आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धावत्या एसटीचे ब्रेक फेल; आकाशवाणी चौकात थरार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मंगळवारी सायंकाळी जळगाव-बांबरूड बस बांबरूडकडे रवाना होत असताना आकाशवाणी चाैकातील चौफुलीवर बसचे ब्रेक फेल झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यामुळे सतर्कता दाखवत चालकाने बसचे गिअर बदलवून ती एक किलोमीटरपर्यंत नेऊन काव्यरत्नावली चाैकातील एका दुभाजकाजवळ थांबवल्याने मोठी दुर्घटना टळली. तसेच बसमधील ३५ प्रवाशांचे प्राण वाचले.

जळगाव आगारातून सायंकाळी ४.४५ वाजता जळगाव-बांबरूड (क्र.एमएच-२०-९५७) ही एसटी बस आकाशवाणी चौफुलीवरून महामार्गाकडे जात होती. या वेळी बसचे ब्रेक लागत नसल्याचे चालकाच्या लक्षात आले. नेमके याच वेळी सिग्नल सुरू झाल्याने चालक एस.आर.भील (वडली) गोंधळले. त्यामुळे त्यांनी ही बस इच्छादेवी चौफुलीकडे नेता थेट काव्यरत्नावली चौकाकडे नेली. ब्रेक लागत नसल्याने त्यांनी सतत गिअर बदलवले.
यादरम्यान बसने रस्त्यातील काही रिक्षांसह दुचाकी वाहनधारकांना धडक दिली. मात्र, त्यात सुदैवाने कुणालाही गंभीर इजा झाली नाही. काव्यरत्नावली चौकातील डीएसपी बंगल्यापर्यंत त्यांनी प्रसंगावधान राखत बस आणली. तेथे दुभाजकाला धडकल्याने ती थांबली. पाच मिनिटांच्या या जीवघेण्या प्रवासानंतर बसमधील ३५ प्रवाशांनी जीव वाचला म्हणून सुटकेचा नि:श्वास सोडला.
काव्यरत्नावली चाैकातील याच दुभाजकावर जळगाव-बांबरूड एसटी आदळली होती.
तासभर थांबूनही आली नाही दुसरी बस
अपघातानंतरतब्बल तासभर ३५ प्रवासी काव्यरत्नावली चौकात दुसऱ्या एसटीची वाट पाहत होते; पण बस आली नाही. त्यामुळे शेवटी हैराण झालेल्या प्रवाशांनी मिळेल त्या वाहनाने पुढील प्रवास केला. दुसरीकडे आगाराचे दुरुस्ती पथक घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी एसटी दुरुस्त करून आगारात नेली.