आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी मंडळांची रचना, नंतर भाजपच्‍या जिल्हाध्यक्षाची निवड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जळगाव महानगराला जिल्ह्याचा दर्जा मिळाल्यानंतर भाजपमधील अंतर्गत राजकारणाला वेग आला आहे. जिल्ह्याचा पहिला अध्यक्ष होण्याचा मान मिळावा म्हणून इच्छुकांकडून विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्याकडे धावा सुरू झाला आहे. शहराची नऊ मंडळांमध्ये विभागणी केल्यानंतर जिल्हाध्यक्षांची निवड होईल यासाठी आणखी आठवडाभराची प्रतीक्षा कार्यकर्त्यांना करावी लागणार आहे.
राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये मुख्य शहरांना संघटनात्मकदृष्ट्या जिल्ह्याचा दर्जा देण्यात आला. यात जळगाव महानगराचाही समावेश करण्यात आला आहे. अनेकांना महत्त्वाच्या पदांवर बढती मिळणार आहे. त्यादृष्टीने दुसर्‍या फळीतील कार्यकर्त्यांनी बाशिंग बांधले आहे. यासंदर्भात ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ, विद्यमान महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, जिल्हा संघटनमंत्री अँड. किशोर काळकर, नगरसेवक सुरेश भोळे, पांडुरंग काळे, दीपक फालक, अमित भाटिया आदीची विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्याकडे मुंबईला बैठक झाली. त्यात जळगाव शहराचा आढावा घेण्यात आला.
पेज प्रमुखांची नियुक्ती होणार
लोकसभा निवडणुकीपूर्वी वन बूथ टेन युथ यावर भर दिलेल्या भाजपमध्ये आता मतदार यादीच्या प्रत्येक पानासाठी एका प्रमुखाची नियुक्ती केली जाणार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिलेल्या आदेशानंतर जिल्ह्यातही या नियुक्तीला गती आली आहे. एकनाथ खडसेंनी यासंदर्भात सूचना करून प्रत्येक बूथनिहाय मतदार यादीतील प्रत्येक पेजनिहाय प्रमुख निश्चित करण्याच्या सूचना पदाधिकार्‍यांना दिल्या आहेत. त्यामुळे एका पानावरील मतदारांची माहिती ठेवणे सोपे जाणार आहे.
जिल्हाध्यक्षपदासाठी चुरस वाढणार
जिल्हाध्यक्षपदाच्या शर्यतीत विद्यमान महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्यासह माजी अध्यक्ष तथा नगरसेवक सुरेश भोळे व पांडुरंग काळे याच्यात चुरस आहे. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने पदाधिकार्‍यांच्या माध्यमातून लॉबिंग करत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप कार्यकर्त्यांनी जळगाव शहर मिळण्याचा आग्रह धरत प्रस्ताव दिला आहे.
4 ते 5 प्रभागांचे एक मंडळ
विरोधी पक्षनेते खडसे यांनी जळगाव शहरातील सध्याच्या रचनेची माहिती घेतली. तसेच नवीन रचना तयार करण्याच्या सूचना दिल्या. आता संघटनात्मकदृष्ट्या जळगाव शहराचे 9 मंडळात विभाजन करण्यावर एकमत झाले आहे. त्यासाठी 4 किंवा 5 प्रभागांचे एक मंडळ तयार करण्यात येणार आहे. प्रत्येक मंडळाचा अध्यक्ष व कार्यकारिणी स्वतंत्र राहणार असून त्यावर जिल्ह्याचे नियंत्रण राहणार आहे. मंडळांची रचना केल्यानंतर त्याला प्रदेशाची मान्यता घेतली जाणार आहे. त्यानंतर जिल्हाध्यक्ष निवड केली जाणार आहे.