धुळे - 21 हजारांची लाच घेताना अटक करण्यात आलेला लाचखोर अभियंता रवींद्र वडनेरे यांच्या बँक लॉकरची शुक्रवारी झडती घेतली असता त्यात 85 तोळे सोने सापडले. प्राथमिक अंदाजानुसार त्याची किंमत 23 लाख रुपये आहे. यापूर्वी वडनेरे यांच्या घराच्या झडतीत एक लाख 60 हजार रुपये सापडले होते.
धुळे तालुक्यातील अकलाड या गावातील 46 लाभार्थींना इंदिरा आवास योजनेतून घरकुल मंजूर झाले होते; परंतु यापैकी नऊ गावक-यांच्या घराच्या कामानंतर मूल्यांकन दाखला देण्यासाठी शाखा अभियंता रवींद्र रघुनाथ वडनेरे यांनी पैशाची मागणी केली होती. त्यापैकी 21 हजार रुपये घेताना त्यांना बुधवारी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले होते. यानंतर त्यांच्याकडे विचारपूस केल्यावर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या धुळे शाखेत लॉकर असल्याची माहिती त्यांनी दिली.
शुक्रवारी दुपारी वडनेरे यांच्या बँक लॉकरची झडती घेतली. या झडतीत तब्बल 85 तोळे सोन्याचे दागिने मिळून आले. दरम्यान, वडनेरे यांच्या पोलिस कोठडीची मुदत शुक्रवारी संपली. त्यामुळे दुपारी त्यांना पुन्हा धुळे न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांच्या कोठडीत शनिवारपर्यंत वाढ केली आहे.