आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीतीपोटी केल्या जाताहेत जळगावात रक्ताच्या चाचण्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पावसाचे आगमन लवकर झाल्याने वातावरणात झालेल्या बदलाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे डॉक्टरांकडील ओपीडीत सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. तसेच विविध आजारांबाबत भीतीचे वातावरण असल्याने शंका नको म्हणून रक्ताची चाचणी घेण्याचे प्रमाण वाढले आहे. असे असले तरी मलेरिया किंवा टायफाइडचे प्रमाण अत्यंत किरकोळ असल्याचे पॅथालॉजिस्टकडील अहवालांवरून स्पष्ट होत आहे.

जुलै ते ऑगस्ट 2012 दरम्यान शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात चार बालकांचे प्राण डेंग्यू सदृश आजाराने गेल्याने खळबळ उडाली होती. यंदा नेहमीपेक्षा पावसाने लवकर हजेरी लावली. त्यामुळे वातावरणातही बदल झाला आहे. सद्या सर्दी, खोकला यामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांचे प्रमाण जागोजागी पाहायला मिळत आहे. तर तापाच्या रुग्णांचेही प्रमाण वाढले आहे. घरगुती इलाज करून ही प्रकृती सुधारत नसल्याने डॉक्टरांकडे जाणार्‍यांचे प्रमाण वाढले आहे.

गंभीर लक्षणे नाहीत
दवाखान्यातील रुग्णांचे प्रमाण वाढले असले तरी त्यात व्हायरल फीव्हर, गॅस्ट्रो यासारख्या आजारांचे प्रमाण जास्त आहे. तसेच मलेरिया किंवा टायफाइडचे प्रमाण अत्यंत किरकोळ असल्याचे डॉक्टर सांगत आहेत. तापाचे रुग्ण आल्यास शक्यता पडताळून पाहण्यासाठी रक्ताच्या चाचण्या घेऊन औषधोपचार केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

डेंग्यूचा एकही रुग्ण नाही
दिवाळीदरम्यान शहरात डेंग्यूचे रुग्ण आढळत होते. परंतु यंदा पावसाळा सुरू होऊन महिना उलटला तरी अद्याप एकही रुग्ण डेंग्यूचा असल्याचे निदर्शनास आलेले नाही. याउलट औरंगाबाद शहरात दोन महिन्यापूर्वीच म्हणजे ऑगस्टमध्ये निष्पन्न होणारे डेंग्यूचे रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत. त्यामुळे जळगावातही याबाबत खबरदारी घेणे गरजेचे आहे.

सिव्हिलमध्येही साधारण रुग्ण
वैद्यकीयदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र असलेल्या जिल्हा रुग्णालयात सद्या किरकोळ आजारांचे रुग्ण येत आहेत. त्यामुळे अँडमिट करून घेण्याचे प्रमाणही फार नाही. सद्या व्हायरल इन्फेक्शनमुळे रुग्णांना किरकोळ त्रास संभवतात.
-डॉ. मिलिंद बारी, वैद्यकीय अधिकारी

गत काळात पांढर्‍या पेशी घटण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे रुग्णांचे जीव धोक्यात येत होते. नेमकी तीच भीती रुग्णांमध्ये असते. त्यामुळे ताप आला तरी रुग्ण डॉक्टरांकडे जाऊन रक्त तपासणी करून घेण्याचा आग्रह करतात किंवा डॉक्टरच निदान करण्याच्या दृष्टीने चाचणी करून घेत असतात. त्यामुळे पॅथॉलॉजीमध्ये रक्ताचे नमुने तपासणीसाठी येत आहेत.
-डॉ. राहुल मयूर, एमडी, पॅथॉलॉजीस्ट.