आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान! जळगावातही बनावट दारूचा रतीब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- बनावट मद्यप्राशनाने मुंबईत ८४ जणांना प्राण गमवावे लागले. मुंबईतील घटनेची पुनरावृत्ती राज्य उत्पादन शुल्कमंत्र्यांच्या जळगावातदेखील उद्भवू शकते. जिल्ह्यात वर्षभरात सुमारे १०० जणांचा बनावट अतिमद्यसेवनाने मृत्यू झाला आहे. मात्र, राज्य उत्पादन शुल्क विभाग मद्य तयार करणारे विक्री करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याऐवजी फक्त महसूल गोळा करण्यात व्यग्र आहे. धुळे नंदुरबारसह सीमेलगत असलेल्या मध्य प्रदेशातून आरोग्याला अतिशय घातक असे बनावट मद्य शहरात रोजच येत आहे. या मद्यात स्पिरीट, नवसागर यासारखे घातक पदार्थ वापरले जातात. तसेच ऑर्डरप्रमाणे मद्य तयार करून मिळते. बाटलीचे बूच, स्टिकरदेखील अगदी हुबेहूब ब्रॅण्डेड कंपनीप्रमाणे तयार करून मिळते. त्यामुळे ग्राहकला बनावट मद्य ओळखणे शक्य होत नाही. केवळ बाटलीच्या बॅच क्रमांकावरून मद्य बनावट आहे की नाही, हे कळते.
जिल्ह्यात एकूण ३२४ परमीट रूम-बिअर बार, ३७ वाइन शॉप दारूचे अाठ प्रमुख वितरक आहेत. मात्र, त्याव्यतिरिक्त किमान ५०० ते ६०० हॉटेल्स महामार्गावर ढाबे आहेत. बहुतांश ठिकाणी राजरोसपणे अवैधरीत्या मद्याची विक्री होते. या ठिकाणी उत्पादन शुल्क विभाग कारवाई करण्यास धजावत नाही. परवाना नसलेल्या हॉटेल्समध्ये तर बनावट मद्याची सर्रास विक्री सुरू आहे.
कारवाई नेहमीच सुरू असते
- मुंबईत विषारी दारूसेवनाने अनेकांना प्राण गमावण्याची वेळ आली आहे. मात्र, तसा प्रकार जळगाव जिल्ह्यात नाही. तरीही दारूच्या भट्ट्यांवर आणि बनावट मद्यविक्री करणाऱ्यांवर कायमच कारवाई केली जात असते. कर्मचारी कमी असले तरी आहे तेवढ्या मनुष्यबळात आम्हाला काम करावेच लागणार आहे.
ना. ना. पाटील,अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क विभाग
दूरगामी परिणाम होतात
- अतिमद्यसेवन किंवा बनावट मद्यप्राशनाने शरीरावर दूरगामी परिणाम होतात. बनावट मद्यप्राशनाने लिव्हर सोरायसिस होतो. त्यानंतर स्वादूपिंड निकामी होते. तसेच मद्य पिणे बंद केल्यास यकृत आणि मूत्रपिंडही निकामी होते. त्याचा परिणाम मेंदूवर होऊन रुग्ण कोमात जाऊन तो दगावण्याची शक्यता जास्त असते.
डॉ. किरण पाटील, अतिरिक्तिजल्हा शल्यचिकित्सक
फक्त महसूल गोळा करण्यात रस
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जळगाव कार्यालयाच्या महसुलात यंदा २०.६९ टक्के वाढ झाली आहे. तसेच महसूल वसुलीचे दिलेले उद्दिष्टही नेहमीच १०० टक्के पूर्ण केले जाते. मात्र, गतवर्षाच्या तुलनेत यंदा कारवाईमध्ये घट झाली अाहे. जानेवारी ते मे या पाच महिन्यांत ५७७ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. राज्य शासनाने राज्य उत्पादन शुल्क विभागाला २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी १६ कोटी ७० लाख रुपये महसूल वसुलीचे उद्दिष्ट दिले होते. विभागाने एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१५पर्यंत १०० टक्के वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण केले. त्यामुळे उत्पादन शुल्क विभाग केवळ महसूल वसुलीत जास्त वेळ घालवतो. त्यांना कारवायांमध्ये रस नसल्याचे दिसून येते.
कमी संख्याबळ
जिल्हा सामान्य रुग्णालयात वर्षभरात बनावट आणि अतिमद्यसेवनाने बाधित सरासरी ५०० रुग्ण दाखल होतात. त्यापैकी १०० ते १२० जणांना प्राण गमवावे लागतात. याची दखल राज्य उत्पादन शुल्क पोलिसही घेत नाहीत. जिल्ह्यातील १५ तालुक्यांसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे एक अधीक्षक, दो निरीक्षक आणि ५१ कर्मचारी असा एकूण ५४ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा स्टाफ आहे. मात्र, एवढ्या मोठ्या जिल्ह्यासाठी केवळ ५४ कर्मचारी आहेत.
कारवाई केवळ देखाव्यासाठी
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने राबवलेल्या मोहिमेत एप्रिल २०१४ ते मे २०१५पर्यंत १,७८३ गुन्हे दाखल करून ५३४ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून कोटी ६६ लाख २२ हजार ६०३ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. गेल्या वर्षी ६०१ गुन्हे दाखल करून संबंधितांकडून ७० लाख ९६ हजार ६८५ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला होता. मात्र, या कारवाया फक्त दाखवण्यासाठी केल्या जात असल्याचे आरोप होतात.
बातम्या आणखी आहेत...