जळगाव- विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन म्हणजे सत्ताधार्यांना घाम फोडण्याचं निमित्त असतं, असा राजकीय इतिहास आहे. घाम फोडण्याची ही जबाबदारी असते प्रामुख्याने विरोधीपक्षनेत्यांकडे. विधान परिषदेत विनोद तावडे त्या तयारीत आहेत, असे संकेत त्यांनी दिले आहेत; पण विधान सभेत मात्र, यावेळी काय चित्र असेल हा उत्सुकतेचा विषय बनला आहे. अर्थात, त्याला कारण आहे विरोधीपक्षनेते एकनाथ खडसे यांच्यावर नुकतीच झालेली किडनी पुनरेपणाची शस्त्रक्रिया.
खडसे हा तसा काटक माणूस. भली भली संकटं त्यांनी खंबीरपणे पेलली आहेत. विधान परिषद निवडणुकीत झालेला मुलाचा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला होता. पण त्या पराभवाने ते खचले नाहीत. उलट अधिक ताकदीनं कामाला लागले. पुढे त्याच एकुलत्या एक मुलाने आत्महत्त्या केली. त्या वेळी तर हा माणूस आता कोसळणार, असं अनेकांना वाटत होतं; पण पहाडापेक्षा मोठं असलेलं ते दु:ख पेलून काही दिवसांतच ते कामाला लागले. त्यांचं सांत्वन करायला येणार्यांना त्यांनीच समजुतीचे चार शब्द सांगितले, असेही घडले. गाडी रुळावर आली असताना अचानक त्यांना जीवघेणा आजार जडल्याची चर्चा सुरू झाली. ऐन महापालिका निवडणुकीत त्यांना रुग्णालयात दाखल व्हावं लागलं. आजाराबाबत त्यांनी कमालीची गुप्तता पाळली होती. त्यामुळे चर्चा आणि शक्यतांच्या फैरी पुन्हा झडायला लागल्या होत्या. पुढे ते लंडनला जाऊन किडनीचे पुनरेपण करून आल्याचं त्यांनाच जाहीर करावं लागलं. अशा शस्त्रक्रियेनंतर जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून अनेक महिने जपावं लागतं. त्यामुळे तर आता तर त्यांना विरोधीपक्षनेतेपद सोडावंच लागणार अशीही चर्चा सुरू झाली होती; पण ते होणे नाही हे खडसेंनीच लगेच जाहीर केलं आहे. त्यामुळे या अधिवेशनातही तेच विरोधीपक्षनेता म्हणून सत्ताधार्यांसमोर उभे ठाकणार आहेत. ही त्यांची एकप्रकारे परीक्षाच आहे, असं म्हणायला हरकत नाही.
चार वर्षे सलग प्रभावीपणे विरोधीपक्षनेतापद सांभाळणार्या खडसेंसाठी कसली आली परीक्षा? असं कदाचित त्यांच्या सर्मथकांना वाटेल. पण, चित्र पूर्वीसारखं राहिलेलं नाही हे लक्षात घ्यावं लागणार आहे. ही परीक्षा त्यांना कोण्या सत्ताधार्यासमोर अथवा त्यांच्यावर लक्ष ठेवून असलेल्या माध्यमांसमोर नाही द्यायची. ही परीक्षा पाहाणार आहेत त्यांच्याच पक्षातले काही नेते आणि पदाधिकारी. भाजपातल्या अनेकांना उपरोक्त विधान कदाचित पटणार नाही. पण त्यांना पटण्यान पटण्याने परिस्थिती बदलत नाही.
भाजपातल्या मंडळींनी, किंबहुना खडसेंनी देखील कितीही नाकारले तरी या पक्षालाही गटबाजीची बाधा बर्यापैकी झालेली आहे , हे आता लपून राहिलेलं नाही. मुंडे आणि गडकरींच्या निमित्ताने उच्च पातळीवरचे गट समोर आले आहेतच. पण तेच लोण खालपर्यंत पसरलं आहे, हे मात्र मानायला काही मंडळी तयार होत नाही. खडसेंच्या बाबतीतही तेच होत आलं आहे.
खडसेंना किडनी प्रत्यारोपण करावं लागणार आहे हे स्पष्ट होताच त्यांच्याजागी आता कोणाची नियुक्ती करायची किंवा केली जाईल याचे मनसुबे रचायला भाजपातल्या अनेक मंडळींनी वेळ दडवला नाही. अनेकांनी पुढचं सगळंच राजकारण पद्धतशीरपणे मुंबईतल्या पत्रकारांपर्यंत पोहोचवलं आणि ते छापूनही आणलं. अनेकांनी त्यात जातीच्या समीकरणांची भर घालून त्याला फोडणी देण्याचाही प्रयत्न केला. हे कशामुळे घडलं? आडातच नसेल तर पोहोर्यात येत नाही, असं सांगणारी म्हण मराठीत उगाच आलेली नाही.
खडसेंना विरोधी पक्षनेतेपदावरून हटवायचे म्हणून त्यांना प्रदेशाध्यक्षपद देण्याच्याही हालचाली मध्यंतरी गतिमान झाल्या होत्या. त्यावेळी प्रकृतीचेच कारण देत खडसेंनी तो चेंडू परतवून लावला होता. त्यामुळे आता तोच चेंडू त्यांच्या कोर्टात टाकून त्यांना बाद करायची संधी पक्षातील ही ठरावीक मंडळी साधू पाहाते आहे. त्यासाठी खडसेंच्या या गंभीर शस्त्रक्रियेचे कारण पुढे केले गेले आहे. मात्र, आपल्याला गड लढवायला आता अडचण राहिलेली नाही असे सांगून खडसेंनी पुन्हा चेंडू परतवून लावला आहे. त्यामुळेच सोमवारपासून सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात ते किती ‘क्षमता’ दाखवतात, याकडे त्यांच्याच पक्षातल्या मंडळींचं अधिक लक्ष राहाणार आहे.
अर्थात, खडसेंनी आपला काटकपणा आणि खंबीरपणा दाखवून दिला असला तरी येणारा काळ त्यांच्यासाठी मोठं आव्हान बनून समोर येतं आहे, हेही खरंच आहे. गंभीर स्वरूपाच्या शस्त्रक्रियेला दोन महिनेही पूर्ण झालेले नसताना अधिवेशन समोर येऊन ठाकलं आहे. ते संपत नाही तोवर लोकसभा निवडणुकीचे वारे वेगाने वाहायला सुरुवात होणार आहे. पाठोपाठ विधानसभेच्या निवडणुका आहेतच. खडसेंनी आता पुरे करावं असं वाटणारी मंडळी प्रदेश पातळीवरच आहे असं नाही. जिल्हा पातळीवरही असे अंतर्गत विरोधाचे वारे वाहू लागले आहेत. मध्यंतरी झालेल्या काही आंदोलनांमधून ते चित्र समोर आलेही.
येणार्या लोकसभा निवडणुकीत जळगाव मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवाराला पुन्हा निवडून आणण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. कारण जळगाव शहर हा विधानसभा मतदारसंघ आमदार सुरेश जैन यांच्या विरोधामुळे भाजपाला कितपत हात देतो, हा प्रश्नच आहे. अर्थात, नरेंद्र मोदींची हवा त्यांच्या मदतीला आली तर मात्र पहिली परीक्षा उत्तीर्ण होणं त्यांना कठीण जाणार नाही.