे. घरकुल घोटाळ्यात सत्ताधार्‍यांची अर्धी ताकद कारागृहात गेलेली असताना पुरेसा फायदा उचलता न आल्याने भाजपमध्ये आत्मचिंतन सुरू झाले आहे. अपेक्षित यश न मिळाल्याने राजीनामा दिलेले महानगराध्यक्ष सुरेश भोळे यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला असून कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन महानगराध्यक्ष व कार्यकारिणी होणार असल्याने कार्यालयात पक्षापासून दूर गेलेले चेहरे पुन्हा चमकू लागले आहेत.

चौघांविरुद्ध कारवाईचा प्रस्ताव
पालिका निवडणुकीत भाजपविरोधी भूमिका घेऊन आपल्याच पक्षाच्या उमेदवाराच्या पराभवाला कारणीभूत ठरल्याप्रकरणी ठपका ठेवत चौघांवर निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यात महानगर सरचिटणीस अजय जोशी, महानगर चिटणीस नितीन गायकवाड, भाजयुमो महानगर उपाध्यक्ष प्रीतम गुजर (जाधव), माजी सरचिटणीस सुनील पाटील यांना सहा वर्षे निलंबित करण्यात येऊन त्यांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस प्रदेशाध्यक्षांकडे करण्यात आली आहे.

काय आहे यांचा दोष?
0 अजय जोशी हे महानगर सरचिटणीस होते, तर त्यांची प}ी मनीषा जोशी यांनी प्रभाग क्रमांक 19 ब मधून खान्देश विकास आघाडीकडून उमेदवारी घेतली. भाजपच्या उमेदवार दीपमाला काळे यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली.
0 नितीन गायकवाड हे महानगर चिटणीस होते. त्यांची आई जयवंताबाई गायकवाड यांनी 34 अ मधून उमेदवारी केली. भाजपच्या उमेदवार साधना रोटे यांच्याविरुद्ध प्रचार केला.
0 प्रीतम गुजर यांनी थेट पक्षालाच आव्हान देत प्रभाग क्रमांक 18 अ मधून भाजपचे उमेदवार चंद्रकांत बेंडाळे यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीकडून उमेदवारी घेत निवडणूक लढवली.
0 सुनील पाटील हे महानगरचे माजी सरचिटणीस होते. त्यांनी काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. तसेच भाजपच्या उमेदवाराविरुद्ध प्रचार केला.