आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिनाभरानंतरही बोगस डॉक्टर शोधमोहीम रखडलेलीच!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - बोगस डॉक्टर शोधमोहीम सध्या थंडावली आहे. शिरपूर तालुक्यातील एक गुन्हा दाखल करण्यापलीकडे कारवाई पुढे सरकलेली नाही. तर दुसरीकडे जिल्हा आरोग्य विभागानेही आता या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रय} सुरू केलेला आहे. यासंदर्भातील काम पाहणारे आरोग्य विस्तार अधिकारी जी.टी. वाडेकर भ्रमणध्वनी बंद करून माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत.

बोगस डॉक्टरांवरील कारवाईसंदर्भातील पुनर्विलोकन समितीची 25 नोव्हेंबर रोजी अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. अशोक करंजकर यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत प्रत्येक तालुक्यातून किमान दोन बोगस डॉक्टर शोधण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, त्यानंतर महिना उलटला तरी सांगवी येथील घटना वगळता अन्य कारवाई झालेली नाही. तालुका आरोग्याधिकार्‍यांना 194 बोगस डॉक्टरांची पडताळणी करून सुधारित माहिती सादर करण्याचे आदेश जिल्हा आरोग्याधिकार्‍यांनी दिलेले आहेत. मात्र, त्या आदेशाला केराची टोपली दाखवत तालुका आरोग्याधिकार्‍यांनी माहितीच दिलेली नाही. तर शिंदखेडा तालुका आरोग्याधिकार्‍यांना ऑक्टोबर महिन्यात 22 बोगस डॉक्टरांची यादी जिल्हा आरोग्याधिकार्‍यांनी पाठवून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यावरही कारवाई होऊ शकलेली नाही. या महिन्यात पुनर्विलोकन समितीची बैठक झालेली नाही.

महापालिका निर्धास्त
महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. महेश मोरे यांना जिल्हा आरोग्याधिकार्‍यांनी वेळोवेळी पुनर्विलोकन समिती स्थापन करण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र, शहरात डॉ. मोरे यांनी समिती स्थापन करण्याबाबत पुढाकार घेतलेला नाही. त्यामुळे महापालिका स्तरावर कारवाई होऊ शकलेली नाही. मनपातील उशिरामुळे कारवाईबाबत संभ्रम आहे.

माहिती देण्यास टाळाटाळ
या प्रकरणातील सविस्तर माहितीचा डाटा संग्रह असलेले आरोग्य विस्तार अधिकारी जी.टी. वाडेकर गेल्या काही दिवसांपासून आऊट ऑफ सर्व्हिस आहेत. त्यांच्याकडे माहितीची विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. तर जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. अरविंद मोरे यांना विचारणा केली असता जिल्हाधिकारी अध्यक्ष असल्याने माहिती देता येत नसल्याचे सांगितले जाते.

आर्थिक व्यवहाराची प्रशासनाकडे तक्रार
बोगस डॉक्टरांची माहिती घेऊन पुनर्विलोकन समितीतील अशासकीय सदस्य व आरोग्य कर्मचार्‍यांकडून आर्थिक देवाण-घेवाण करण्यात आल्याची तक्रार मध्यंतरी जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आलेली आहे. तसेच पाटील नामक एका डॉक्टरनेही आरोग्य विभागातील कर्मचारी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांच्या नावाने पैशांची मागणी करीत असल्याची तक्रार दिलेली आहे. त्यासंदर्भात अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.