आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खान्देशातून देणार चार कोटी निधी; उद्या जिल्ह्याची बैठक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- मुंबई येथे आयोजित नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेला जाण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसाठी दोन रेल्वे बुक करण्यात येणार आहेत. ‘नोट दो व्होट दो’ या घोषणेनुसार खान्देशातील चारही लोकसभा मतदारसंघातून प्रत्येकी एक कोटी रुपये निधी संकलन करण्याचा निर्धार करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.
गुजरातचे मुख्यमंत्री व भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची 22 डिसेंबर रोजी मुंबईला विशाल रॅली काढण्यात येणार आहे. यासाठी भाजपचे सर्वच नेते कामाला लागले आहेत. प्रदेशाध्यक्ष कालच उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेऊन गेले. मराठवाड्यातून नरेंद्र मोदींच्या हातात 17 कोटी रुपयांची थैली देण्यात येणार असल्याचे खासदार गोपीनाथ मुंडे यांनी जाहीर केल्यानंतर राज्यातील पहिल्या फळीतील नेते राज्याचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांचे वर्चस्व असलेल्या उत्तर महाराष्ट्राविषयी उत्सुकता लागली आहे.
चार कोटींचे उद्दिष्ट
यासंदर्भात खडसेंशी चर्चा केली असता त्यांनी जळगाव जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदारसंघ व धुळे तसेच नंदुरबारमधील एक मतदारसंघातून प्रत्येकी एक कोटीप्रमाणे चार कोटी रुपये निधी संकलित करण्याचे उद्दिष्ट राहणार असल्याचे सांगितले. यासाठी कार्यकर्त्यांकडून पाच रुपये दहा रुपयांपासून निधी गोळा करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. मुंबईला मोदींच्या उपस्थितीत बुथप्रमुखांना मार्गदर्शन केले जाणार असले तरी त्यानंतर होणार्‍या जाहीर सभेला कोणीही उपस्थित राहू शकेल. खान्देशातून सभेसाठी किमान 25 हजार कार्यकर्ते जातील, असे नियोजन सुरू आहे. त्यासाठी जळगाव जिल्ह्याकरिता दोन रेल्वे आरक्षित करण्यात येणार आहेत. तसेच काही कार्यकर्ते खासगी वाहनांनीदेखील येतील असेही खडसे म्हणाले.