आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक हजार चौरसफूट बांधकाम एलबीटी मुक्त, सामान्यांच्या घरावरील खर्च होणार कमी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - बांधकाम व्यावसायिकांसोबत स्वत:साठी बांधकाम केलेल्या घरांच्या क्षेत्रानुसार एलबीटी आकारण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या होत्या. मात्र, या गोष्टीला विरोध होत असल्याने या निर्णयातून मध्यमवर्गीयांना सूट देण्यात येणार आहे. एक हजार चौरस फुटापर्यंत बांधकाम असलेल्यांना एलबीटीतून वगळण्याच्या दृष्टीने महापालिका लवकरच निर्णय घेणार आहे.
राज्य शासनाच्या 6 ऑगस्ट 2012 च्या अधिसूचनेचा संदर्भ जोडत महापालिकेने सर्वच बांधकामांवर एलबीटी आकारण्याचा प्रस्ताव 21 नोव्हेंबर 2013 रोजी आयुक्तांना दिला होता. त्यामुळे हद्दीत बांधकामे करण्याची कामे हाती घेणारा कोणताही बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदार, मक्तेदार, व्यापारी, नागरिकांना एलबीटीसाठी नोंदणी करून कर भरावा लागणार होता. बांधकाम व्यावसायिकांना एलबीटी आकारली गेल्यास त्या गोष्टीला फारसा विरोध झाला नाही. सामान्य नागरिक बाजारपेठेतून बांधकाम साहित्य खरेदी करत असल्याने त्या मालावर संबंधित व्यावसायिकाने पूर्वीच एलबीटी भरलेला असतो. त्यामुळे पुन्हा बांधकाम करणार्‍यांकडून एलबीटी वसूल करण्यास नागरिक आणि पालिकेतील लोकप्रतिनिधींचाही विरोध होत आहे. पुणे, नाशिक महापालिका हद्दीत होणार्‍या स्वत:साठी घर बांधणार्‍या सामान्य नागरिकांनाएलबीटीतून सूट देण्याची तरतूद आहे. त्याच पार्श्वभूमीवर जळगाव पालिकेतही सूट देण्याच्या दृष्टीने प्रशासकीय हालचाली सुरू आहेत.