आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपाच्या जळगाव टीमने पटकावल्या 17 जागा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- चार राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या विजयामुळे ‘वसंत स्मृती’ कार्यालयात रविवारी जल्लोषाचे वातावरण होते. गुजरातमधील निवडणुकीचा अनुभव पाठीशी असलेल्या 18 पदाधिकार्‍यांच्या टीमला राजस्थानातही अपेक्षित यश हाती आले. मतदानापूर्वी केलेल्या भाकितानुसार 23 पैकी 17 जागांवर भाजपला यश प्राप्त आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपचे प्रदेश सहसंघटनमंत्री डॉ. राजेंद्र फडके यांच्या नेतृत्वाखाली 36 पैकी 28 जागांवर विजय मिळवला होता. या यशामुळे जळगावच्या 18 पदाधिकार्‍यांची राजस्थानातील बिकानेर भागातील 24 विधानसभा क्षेत्रासाठी निवड केली होती. या पदाधिकार्‍यांचे नेतृत्वही डॉ.फडकेंनीच केले. तीन महिन्यांपासून बु्थनिहाय कामगिरी बजावलेल्या या जळगावच्या शिलेदारांना राजस्थानात किती यश मिळते याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून होते. रविवारी दुपारपर्यंत राजस्थानातील निकालाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर या टीमने पुन्हा यश काबीज केले आहे.
पूर्वीचे चित्र बदलले
बिकानेर भागात गत पंचवार्षिकमध्ये भाजपाला 10, काँग्रेसला 12, कम्युनिस्ट पक्षाला 2 जागा मिळाल्या होत्या. रविवारी लागलेल्या निकालानुसार भाजपाला 16 व भाजपसर्मथक एक, काँग्रेसला 4 तर स्थानिक पक्षांना 2 जागा मिळाल्या.
यांनी पार पाडली जबाबदारी
जिल्हा सरचिटणीस सदाशिव पाटील, अजय भोळे, अनिल चौधरी, राजू सोनवणे यांच्यावर चार जिल्ह्यांची जबाबदारी होती. अशोक लाडवंजारी, दीपक फालक यांच्यासह अन्य पदाधिकारी प्रभारी होते. ‘वन बूथ टेन यूथ’मध्ये घेतलेल्या परिश्रमाचे फळ मिळाल्याचे पदाधिकारी सांगत आहेत.
अंदाज खरा ठरला..
राजस्थानातील 23 जागांसंदर्भात यापूर्वी व्यक्त केलेला अंदाज खरा ठरला आहे. चार राज्यातील निकालाने देशाने नरेंद्र मोदींचे नेतृत्व स्वीकारले असल्याचा संदेश दिला आहे. महिला, तरुण भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. याचे श्रेय जळगाव टीमला आहे. डॉ.राजेंद्र फडके, सहसंघटनमंत्री, भाजपा
फटाके फोडले अन् पेढेही वाटले
मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान व दिल्ली या राज्यांमध्ये भाजपला विजय मिळाल्याचा तसेच नरेंद्र मोदी व भाजपची लाट देशात निर्माण झाल्याचा आनंद भाजप कार्यकर्त्यांनी दुपारी 2 वाजता जिल्हा कार्यालयात व्यक्त केला. यावेळी जिल्हाध्यक्षांसह जिल्हा व महानगरच्या पदाधिकार्‍यांनी एकत्र येत फटाके फोडले, तसेच पेढे वाटून आनंद व्यक्त केला. ढोल-ताशांच्या गजराने परिसर दणाणून गेला होता. भाजपचे मफलर घालून नाचणार्‍या कार्यकर्त्यांमुळे बळीरामपेठ परिसरात भाजपमय वातावरण निर्माण झाले होते.