आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलतरण तलावात बालकाचा मृत्यू;संतप्त जमावाकडून क्रीडाधिकार्‍याला मारहाण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जिल्हा क्रीडासंकुलातील जलतरण तलावावर शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सहा वर्षीय विश्व हेमल शहा या बालकाचा बुडून करुण अंत झाला. बालक बुडत असताना त्याला वाचविण्यासाठी एकही सुरक्षा रक्षकाने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला नाही. अवघ्या 13 वर्षीय मुलाने विश्वला बाहेर काढले. त्या वेळी त्याला परस्पर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर शहा परिवारासह संतप्त जमावाने क्रीडासंकुलावर हल्ला करीत तोडफोड केली. क्रीडाधिकार्‍यांनाही मारहाण करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर संतप्त जमाव शांत झाला.
बळीरामपेठेतील व्यापार्‍यांची 6 ते 12 वयोगटातील 5 मुले नियमितपणे जिल्हा क्रीडासंकुलातील जलतरण तलावावर पोहण्यासाठी जातात. सायंकाळी 7 ते 7.45 या वेळेत ही मुले रिक्षाने रोज जलतरण तलावात येतात. या वेळी सहा वर्षीय विश्व व आठ वर्षीय ओम या दोघांनीही त्यांच्यासोबत जाण्याचा हट्ट धरला. त्या वेळी घरात फक्त त्यांची आई होती. समवयस्क मुलेच सोबत असल्याने विश्व व ओमलाही जलतरणासाठी पाठवण्यात आले. या दोघांचाही जलतरण तलावात पोहण्यासाठी जाण्याचा पहिलाच दिवस होता. दोघांनाही पोहता येत नव्हते. पाण्यात उतरताच विश्व बुडायला लागला. त्याची माहिती इतरांना कुणालाही नव्हती. जीवरक्षकही गाफील राहिले. एका 13 वर्षीय मुलाने त्याला बाहेर काढले. विश्वच्या नाकातोंडात पाणी गेले होते. त्याला बसस्थानकाजवळील गाजरे रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. मुलांना रोज घेण्यासाठी येणारा रिक्षाचालक इम्रान खतीब 7 वाजून 50 मिनिटांनी तरण तलावात आले. तेव्हा इतर मुलांनी त्याला घडलेली घटना सांगितली. हा संपूर्ण घटनाक्रम घडत असताना क्रीडा कार्यालयाच्या एकाही कर्मचार्‍यास त्याची माहिती नव्हती.
क्रीडा संकुलाची तोडफोड - क्रीडासंकुलातील हलगर्जीपणामुळे विश्वचा बळी गेल्यामुळे जिल्हा रुग्णालयात जमलेल्या संतप्त जमावाने क्रीडासंकुलाकडे आपला रोख वळवला. रात्री 9.30 वाजता शंभरावर लोकांनी क्रीडासंकुलातील सुरक्षा रक्षकांनाच धारेवर धरले. त्यानंतर जिल्हा क्रीडाधिकारी तेथे हजर झाले. त्या वेळी जमावाने क्रीडाधिकार्‍यांवर प्रश्नांची सरबत्ती करीत संताप व्यक्त केला. जिल्हा पोलिस ठाण्यातील तीन पोलिस कर्मचारी तेथे आल्यानंतर जमावाला शांत करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र, जमाव कोणाचेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. जमावातील एकाने क्रीडाधिकार्‍यांवर हात उचलला, तर एकाने त्यांचा शर्ट पकडला. पोलिसांनी हस्तक्षेप केला. मात्र, काही जणांनी क्रीडासंकुलाच्या दर्शनी भागातील काच फोडली, तर काहींनी जलतरण तलावाच्या दर्शनी भागाच्या काचा फोडून आत घुसले. तेथील टेबलचा ड्रॉवर फोडून त्यातील रजिस्टर बाहेर काढले. संतप्त जमाव काबूत येत नसल्याने पोलिसांची मोठी कुमक तेथे दाखल झाली.
संबंधितांना अटकेची मागणी - जमावाला शांत करण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला, तरी कोणीही ऐकण्याच्या मन:स्थितीत ते नव्हते. जोपर्यंत तरण तलावाच्या संबंधितांना अटक होत नाही, तोपर्यंत आम्ही येथून जाणार नाही. त्यांना आमच्यासमोर आणा, अन्यथा मृतदेह क्रीडासंकुलात आणू, अशी टोकाची भूमिका जमावाने घेतली. जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक आर. व्ही. इंगवले व शनिपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक नागेश जाधव यांनी कायदेशीर कारवाईचे आश्वासन देत जमावाला शांत केले. तब्बल दीड ते दोन तास जमावाने क्रीडासंकुलात ठिय्या आंदोलन केले होते.
दोन वर्षांतील तिसरा बळी - जिल्हा क्रीडासंकुलातील तरण तलावात बुडून मृत्यू होण्याची दोन वर्षांतील ही तिसरी घटना आहे. त्याचबरोबर क्लोरिन सोडल्यामुळे दोन जण अत्यवस्थ झाल्याचीही घटना याच तरण तलावावर घडली होती. यापूर्वी प्रशांत जगताप यांचा मुलगा, तसेच डॉ. हुजुरबाजार यांना क्लोरिनमुळे त्रास झाला होता.
क्रीडा कार्यालय अनभिज्ञ - जिल्हा क्रीडा कार्यालयात शनिवारपासून राज्यस्तरीय जम्परोप स्पर्धा असल्याने अनेक कार्यकर्ते स्पर्धेच्या तयारीसाठी बॅडमिंटन हॉलमध्ये व्यस्त होते. त्यामुळे नेहमीपेक्षा शुक्रवारी चांगलीच गर्दी होती. विश्व तरण तलावात 7.15 ते 7.30 वाजेदरम्यान बुडाल्याची शक्यता आहे. मात्र, रात्री 9.30 पर्यंत या घटनेबाबत कोणालाही काहीही कल्पना नव्हती. गेटजवळ असलेल्या सुरक्षा रक्षकासमोरून विश्वला घेऊन गेले, त्या वेळी संबंधित सुरक्षा रक्षकानेही याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. जिल्हा क्रीडाधिकारी सुभाष रेवतकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनाही याबाबत काहीही माहिती नव्हती.