आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारोळ्यात घराला आग; ९० हजारांचा नुकसानीचा पंचनामा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पारोळ्यात घराला लागलेल्या आगीत संसारोपयोगी वस्तूंसह पूर्ण घरच जळून खाक झाले. मोठ्या शर्तीनंतर आग विझवण्यात नागरिकांना यश आले. - Divya Marathi
पारोळ्यात घराला लागलेल्या आगीत संसारोपयोगी वस्तूंसह पूर्ण घरच जळून खाक झाले. मोठ्या शर्तीनंतर आग विझवण्यात नागरिकांना यश आले.
पारोळा - शहरातील गुरव गल्लीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संतोष गुरव यांच्या घराला सोमवारी सकाळी ११ वाजता आग लागली. या आगीत संसाराेपयोगी वस्तूंसह दीड लाखांचे नुकसान झाले आहे. पालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी उशिराने दाखल झाल्याने आगीच्या रौद्ररुपात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

गुरव हे सकाळी उपोषणकर्त्यांना भेट देण्यासाठी सकाळी घराबाहेर पडले होते. त्यांची वृद्ध आई मंदिरात असताना घरातून आगीच्या ज्वाळा येत असल्याचे पाहून शेजारील नागरिकांनी आरडाओरड केली. ही आग शेजारील घरातही पसरण्याची शक्यता लक्षात घेता काही व्यक्तींनी घरातील सिलिंडर बाहेर काढून पालिका प्रशासनास माहिती दिली.आगीचे रौद्ररुप वाढत असल्याचे पाहून बापू नावरकर, आर. एस. जैन यांनी लगतच्या इमारतीवरून पाणी सोडत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष करण पवार यांच्यासह नितीन भोपळे, गोविंद शिरोळे, नितीन सोनार, संजय चौधरी, दीपक वाणी, संजय पाटील, बापू पवार आदींनी भेट देऊन पाहणी केली. या वेळी तुटपुंजी आर्थिक मदत देण्यापेक्षा हरवलेला निवारा देण्याचे मत नगराध्यक्ष पवार यांनी व्यक्त केले. शहर तलाठी टी. एल. शिंदे यांनी ९० हजारांचा नुकसानीचा पंचनामा केला आहे.

एका तासानंतर पालिकेचा बंब
आगीच्याठिकाणी अग्निशमन दलास तत्काळ पोहाेचणे गरजेचे असताना पारोळा पालिकेचा बंब मात्र घटना घडल्यानंतरही एक तासाने पोहोचला. त्यामुळे घरातून संसाराेपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. गुरव हे गरीब सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. या आगीत महत्त्वाची कागदपत्रे, बँकेचे पासबुक, एटीएम कार्ड जळून खाक झाली आहेत.