आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक - धुळे शहरातून बोलेरो लुटणार्‍या गुन्हेगारांचे कारनामे होताहेत उघड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - सुमारे पाच वर्षांपूर्वी शहरातून लुटून नेलेली बोलेरो आझादनगर पोलिसांनी जप्त केली असली तरी या प्रकरणातील संशयित मात्र मध्य प्रदेश पोलिसांच्या ताब्यात आहेत. या टोळक्याकडून मध्य प्रदेश पोलिसांनी सुमारे 20 वाहने जप्त केली आहेत. त्यांच्यावर महाराष्ट्रासह इतर राज्यातही अनेक गुन्हे दाखल आहेत. या टोळीत महिलांचाही सहभाग असल्याची माहिती तपासातून पुढे येत आहे.
17 जानेवारी 2007 रोजी धुळेमार्गे जाणार्‍या नवीन बोलेरोमध्ये तीन जण प्रवासी म्हणून बसले होते. तिघांनी वाहनचालक उत्तम हिराजी वावळ (रा. नाशिक) याला बांधून वाहन लांबविले होते. मध्य प्रदेशातील बडवानीनजीक हिलावत गावाजवळ चालकास फेकून तिघांनी पलायन केले होते. याबाबत दि.22 जानेवारी 2007 रोजी आझादनगर पोलिस ठाण्यात लुटीचा गुन्हा दाखल झाला होता. गेल्या साडेपाच वर्षांपासून या प्रकरणातील संशयित पोलिसांना सापडले नाहीत. गेल्या महिन्यात मध्य प्रदेशातील पोलिसांनी एका लुटीच्या गुन्ह्यात एका संशयिताला अटक केली. त्याने गुन्ह्यात वापरलेली बोलेरो पोलिसांनी उज्जैनमधून जप्त केली. याशिवाय इतर दोघांनाही ताब्यात घेण्यात आले होते. हे वाहन धुळयातून लुटल्याची त्यांनी कबुली दिली होती. त्यामुळे झाला प्रकार धुळे पोलिसांना कळविण्यात आला होता. यानंतर आझादनगर पोलिस ठाण्याच्या कर्मचारी हेडकॉन्स्टेबल घनश्याम मोरे, पंकज चव्हाण, नितीन चव्हाण, दीपक बाविस्कर आदींनी रतलाम येथे जाऊन बोलेरो जप्त केली. सध्या रतलाम कारागृहात असलेल्या तिघा संशयितांना लवकरात लवकर अटक करण्याकरिता न्यायालयात विनंती अर्ज करण्यात आला आहे.
धुळयातील वाहन लुटीत या टोळीतील तिघांचा प्रत्यक्ष तर उर्वरित सात जणांचा अप्रत्यक्षपणे सहभाग असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. उर्वरित संशयित अद्याप मध्य प्रदेश पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. ही बाब रतलाम पोलिसांनी न्यायालयात स्पष्ट केल्यामुळे अटकेतील तिघांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या तिघा संशयितांना ताब्यात घेण्याकरिता आझादनगर पोलिसांना पुन्हा मध्य प्रदेशाची वारी करावी लागणार आहे. याशिवाय या प्रकरणातील इतर संशयितांचा शोध घेण्याकरिता पुन्हा एकदा पोलिसांना पर्शिम घ्यावे लागणार आहे. दरम्यान या वाहनाचा विविध गुन्ह्यात वापर करण्यात आला होता.
टोळीवर देशभरात गुन्हे - मध्य प्रदेश पोलिसांना तपासादरम्यान धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या संशयितांकडून पोलिसांनी आतापावेतो सुमारे 20 चारचाकी वाहने जप्त केली आहेत. त्यांच्यावर महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, गोवा, राजस्थान, हरियाना आदी राज्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. रतलाम पोलिसांनी टोळीला अटक केल्यानंतर संबंधित राज्यातील पोलिसांना कळविले आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांत ग्वाल्हेर, जयपूर शहरातून लांबविण्यात आलेली वाहने या टोळक्याकडे मिळाल्याची माहिती आझादनगर पोलिसांनी दिली.
जप्त वाहन पोलिसांकडेच - जप्त केलेल्या बोलेरोचा अनेक ठिकाणी विविध गुन्ह्यांमध्ये वापर झाला आहे. यापैकी बहुतांशी गुन्हे मध्य प्रदेशच्या हद्दीतील आहेत. गुन्ह्यांचा पोलिस तपास आणि न्यायालयीन आदेश होत नाही तोवर हे वाहन पोलिसांच्या ताब्यात राहणार आहे. विविध राज्यातील पोलिस बोलेरोच्या तपासाकरिता ताबा घेऊ शकतात. त्यामुळे आरोपींप्रमाणे या वाहनाचा पोलिस ठाण्यात प्रदीर्घ काळ मुक्काम राहणार आहे.
सिनेस्टाइल फसवणूक - लुटीसोबतच हे टोळके वाहनचालकाला सिनेस्टाइल पद्धतीने गंडा घालीत असत. पर्यटन अथवा धार्मिकस्थळी या टोळीतील दोन महिला आणि दोन पुरुष भेट देऊन महागड्या लॉजमध्ये मुक्काम करीत असत. यानंतर जवळील प्रेक्षणीय स्थळ पाहण्याच्या उद्देशाने वाहन ठरविले जाई. रात्रीच्या जेवणात या चालकाला गुंगीचे औषध देऊन वाहन लांबविले जात होते. लांबविल्यानंतर वाहनाची विक्री केली जात होती. तथापि, धुळयातील बोलेरोची विक्री न करता लुटारूंनी आपल्या उपयोगासाठी ठेवून घेतली.
आरटीओंची चौकशी शक्य - धुळय़ातून लुटण्यात आलेल्या बोलेरोला लुटारूंनी मध्य प्रदेशातून पासिंग करून घेतली. तेथील आरटीओ विभागाने या वाहनाला एम.पी.13 टी.ए.0307 क्रमांक दिला आहे. पासिंग करताना वाहनांची कागदपत्रे तपासण्यात आली नाहीत. आरटीओंनी ही तसदी घेतली असती तर गुन्हा उघडकीस आला असता. याबाबत आझादनगर पोलिसांनी मध्य प्रदेश आरटीओला पत्र दिले आहे.
शासकीय वाहन असल्याचा बनाव - धुळय़ातून लुटलेल्या बोलेरोवर या टोळक्याने ‘भारत सरकार’ असा उल्लेख करून अनेक मोठय़ा गुन्ह्यांमध्ये वापर केला आहे. महामार्गावर वाहनचालकांना शासकीय अधिकारी असल्याचे भासवून टोळक्याने लाखो रुपयांत गंडा घातला आहे. लूट केल्यानंतर पोलिसांची नजर चुक वून पळ काढता यावा, यासाठी बोलेरोचा विशेष वापर करण्यात येत होता.