आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी पतसंस्थेच्या सभेत फ्री-स्टाइल! सदस्य मुद्यावरून गुद्यावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - एसटी कर्मचारी सहकारी पतपेढीतील सालाबादाप्रमाणे गदारोळाचा इतिहास यंदाही कायम राहिला. विविध कर्मचारी संघटनांमधील अंतर्गत वाद, मान्यताप्राप्त संघटनेत पडलेली फूट, पतपेढीतील असंतुष्ट गट यांच्या कुरघोड्यांनी ही सभा चांगलीच गाजली. रविवारी राधाकृष्ण मंगल कार्यालयात झालेल्या पतपेढीच्या 53 व्या वार्षिक सभेत दोन सभासदांच्या वैयक्तिक भांडणाचे पर्यावसान हाणामारीपर्यंत येऊन पोहोचले. सभासदांनी एकमेकाचे कपडे फाडत खुच्र्यांची मोड तोड केली. सव्वा तास चाललेल्या या गोंधळातच संचालकांनी सगळ्या विषयांना मंजुरी मिळाल्याचे जाहीर करीत सभा गुंडाळली.

विभाग नियंत्रकांनी ठेवले नियंत्रण
विभाग नियंत्रक राजीव साळवे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे सांभाळत दीड तास सभा सांभाळली. मात्र, दोन कर्मचार्‍यांतील वैयक्तिक भांडणाचे पर्यावसान सभास्थळीच हाणामारीपर्यंत येऊन पोहोचले. खुच्र्यांची फेकाफेक होऊन ही हाणामारी चांगलीच रंगली. या वेळी बंदोबस्तासाठी केवळ चार पोलिस असल्याने त्यांना परिस्थितीवर नियंत्रण करणे कठीण झाले. गदारोळ वाढताच अध्यक्षांनी सभा संपल्याचे जाहीर केले. अडीच लाख रुपयांच्या भत्त्याचे वाटप या वेळी करण्यात आले. सभेला जिल्ह्यातून सुमारे 150 सभासद उपस्थित होते. दरवर्षी होणार्‍या वादामुळे बर्‍याच सभासदांनी 200 रुपये भत्ता घेऊन निघून जाणे पसंत केले. केवळ पाच ते सात सभासदांच्या गदारोळाने संपूर्ण सभेचा फियास्को झाला.
ब्लँकेटचा मुद्दा पुन्हा गाजला
ब्लँकेट खरेदीच्या मुद्यावर दिलीप सूर्यवंशी यांनी संचालकांना चांगलेच धारेवर धरले. ब्लँकेट किती सदस्यांना व कसे वाटण्यात आले? याबाबतची माहिती त्यांनी मागितली. वर्षभरात मागणी करूनही माहिती मिळाली नसल्याचा संतापही त्यांनी व्यक्त केला. सीएसटी, बीएसटीची बिले दाखवून सभासदांची दिशाभूल केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. यादरम्यान, वीजपुरवठा खंडित झाल्याने सभासदांनी पुन्हा गदारोळ केला. सुमारे 20 मिनिटांनी जनरेटर सुरू होऊन पुन्हा सभा सुरू झाली. संचालक धर्मराज सोनवणे, पंढरीनाथ नन्नवरे यांनी सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
सदस्य मुद्यावरून गुद्यावर
ब्लँकेटच्या विषयावर चर्चा सुरू असताना सभासद प्रकाश ठाकरे (जामनेर) व लीलाधर पाटील (रावेर)यांच्यात वाद सुरू झाला. त्यांचा हा वाद लवकरच मुद्यावरून गुद्यावर आला. दोघांच्या वादाने सभेत गोंधळ वाढला. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर दोघांनाही बाहेर काढूनही वाद सुरूच राहिला. याप्रकरणी कोणीही सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसात तक्रार दाखल केली नव्हती. या गोंधळाच्या पार्श्वभूमीवरच अध्यक्षांनी सभा संपल्याचे जाहीर केले. यादरम्यान भत्त्याचे वाटपही थांबवण्यात आल्याने विरोधी गटाने सभा सचिवांकडे तक्रार केली. भांडखोर सदस्य हे मान्यताप्राप्त संघटनेचे सदस्य असल्याने जाणीवपूर्वक हा प्रकार घडवण्यात आल्याचा आरोपही या वेळी विविध संघटनांनी केला. सभेस केवळ दोन महिला कर्मचारी उपस्थित होत्या. त्यांनीही वाद वाढताच काढता पाय घेतला.

केवळ एकाच विषयावर झाली चर्चा
अध्यक्ष निवडीनंतर मागील वार्षिक सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करण्यात आले. जमाखर्च व अंदाजपत्रकाच्या विषयावर अपघात विम्यावर संस्थेने काही काम केले नसल्याची तक्रार सदस्य आर.के.पाटील यांनी केली. त्यास मंजुरी असताना तो का दिला जात नाही? यावर खुलासा करण्याचा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला. यावर वाद वाढताच सभेचे अध्यक्ष राजीव साळवे यांनी योजनेचे पुनरुज्जीवन करण्यात येऊन योजनेसाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासनही त्यांनी दिले तसेच उदय भोसले यांनी यावर निर्णय घेण्यात येईल असे सांगितले. संगनमताने निर्णय घेतले जातात, यात सभासदांना विश्वासात घेतले जात नाही, यामुळे संस्थाचालकांवर जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही या वेळी करण्यात आली. गोपाळ पाटील यांच्यातर्फे अहवालातील चुका, मीटिंग भत्ता वाटपामधील घोळ, मंजुरी नसताना वस्तू खरेदी कशी सुरू झाली? असे मुद्दे उपस्थित करण्यात आले, त्यांना सभासदांनी प्रतिसाद दिला.