आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोगस अहवालावरून उपचार करणार्‍या डॉक्टरांवरही नजर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - स्वत: रक्त चाचणी न करता अनेक लॅबमध्ये स्वाक्षरी देणार्‍या काही एम.डी. पॅथॉलॉजिस्टवर कारवाईसाठी प्रस्ताव देण्यात आला आहे. तसेच बोगस पॅथॉलॉजिस्टच्या स्वाक्षरीने दिलेल्या अहवालाच्या आधारे उपचार करणार्‍या डॉक्टरांची देखील महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलक डे तक्रार करणार असल्याची माहिती एम.डी. पॅथॉलॉजिस्ट संघटनेचे राज्य अध्यक्ष संदीप यादव यांनी दिली.

गेल्या आठवड्यात एम.डी. पॅथॉलॉजिस्ट संघटनेने निवेदन देऊन डॉ.एस.जी.दहिलेकर यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. आयुर्वेदिक व डीएमएलटी यांच्यासंदर्भातील हा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे. प्रत्येक एम.डी. पॅथॉलॉजिस्टने स्वत:च्या उपस्थितीत चाचण्या घेऊन त्याची तपासणी केल्यानंतरच अहवाल तयार करणे गरजेचे असते. यानंतर तयार केलेला अहवाल पुन्हा तपासून त्यावर स्वाक्षरी करायची असते. हा नियम धाब्यावर बसवून एकाचवेळी अनेक ठिकाणी स्वाक्षरी देणार्‍या राज्यातील सात पॅथॉलॉजिस्टवर परवाने रद्दची कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे तक्रार करण्यात आली आहे. यात संबंधित पॅथॉलॉजिस्टचे म्हणणे ऐकून घेण्यात आल्याची माहिती एम.डी. पॅथॉलॉजिस्ट संघटनेचे अध्यक्ष संदीप यादव यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

टेक्निशियनांवर काम नको
पॅथॉलॉजीमध्ये काम करणार्‍या टेक्निशियनच्या भरवशावर चाचण्या करून त्या अहवालावर स्वाक्षरी करणे म्हणजे रुग्णाची फसवणूक आहे. राज्यात पुणे व मुंबईत असे प्रकार मोठय़ा प्रमाणात सुरू आहेत. पनवेल येथील एका पॅथॉलॉजिस्टने नांदेड येथील एम.डी.डॉक्टरच्या नावाचा परस्पर वापर केल्याचे उघडकीस आल्यानंतर पॅथॉलॉजिस्ट संघटनेने संबंधित टेक्निशियनविरुद्ध पोलिसात तक्रार दिल्याचेही यादव यांनी सांगितले.

डॉ.दहिलेकरांची तक्रार करणार
हिमांशू मृत्यू प्रकरणात अडचणीत आलेले डॉ.एस.जी.दहिलेकर यांनी बर्‍याच ठिकाणी काउंटर सही केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. प्रत्यक्षात त्यांना रक्त चाचण्यांचा अधिकार नसल्याचे पॅथॉलॉजिस्ट संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे. सोबत त्यांच्या अहवालावरून रुग्णांवर उपचार करणार्‍या डॉक्टरांची देखील मेडिकल कौन्सिलकडे तक्रार करू असेही यादव म्हणाले.