आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुकले हात बनवतात खडूपासून विविध प्रतिकृती

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - खडूसारख्या नाजूक वस्तूवर मनोरा किंवा मोटारसायकल बनवणे अवघडच नाही तर अशक्यदेखील आहे. मात्र शहरातील मच्छीबाजार परिसरात राहणा-या एका लहानग्याने खडूच्या साहाय्याने नानाविध वस्तूंच्या प्रतिकृती साकारल्या आहेत. तसेच इतर टाकाऊ वस्तूंच्या साहाय्याने शोभिवंत वस्तूही हा विद्यार्थी बनवत असतो.
शहरातील मच्छीबाजार हा तसे पाहता मागासलेला भाग. परिसरात शिक्षणापासून वंचित राहणा-या लहानग्यांची कमी नाही. याच परिसरात राहणारा मोहंमद रेहान हा इयत्ता आठवीतला विद्यार्थी खडू आणि रिकाम्या सलाइनच्या बाटल्यांपासून शोभेच्या वस्तू बनविण्यात पारंगत आहे. परिसरात शाळेत जाणा-या मुलांची संख्या कमी असल्याने समविचारी मित्र नसल्यामुळे रिकाम्या वेळेत अभ्यास करणे किंवा चित्र काढणे आदी कामे तो करतो. तसेच टाकाऊ वस्तूंपासून काहीतरी चांगले बनविण्याच्या उद्देशाने त्याने आकर्षक वस्तू बनविल्या. रिकाम्या वेळेत या कलेलाच मित्र बनवत त्याद्वारे स्वत:ला पारंगत करण्याचा त्याचा प्रयत्न केला. त्याचे वडील एका उर्दू शाळेत शिपाई म्हणून कार्यरत आहेत. त्याने खडूच्या साहाय्याने मशिदीचा मनोरा, मोटारसायकल, किल्ली, गॅस सिलिंडर, पेन्सिल, फुलदाणी तसेच तरुणीची प्रतिकृती तयार केली आहे. याचबरोबर सलाइनच्या रिकाम्या बाटल्यांपासून घरात अनेक शोभेच्या वस्तूदेखील त्याने बनविल्या आहेत. त्यात फ्लावर प्लॉट, शोभेची फुले यासह इतर वस्तू त्याने बनविल्या आहेत. नॅशनल उर्दू शाळेत शिक्षण घेणा-या मोहंमदला भविष्यात कार्टुनिस्ट किंवा चित्रकार व्हायची इच्छा आहे. कला क्षेत्रात नावीन्यपूर्ण काम करण्याची इच्छा असलेल्या मोहंमदला आपल्या शाळेकडून वेळोवेळी मार्गदर्शन मिळते.
रेहानने बनवले छंदालाच आपला मित्र - मोहंमद रेहान ज्या वस्तीत राहतो त्या ठिकाणी शाळेत जाणारी मुले जास्त प्रमाणात नाहीत. पर्यायाने शाळेतील मित्रही रेहानला मिळाले नाहीत. त्यामुळे तो खडूपासून विविध वस्तू बनवू लागला. हाच त्याचा छंद झाला. या छंदात तो दिवसेंदिवस रमू लागला. आता त्याला मित्रांची गरज नाही. कारण हा छंदच त्याचा सर्वात चांगला मित्र झाला आहे. त्याने फुलदाणी, पेन्सिल, तलवार अशा अनेक वस्तू बनविल्या आहेत.