जळगाव - जळगावातील अनेक नागकरिकांच्या मोबाइलवर सध्या पाकिस्तानचे कोड नंबर असलेले ब्लँक कॉल येत आहेत. बर्याचदा समोरून कोणीही बोलत नाही; तर अनेक वेळा या फोनद्वारे ते लॉटरी लागल्याचे सांगतात. यासंदर्भात अद्याप कुणीही पोलिसांत तक्रार केली नसली तरी या कॉल्समुळे मोबाइलधारकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
गेल्या आठवड्यात प्रदीप पाटील यांना 00923348119480 या क्रमांकावरून फोन आला. तीन-चार सेकंदात फोन कट झाला. पाटील यांनी या क्रमांकावर फोन करण्याचा प्रय} केला मात्र नंबर लागला नाही. याचप्रमाणे आर.वाय. पार्क येथील श्यामकांत कुळकर्णी यांना तीन दिवसांत चार वेळा असे कॉल्स आले. कुळकर्णी यांना 00923087853355, 00923478779518, 00923348119480 आणि 00923055248299 या क्रमांकावरून मिस कॉल आले. एक वेळा फोन उचलल्यानंतर तुम्हाला 10 लाख रुपयांची लॉटरी लागली आहे. मी नंबर देतो त्यावर फोन करा, असे सांगितले; मात्र पुढे संभाषण होऊ शकले नाही.
नंबरचा शोध घेणे कठीण
संबंधित मोबाइल क्रमांक हे ज्या शहर किंवा देशाच्या कोडवरून येतात त्यात सत्यता नाही. कारण प्रॉक्सी सर्व्हरचा वापर करून इंटरनेटच्या माध्यमातून हे कॉल करण्यात येतात. त्यामुळे ते कोणत्या शहरातून येत आहेत. याचा शोध घेणे अत्यंत कठीण आहे. अशा परिस्थितीत ज्यांना असे कॉल येत असतील त्यांनी ते स्वीकारू नये किंवा स्वीकारले तरी समोरच्या व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे आपल्या बद्दलची खासगी किंवा सार्वजनिक माहिती देऊ नये. इंटरनेट, बँक पासवर्ड किंवा अन्य माहिती समोरील व्यक्तीला सांगू नये हा एकमात्र योग्य पर्याय आहे. असे पोलिस अधीक्षक एस.जयकुमार यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. अशा प्रकारच्या कॉल्सची चौकशी पोलिस मुख्यालयातील सायबर सेलकडून सुरू असल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे.