भुसावळ - शहरातील न्यू मुस्लिम काॅलनीतील एक दुमजली इमारत गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास काेसळली. यात ढिगा-याखाली दबल्याने एका युवकाचा मृत्यू झाला, तर २४ जण जखमी झाले. मृत युवक हा माजलगाव तालुक्यातील रहिवासी असून इतर जखमी बीड, नांदेड व परभणी जिल्ह्यांतील रहिवासी अाहेत. एका कंपनीच्या प्रशिक्षणासाठी शहरात अालेल्या या युवकांची निवास व्यवस्था या इमारतीत केली हाेती.
अलीकडेच बांधण्यात अालेल्या या इमारतीत ‘ग्लेस हेडिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीतर्फे मार्केटिंगचे प्रशिक्षण दिले जात हाेते. त्यासाठी मराठवाड्यातील २५ युवक महिनाभरापासून या ठिकाणी मुक्कामी हाेते. गुरुवारी मध्यरात्री ही इमारत काेसळली. त्यात बाबासाहेब अंगद गवळे (२२, रा. उंबरी, ता. माजलगाव) याचा मृत्यू झाला हाेता. जखमींमध्ये बीड, परभणी व नांदेड जिल्ह्यांतील युवकांचा समावेश असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मालकासह तिघांवर गुन्हा नाेंदवणार
दाेन इमारतींच्या मध्यभागी असलेली ही इमारत अचानक काेसळल्याने शेजारीही प्रचंड धास्तावले अाहेत. निकृष्ट बांधकामामुळे ही इमारत काेसळली असावी, असा तर्क लढवला जात अाहे. दरम्यान, इमारतीचा मूळ मालक, सध्या ही वास्तू ज्याच्या ताब्यात अाहे ताे मालक व बांधकाम करणारा कारागीर अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.