आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गद्दारांना शिकवणार धडा; नगरसेवकांच्या सत्कारप्रसंगी एकनाथ खडसेंचा इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- पक्षाचे बॅनर उतरवून निवडून दाखवा असा इशारा देत महापालिका निवडणुकीत सेटिंग करून आपल्याच उमेदवारांना पराभूत करण्यासाठी ताकद वापरणार्‍यांचा विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी खरपूस समाचार घेतला. तसेच याची दखल नक्कीच घेतली जाईल,असे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी विजयी नगरसेवक व पराभूत उमेदवारांचा सत्कारप्रसंगी म्हणाले.

भारतीय जनता पक्षाचे नेते तथा विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी जळगावकरांना एकहाती सत्ता देण्याचे आवाहन केले होते. पदाधिकार्‍यांच्या मते पक्षाला 25 जागा अपेक्षित होत्या. परंतु त्यापेक्षाही कमी जागा आल्या. त्याला पक्षांतर्गत गटबाजी व अंतर्गत मतभेद जबाबदार असल्याचा निष्कर्ष निवडणुकीनंतर काढण्यात आला आहे. अशोक लाडवंजारी यांचा पराभव पक्षांतर्गत कारवाईचा भाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे. रविवारी सायंकाळी एकनाथ खडसेंच्या हस्ते भाजपतर्फे उमेदवारी करून विजयी झालेले व पराभूत उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खडसेंनी खान्देश विकास आघाडीवर टीका करत 66 टक्के मतदार त्यांच्या विरोधात असल्याचे सांगितले. जनतेने सत्ताधार्‍यांना नाकारले असून भाजपच्या पाच ते सहा जागा केवळ 100 ते 125 मतांनी पराभूत झाल्याचे सांगितले. विजयी झालेल्या नगरसेवकांनी आगामी काळात आक्रमकपणे काम करण्याची गरज व्यक्त करीत पराभूत उमेदवारांनी खचून न जाता जोमाने कामाला लागण्याचा सल्ला दिला. यावेळी त्यांनी अंतर्गत कलहावर बोलताना आपल्यातील काहींमुळे जागा पडल्याचे सांगत गद्दारी करणार्‍यांना धडा शिकवला जाईल, असा इशाराच दिला. लवकरच कोअर कमिटीची बैठक बोलावून कारवाई करणार असल्याचे सांगितले. अशोक लाडवंजारी यांच्या नावाचा उल्लेख करीत त्यांचा पराभव जिव्हारी लागल्याचे स्पष्ट केले. प्रत्येक प्रभागाची बैठक बोलावून उमेदवार व पदाधिकार्‍यांशी चर्चा करणार असल्याचे सांगत बंगल्याशी सेटिंग करणार्‍यांना चिमटे काढले. यावेळी आमदार गिरीश महाजन, खासदार ए.टी.पाटील, जिल्हाध्यक्ष उदय वाघ, महानगराध्यक्ष सुरेश भोळे, डॉ. गुरुमुख जगवानी उपस्थित होते.

उदय वाघ यांना खडसेंच्या सूचना
महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला अपेक्षित यश न मिळाल्याने तडकाफडकी राजीनामा देणार्‍या महानगराध्यक्ष सुरेश भोळे यांना पदमुक्त करण्याच्या तोंडी सूचना खुद्द विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांना दिल्या आहेत. त्यामुळे भोळेंचा राजीनामा मंजूर करण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त असून पक्षासाठी जास्तीत जास्त वेळ देणार्‍या कार्यकर्त्याला संधी देण्याचा विचार पक्ष पातळीवर सुरू झाला आहे.

नियोजनात सेटलमेंटचा आरोप
पालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जातीय समीकरणांच्या आधारावर जळगाव महानगराध्यक्षपदी 16 जानेवारी 2013 रोजी सुरेश भोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या कार्यकारिणीत निष्ठावंतांना संधी दिली गेली नसल्याची ओरड सुरू झाली ती आजपर्यंत कायम होती. पालिका निवडणुकीत उमेदवार निवड प्रचारादरम्यान सभांच्या नियोजनातही सेटलमेंट झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याप्रमाणे ‘7 शिवाजी नगर’शी सेटिंगच्या मुद्याला खुद्द खडसेंनी आक्षेप घेतल्याने भाजपांतर्गत मतभेद वाढण्याची शक्यता आहे. निकाल जाहीर होताच सुरेश भोळे यांनी भाजपला अपेक्षित यश न मिळाल्याने नैतिक जबाबदारी स्वीकारून जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्याकडे राजीनामा सादर केला होता. आठवडा होऊनही त्यावर कोणताच निर्णय न झाल्याने सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर रविवारी काही पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसेंनी राजीनामा मंजूर करा अशा सूचना जिल्हाध्यक्ष वाघ यांना दिल्या. या वृत्तास वाघ यांनीही दुजोरा दिला.