आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bogus Night Blindness Certificate, Crime Against 29 People

रातांधळेपणाचे प्रमाणपत्र बोगस; २९ जणांविरुद्ध गुन्हा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे विभागातील चालकांनी वैद्यकीय महाविद्यालय जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून खोटे रातांधळेपणाचे प्रमाणपत्र घेऊन सुरक्षारक्षकपदी पर्यायी नेमणूक करून घेत महामंडळाची फसवणूक केल्याप्रकरणी तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक, एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक अविनाश विजय पाटील, विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी अनिल नरेंद्र वळवी यांच्यासह २९ चालकांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याची तक्रार करण्यात आली होती.

महामंडळातील ३० चालकांनी वैद्यकीय महाविद्यालयाकडून रातांधळेपणा असल्याबाबतचे बनावट प्रमाणपत्र मिळवून त्याद्वारे महामंडळाच्या नियमानुसार सुरक्षारक्षकपदी नियुक्ती मिळवून घेतली होती. त्याबाबत महाविद्यालयाने रातांधळेपणाचे प्रमाणपत्र दिल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून प्रमाणपत्र घेतले. मात्र, पर्यायी नोकरी देताना जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या प्रमाणपत्रानुसार नेमणूक केली गेली. महामंडळाच्या सूचनेनुसार संबंधितांची वैद्यकीय मंडळाकडे तपासणी करून प्रमाणपत्र घेणे आवश्यक होते. मात्र, तसे करता केवळ वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रमाणपत्रावर तत्कालीन विभाग नियंत्रक अविनाश पाटील यांनी संबंधितांची पर्यायी नोकरी म्हणजे सुरक्षारक्षकपदी नेमणूक केली. याबाबत तक्रार झाल्यानंतर त्यांची महामंडळाकडून चौकशी करण्यात आली. याबाबत संबंधितांना जे.जे रुग्णालयातून फेरतपासणी करण्याबाबत सांगण्यात आले. मात्र, त्यापैकी काही जणांनीच चौकशी केली. त्यात केवळ एकालाच रातआंधळेपणा असल्याचे उघड झाल्याने तो पात्र ठरला. मात्र, इतरांनी बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचे स्पष्ट झाल्याने त्याबाबत महामंडळाने नाशिक विभागीय कार्यालयाचे वरिष्ठ सुरक्षा दक्षता अधिकारी उत्तम मोरे यांच्याकडून या प्रकरणाची चौकशी केली गेली. चौकशीतही प्रमाणपत्र खोटे असल्याचे सिद्ध झाल्याने त्यांनीच वरिष्ठांच्या आदेशानुसार या सर्वांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार बनावट रातआंधळेपणाचे प्रमाणपत्र सादर करणाऱ्या २९ चालकांसह जिल्हा शल्यचिकित्सक एसटी महामंडळाच्या दोन्ही अधिकाऱ्यांनी संगनमत करून गैरप्रकार करीत महामंडळाची फसवणूक केली म्हणून शहर पोलिसात या सर्वांविरुद्ध भादंवि कलम ४२०, ४१७,४१९, ४६५, ४६६, ४६८,४७१,४७४, ३४ प्रमाणे मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम १५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांच्या विरुद्ध दाखल झाला गुन्हा...
चालक (कंसात आगार)- नितीन देविदास बोरसे (शिरपूर), विजय तुकाराम वाडिले (साक्री), सुभाष पंढरीनाथ कुवर (साक्री), दीपक भिकनराव सोनवणे (साक्री), खंडू मोतीराम गरदरे (साक्री), भरत अर्जुन साळुंके (साक्री), शरद यशवंत शिंदे (साक्री), संजय देविदास शिंदे (साक्री), सुनील त्र्यंबक पाटील (साक्री), सुनील विक्रम पाटील (साक्री), जितेंद्र शांतिलाल गुरव (शिरपूर), महेंद्र भास्करराव पाटील (साक्री), अर्जुन रामा पाटील (साक्री), बापू भटू वाघ (साक्री), जितेंद्र अशोक भावसार (साक्री), पुंजू दामू जिरे (नवापूर), राजेंद्र रामाजी नागापुरे (शिरपूर), वसंत नरहर वडनेरे (शहादा), अशोक कृष्णा बागुल (साक्री), सुभाष आई गंगा भील (शहादा), राजू कौतिक वाघ (शहादा), राजाराम धनराज पाटील (नवापूर), उद्धव ईश्वर साळुंखे (धुळे), इक्बाल खॉ रशीद खॉ पठाण (शिंदखेडा), शेख सलीम शेख रसूल (साक्री), नासीरअली दिलावर सय्यद (साक्री), अनिल गुलाबराव मेश्राम (अक्कलकुवा), हंबीर बाबूलाल भामरे (शिंदखेडा), अरुण उत्तम चव्हाण (शिंदखेडा), अनिल नरेंद्र वळवी (विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी) आणि अविनाश विजय पाटील (विभाग नियंत्रक) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तत्कालीन शल्यचिकित्सकांचाही यात समावेश केला गेला आहे.

अपंग प्रमाणपत्र प्रकरणाचीही चर्चा...
शहराचे आमदार अनिल गोटे यांच्याकडून अपंगत्वाच्या दाखल्याबाबत तक्रार करण्यात आली होती. त्या वेळीही महामंडळातील बनावट रातआंधळेपणाच्या प्रकरणाची चर्चा झाली होती. त्यानुसार मंडळाच्या मुंबई येथील पथकाकडूनही या प्रकरणाची चौकशी झाल्याचे सांगण्यात आले होते.

रॅकेटची शक्यता
महामंडळाच्यानियमाचा फायदा घेत फसवणूक करणाऱ्या या प्रकरणात अनेकांचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रकरण जरी केवळ बनावट प्रमाणपत्राचे वाटत असले तरी यापूर्वी भरती प्रक्रिया आणि इतरही वेळी महामंडळाच्या भ्रष्ट कारभाराबाबत चर्चा होत असल्याने पोलिसांना या प्रकरणाची काळजीपूर्वक चौकशी करावी लागणार आहे.त्यानंतर वस्तूस्थिती समोर येईल.

दिव्य मराठीची दखल
एसटीमहामंडळातील बनावट रातांधळेपणाबद्दलचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने तीन महिन्यांपूर्वीच दिले होते. याप्रकरणी अनेकांविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली गेली होती. त्यानुसार मंगळवारी याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने ‘दिव्य मराठी’चे वृत्त खरे ठरले. वृत्तानंतरच या प्रकरणाच्या चौकशीला वेग आला होता.