आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साक्रीत बसचालकास मारहाण; आठ दिवसांतील तिसरी घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे / साक्री - साक्री येथील बसस्थानकाबाहेर मोटारसायकल चालकाने बसचालकाला मारहाण केली. या घटनेनंतर एसटीच्या कर्मचाऱ्यांनी एक तास आंदोलन केल्याने बससेवा विस्कळीत झाली होती. राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थीनंतर कामगारांनी आंदोलन मागे घेतले. दरम्यान, आठ दिवसांपूर्वी शहरातील मध्यवर्ती बसस्थानकासह दोंडाईचा येथेही एसटीच्या कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली होती. 
 
धुळे शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाबाहेर आठ दिवसांपूर्वी बसचालकास रिक्षाचालकाने मारहाण केली होती. या घटनेनंतर तिसऱ्या दिवशी धुळे-दोंडाईचा रस्त्यावर दुचाकीचालकाने बसचालकास मारले होते. या दोन्ही घटनांप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्यानंतर शनिवारी साक्री येथे बसचालकास पुन्हा मारहाण झाली. जळगाव आगाराची वापी-जळगाव बस शनिवारी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास साक्री बसस्थानकातून बाहेर पडत असताना वळणावर बससमोर अचानक एक दुचाकीचालक आला. या वेळी दुचाकीस्वाराने बसचालकाशी हुज्जत घालत मारहाण केली. चालकानेदेखील दुचाकीस्वारास मारहाण केली. हा प्रकार पाहून काही स्थानिकांनी बसचालकावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार पाहून एसटीच्या विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी बसचालकाच्या मदतीसाठी धावून आले. तसेच दुचाकीस्वाराविराेधात गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली. दरम्यान, या वेळी स्थानिक राजकीय पुढाऱ्यांनी मध्यस्थी करीत हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. चालकास मारहाण करणाऱ्या दुचाकीस्वाराने रीतसर माफीनामा लिहून दिल्यानंतर कामगार संघटनांनी आंदोलन मागे घेतले. या आंदोलनामुळे अर्धा ते पाऊण तास बससेवा विस्कळीत झाली होती. 

धुळे शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात स्थिती ‘जैसे थे’ 
मध्यवर्ती बसस्थानकाबाहेर बेकायदेशीर पार्किंगमुळे आठ दिवसांपूर्वी चालकास मारहाणीची घटना घडली. यानंतर स्थितीत सुधारणा हाेणे आवश्यक होते. मात्र, आठ दिवसांनंतरदेखील चित्र बदललेले नाही. त्यामुळे या प्रश्नाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. तसे झाल्यास आगामी काळात हा प्रश्न अधिक गंभीर होणार असल्याची स्थिती आहे. 

बसस्थानकात वाट्टेल तिथे वाहन पार्किंग 
शहरातीलमध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांना सोडण्यासह घेण्यासाठी येणारे प्रवासी वाट्टेल तिथे दुचाकी उभ्या करतात. त्यामुळे काही वेळा बसचालकांना स्थानकातून बस बाहेर नेताना कसरत करावी लागते. बसस्थानकात पार्किंगची स्वतंत्र सुविधा करण्यात आली आहे. मात्र, अनेक जण या ठिकाणी वाहने उभी करणे टाळतात. त्याचबरोबर रात्रीच्या वेळी काही रिक्षाचालक चारचाकी वाहनचालक थेट बसस्थानकात रिक्षा वाहने नेतात. त्यामुळे या प्रश्नाकडेही एसटी महामंडळाने गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. 

आदेशाला दाखवली केराची टोपली 
धुळे शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाबाहेर चालकाला झालेल्या मारहाणीनंतर परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी रिक्षाचालकावर कारवाईचे आदेश दिलेले आहेत. मात्र, या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आली आहे. रिक्षाचालकावर कारवाईसाठी प्रादेशिक परिवहन विभाग पोलिसांकडे, तर पोलिस प्रादेशिक परिवहन विभागाकडे बोट दाखवत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...